मुंबई : प्रतिनिधी : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अदित्य ठाकरे या पिता पुत्रांना बाय करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेल्या सचिन अहिर यांची आज बुधवारी विधान परिषदेच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली. महायुतीच्या नेत्यांनी महाविकास आघाडीला निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केल्यानंतर आमदार जगन्नाथ अभ्यंकर यांना माघार घेतल्याने अहिर यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला.
सचिन अहिर यांनी मंगळवारी शिवसेना उद्धव ठाकरे गटाला धक्का देत शिवसेना शिंदे गटाकडून विधान परिषदेच्या उपसभापतीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पुर्वी शिवसेना ठाकरे गटाकडून मुंबई शिक्षक मतदारसंघाचे आमदार जगन्नाथ अभ्यंकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आज बुधवारी दुपारी उपसभापती निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली. उपसभापतींची निवड ही बिनविरोध होण्याची सभागृहाची परंपरा असल्याने आमदार अभ्यंकर यांच्या उमेदवारीचा प्रस्ताव मागे घ्यावा, अशी विनंती सभापती राम शिंदे, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. त्यानंतर सभागृहाच्या भावनेचा आदर करत अभ्यंकरांचा प्रस्ताव मागे घेत आहोत अशी घोषणा आमदार अनिल परब यांनी केली. त्यानंतर सचिन अहिर यांची विधान परिषदेचे उपसभापतीपदी निवड झाल्याचे सभापती राम शिंदे यांनी घोषणा केली. (Ahir elected unopposed as Deputy Chairman of Legislative Council)
अहिरांकडे गोल योग्य वेळी कसा मारायचा अनुभव
. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदनपर भाषणात अहिर हे अष्टपैलू नेतृत्व असून हे नेतृत्व शरद पवारांच्याकडे तयार झाले असल्याने त्यांनी योग्य वेळी गोल कसा मारला पाहिजे याचा नेमका अनुभव त्यांच्याकडे आहे असा टोला मारला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सचिन अहिर यांनी विधानसभा सदस्य, राज्यमंत्री आणि विधान परिषद सदस्य म्हणून विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. जनसामान्यांच्या प्रश्नांबाबत संवेदनशील भूमिका, अभ्यासू वृत्ती, निर्भीड कार्यशैली आणि सर्वांशी सुसंवाद राखण्याची क्षमता ही त्यांची जमेची बाजू असून, उपसभापतीपदाची जबाबदारी ते समर्थपणे पार पाडतील.
उपसभापती पद हे घटनात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे असून, या पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तीने सर्व सदस्यांना समान न्याय देणे अपेक्षित असते. सचिन अहिर आपल्या संयमी, निष्पक्ष आणि सर्वसमावेशक कार्यपद्धतीमुळे सभागृहाच्या गौरवशाली परंपरांना अधिक बळकटी देतील, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
सचिन अहिर षटकार मारल्याशिवाय थांबणार नाहीत
सचिन आहिर हे जेष्ठ, अभ्यासू अष्टपैलू आणि अनुभवी मास्टर ब्लास्टर सचिन अहिर यांची सर्वोच्च सभागृहाच्या बिनविरोध निवड ही सभागृहासाठी अभिमानाची बाब आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक केले. आमच्या संघात एक आणखी ऑलराऊंडर आला असून गोलंदाज कोणताही असो, चेंडू किती वेगवान असो, सचिन अहिर षटकार मारल्याशिवाय थांबणार नाहीत अशा शब्दात कौतुक केले. (Ahir elected unopposed as Deputy Chairman of Legislative Council)
सभागृहाचे कामकाज निष्पक्षपणे चालवणार
. उपसभापतीपद हे केवळ सन्मानाचे नसून अत्यंत जबाबदारीचे पद असल्याचे सांगून ते सभागृहाचे कामकाज निष्पक्षपणे, संयमाने आणि संसदीय नियमांचे पालन करून चालवतील. सभागृहातील सर्व सदस्यांना समान न्याय देत लोकशाही मूल्ये आणि संसदीय परंपरा अधिक समृद्ध करण्याचे कार्य उपसभापती सचिन अहिर करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सर्वसामान्य जनता, कष्टकरी, कामगार आणि महाराष्ट्राच्या मातीशी असलेली माझी बांधिलकी कालही होती, आजही आहे आणि उद्याही कायम राहील. उपसभापती म्हणून पक्षभेद न करता प्रत्येक सदस्याला समान न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीन, अशी ग्वाही विधान परिषदेचे नवनिर्वाचित उपसभापती सचिन अहिर यांनी दिली. (Ahir elected unopposed as Deputy Chairman of Legislative Council)