कमला पसंद मसाला… ६० हजार कोटींचा चुना

कानपूरचे सुपारी व्यापारी मनोज कुमार अग्रवाल आणि पान मसाला उत्पादक कमला पसंद समूह यांच्यातील कथित आर्थिक गैरव्यवहारांबाबत एक धक्कादायक दावा समोर आला आहे. कमला पसंदच्या नावाखाली गेल्या सहा वर्षांत सुमारे ६० हजार कोटी रुपयांचा बेहिशेबी सुपारी व्यापार करण्यात आल्याचा दावा कोब्रा पोस्टनं केला आहे. मोठ्या प्रमाणावर करचुकवेगिरी, बेनामी कंपन्यांचा वापर, हवाला व्यवहार, रोख पैशांची उलाढाल आणि बनावट बिलिंगच्या माध्यमातून हा व्यवसाय चालवला गेला. (Cobrapost Exposed Kamla Pasand Scam)

बनावट कंपन्यांद्वारे गैरव्यवहार

‘कोब्रापोस्ट’ने प्रसिद्ध केलेल्या विशेष अहवालात अग्रवाल यांचे माजी सहकारी कुश जैस्वाल यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्याच्या आधारे कोब्रा पोस्टनं यासंदर्भात अनेक गौप्यस्फोट केले आहेत. त्यांच्या वृत्तांतानुसार कुश जैस्वाल यांनी सांगितले की, २०१७ च्या सुमारास त्यांची मनोज अग्रवाल यांच्याशी ओळख झाली. सुरुवातीला त्यांना दुसऱ्यांच्या नावानं कंपन्या स्थापन करण्याचं काम देण्यात आलं. मेरठमध्ये मित्राच्या मुलाच्या नावावर सतगुरू ट्रेडर्स ही कंपनी सुरू करण्यात आली. अवघ्या सात-आठ महिन्यांत या कंपनीतून ७० ते ८० कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याचा दावा आहे. मात्र, जीएसटी विभागाच्या छाप्यानंतर कंपनी बंद करण्यात आली. ज्याच्या नावावर कंपनी होती, त्याला कोणतीही मदत करण्यात आली नाही, असा आरोप जैस्वाल यांनी केला आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण व्यवहारात त्यांनी प्रत्यक्ष सुपारीचा एक तुकडाही पाहिला नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.

यानंतर दिल्लीतील एका बैठकीत मनोज अग्रवाल यांनी संपूर्ण व्यावसायिक आराखडा समजावून सांगितला. त्यानुसार दिल्ली, गुरुग्राम, नागपूर, इंदूर आणि कोलकाता येथे प्रत्येकी दोन अशा अनेक कंपन्या स्थापन करण्यात आल्या. प्रत्येक कंपनीचा वार्षिक व्यवहार १०० कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवण्याचं नियोजन होतं. जेणेकरून सरकारी तपास यंत्रणांचं लक्ष वेधलं जाणार नाही. व्यवहाराची मर्यादा गाठल्यानंतर कंपनी बंद करून नव्या नावाने दुसरी कंपनी सुरू केली जात असे. (Cobrapost Exposed Kamla Pasand Scam)

कायदेशीर व्यवहाराचा आभास

अहवालानुसार, दक्षिण भारतातून कच्ची सुपारी आणली जात असे. तिची प्रक्रिया गुरुग्राममध्ये करून ती नागपूर, इंदूर, रायपूर, कोलकाता, गुवाहाटी यांसारख्या केंद्रांवर पाठवली जात होती. मात्र या व्यापाराचा मोठा भाग अधिकृत नोंदीबाहेर ठेवण्यात येत असे. वस्तूंची विक्री रोखीने दाखवली जात असे, त्यासाठी लहान-लहान बनावट बिले तयार केली जात आणि त्याच प्रमाणात गोदामातील नोंद न केलेला माल बाहेर काढला जात असे. त्यामुळं कागदोपत्री साठा आणि प्रत्यक्ष साठा यामध्ये तफावत दिसत नसे.(Cobrapost Exposed Kamla Pasand Scam)

या कथित योजनेत मोठ्या प्रमाणावर रोख रकमेचा वापर होत असल्याचंही त्यांनी सांगितलं. विविध शहरांमध्ये विक्रीतून मिळालेला रोख पैसा संबंधित कंपन्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा केला जात असे. त्यानंतर आरटीजीएसच्या माध्यमातून तो पैसा कोलकाता, नागपूर, दिल्ली आणि गुरुग्राममार्गे पुन्हा मूळ कंपन्यांकडे पोहोचवला जात असे. या प्रकारामुळे व्यवहार कायदेशीर असल्याचा आभास निर्माण होत असे.

जैस्वाल यांच्या मते, या संपूर्ण साखळीत अनेक गोदामं आणि प्रक्रिया केंद्रं वापरली जात होती. दिल्लीजवळील बकोली, नरेला, अलीपूर आणि इतर भागांतील गोदामांमध्ये मोठ्या प्रमाणावर नोंद न केलेली सुपारी साठवून ठेवली जात असे. गुरुग्राममधील कथित ‘डमी’ प्रक्रिया केंद्रात कागदोपत्री काम दाखवलं जाई; प्रत्यक्ष प्रक्रिया मात्र कमला पसंद समूहाशी संबंधित कारखान्यांमध्ये होत असल्याचा दावा त्यांनी केला. (Cobrapost Exposed Kamla Pasand Scam)

ई-वे बिलचा गैरवापर

या व्यवहारात **ई-वे बिलचा गैरवापर** केल्याचाही गंभीर आरोप आहे. एका ट्रकसाठी तयार केलेलं एकच ई-वे बिल त्याच्या वैधतेच्या कालावधीत अनेक वेळा वापरलं जात असे. उदाहरणार्थ, दिल्ली ते गुरुग्राम हा प्रवास काही तासांचा असल्यानं एकाच ई-वे बिलावर आठ ते दहा वेळा मालाची वाहतूक केली जात असे. कागदोपत्री एक ट्रक दाखवला जात असला तरी प्रत्यक्षात अनेक ट्रक बेहिशेबी माल वाहून नेत असत, असा दावा आहे.

रोख पैशांच्या वाहतुकीसाठी हवाला नेटवर्कचा वापर झाल्याचाही आरोप करण्यात आला आहे. नागपूर, रायपूर, कोलकाता आदी ठिकाणांहून कोट्यवधी रुपये रोख स्वरूपात विविध वाहनांद्वारे हलवले जात असत. काही वेळा स्कॉर्पिओसारख्या वाहनांतून दहा-दहा कोटी रुपयांची वाहतूक होत असल्याचं जैस्वाल यांनी सांगितलं. या संपूर्ण व्यवहारात हवाला ऑपरेटर आणि काही खासगी बँकांची मदत घेतल्याचाही दावा त्यांनी केला आहे. (Cobrapost Exposed Kamla Pasand Scam)

यानंतर जैस्वाल यांच्या सांगण्यानुसार हरियाणातील दारुहेरा आणि मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे त्यांच्या नातेवाईकांच्या नावाने आणखी दोन प्रक्रिया केंद्रं सुरू करण्यात आली. त्यावेळी पुढे सर्व व्यवहार अधिकृत पद्धतीने होतील, असं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र प्रत्यक्षात पूर्वीचाच प्रकार सुरू राहिला. त्यांच्या म्हणण्यानुसार, ३० ते ३५ ट्रक अधिकृत बिलांवर पाठवले जात असताना त्याच्या बदल्यात सुमारे ३०० ट्रक बेहिशेबी माल पाठवला जात होता.

जैस्वाल यांची छळवणूक

जैस्वाल यांनी आणखी एक गंभीर आरोप केला आहे. मनोज अग्रवाल यांच्यापासून दूर गेल्यानंतर त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिसांकडून अटक करण्याचे प्रयत्न झाले, त्यांच्या हालचालींवर नजर ठेवण्यात आली आणि जिवाला धोका निर्माण झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळं ते सतत ठिकाण बदलत राहिले. (Cobrapost Exposed Kamla Pasand Scam)

त्यांच्या मते, सहा वर्षांच्या कालावधीत झालेल्या व्यवहारांची कागदपत्रे, बँक स्टेटमेंट्स आणि कथित ‘कच्चे हिशेब’ त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. त्यावरून या व्यवहारांची एकूण किंमत ६० हजार कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकते, असा त्यांचा दावा आहे. तसेच व्यवहारांमध्ये सांकेतिक भाषेचा वापर होत असे. उदाहरणार्थ, ‘एक बॉक्स’ म्हणजे एक लाख रुपये, तर ‘५०० बॉक्स’ म्हणजे पाच कोटी रुपये. अशा सांकेतिक शब्दांत व्यवहारांची चर्चा व्हॉट्सअॅपवर होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

या सर्व आरोपांबाबत कोब्रापोस्टनं मनोज अग्रवाल आणि कमला पसंद समूहाला सविस्तर प्रश्नावली पाठवली, मात्र त्यांच्याकडून कोणतंही उत्तर मिळालं नसल्याचं कोब्रापोस्टनं म्हटलंय. या एकूण प्रकरणामुळं देशातील सुपारी आणि पानमसाला उद्योगातील आर्थिक व्यवहारांबाबत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. (Cobrapost Exposed Kamla Pasand Scam)

सरकारी यंत्रणा या प्रकरणाची दखल कशी घेतात आणि काय कारवाई करतात, हेही पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Related posts

अर्जेटिनाला कडवी झुंज देणारा  केप वर्दे हा देश कुठे आहे?

गर्व से कहो – खड्डा है !

मंदिरे पाडून लुटणारे आणि बांधून लुटणारे!