महाराष्ट्रात दोन वर्षांत ९३ हजार महिला बेपत्ता 

93 thousand women missing in Maharashtra in two years

जमीर काझी :  मुंबई :  राज्यात गेल्या दोन वर्षांत तब्बल ९३ हजार ९४० महिला बेपत्ता झाल्या असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारितील गृह विभागाने दस्तरखूद ही माहिती मंगळवारी विधानसभेत दिली आहे . बेपत्ता असलेल्यापैकी ६७ हजार ४५८ महिलांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे.सुमारे ७१.८ टक्के पुनर्प्राप्ती दर नोंदवण्यात आला आहे.

 आमदारांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील गृह विभागाने २०२४ आणि २०२५ या वर्षांतील बेपत्ता महिला व बालकांची सविस्तर आकडेवारी सभागृहात मांडली. तसेच, २०१५ पासून ‘ऑपरेशन मुस्कान’ अंतर्गत ४१ हजार १९३ अल्पवयीन मुला-मुलींचा शोध लावण्यात आल्याची माहिती लेखी उत्तरात देण्यात आली आहे. त्यानुसार २०२४ मध्ये राज्यात ४५ हजार ६६२ महिला बेपत्ता झाल्या असून त्यापैकी ३० हजार ८७७ (सुमारे ६७.६ टक्के) महिलांचा शोध लागला आहे. तर २०२५ मध्ये ४८हजार २७८ महिला बेपत्ता झाल्या असून त्यापैकी ३६ हजार ५८१ (सुमारे ७५.७ टक्के) महिलांना शोधण्यात यश आलं आहे. एकूण दोन वर्षांत ९३ हजार ९४० महिला बेपत्ता झाल्या असून त्यापैकी ६७ हजार ४५८ महिलांचा शोध लागल्याची माहिती सरकारनं दिली. (93 thousand women missing in Maharashtra in two years)

अल्पवयीन मुलींची चिंताजनक स्थिती

२०२४ मध्ये राज्यात ११ हजार ३१३ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या. त्यापैकी ८ हजार ४७५ मुलींचा शोध लागला असून पुनर्प्राप्ती दर ७४.९ टक्के आहे.

२०२५ मध्ये १२ हजार ११३ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या. त्यापैकी १० हजार २९५ मुलींचा शोध लागला असून पुनर्प्राप्ती दर ८४.९ टक्के आहे.

दोन वर्षांत एकूण २३ हजार ४२९ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या असून त्यापैकी १८ हजार ७७० मुलींचा शोध लावण्यात आला आहे. एकूण पुनर्प्राप्ती दर ८०.१ टक्के इतका आहे.

मुंबई, नवी मुंबई, रायगड, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या भागांत २०२४-२५ या कालावधीत १५ ते १८ वयोगटांतील ४ हजार ९८९ मुलं-मुली बेपत्ता झाली. त्यापैकी ४ हजार ८१३ जणांचा (९६ टक्के) शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. (93 thousand women missing in Maharashtra in two years)

गृह विभागाच्या माहितीनुसार, जुलै २०१५ ते डिसेंबर २०२४ या कालावधीत १३ टप्प्यांत ‘ऑपरेशन मुस्कान’ राबविण्यात आलं. या मोहिमेदरम्यान ४१ हजार १९३ अल्पवयीन मुला-मुलींचा शोध लावण्यात आला. सध्या चौदावे ‘ऑपरेशन मुस्कान’ सुरू असून १६ फेब्रुवारीपर्यंत १ हजार ४०१ अल्पवयीन (४५४ मुले व ९४७ मुली) शोधण्यात आले आहेत. (93 thousand women missing in Maharashtra in two years)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर