कोल्हापूर : प्रतिनिधी : शारदीय नवरात्रोत्सवाच्या चौथ्या दिवशी करवीनिवासिनी अंबाबाईची कात्यायणी रुपात अलंकार पूजा बांधण्यात आली. देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. मंदिरात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. गुरुवारी नवरात्रोत्सवातील ललिता पंचमी असून अंबाबाईची पालखी टेंबलाई टेकडीवरील त्र्यंबोली देवीच्या भेटीस जाणार आहे. (Worship of Goddess Ambabai in the form of Katyayani)
आज बुधवारी दुपारी अंबाबाईची कात्यायणी रुपात पूजा बांधण्यात आली. देवीच्या हातात घंटा, त्रिशूल, नांगर, शंख, भुसक (मुसळ), चक्र, धनुष्य-बाण व कमळ घेतलेले आहे. देवी महासरस्वती,जिचा वर्ण पूर्णचंद्रासारखा, शीतल, शुभ्र आहे.
देवीमाहात्म्य या ग्रंथातील उत्तम,उत्तरचरित्राची नायिका ही महासरस्वती कौशिकी आहे. ती अष्टभुजा असून तिने घंटा, त्रिशूळ, नांगर, शंख, मुसळ, चक्र, धनुष्य आणि बाण धारण केले आहेत. तिची अंगकांती शरद ऋतूतील ढगांच्या आडून पडणाऱ्या चंद्राच्या शीतल प्रकाशासारखी अत्यंत तेजस्वी आणि पांढरीशुभ्र आहे. (Worship of Goddess Ambabai in the form of Katyayani)
शुभ आणि निशुंभ यांना मारण्यासाठी ही देवता गौरीच्या म्हणजेच पार्वतीच्या शरीरातून प्रकट झाली. पुढे युदधामध्ये या देवतेच्या मदतीसाठी ब्राह्मी, महेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, चामुंडा, नारसिंही, ऐंद्री आणि शिवदूती या मातृका येतात. देवीमाहात्म्य अंतर्गत वैकृतीकरहस्यामध्ये महासरस्वती कौशिकी मध्यवर्ती पूजायची झाल्यास तिच्या सोबत वर उल्लेख केलेल्या मातृका, गणपती आणि रुद्र पूजावेत असा संकेत आहे. देवीची अलंकार पूजा वेदांग मुनिश्वर, अजिंक्य मुनिश्वर, अभिषेक मुनिश्वर, रवि माईणकर यांनी बांधली. (Worship of Goddess Ambabai in the form of Katyayani)