सिनेमातला हिरो दक्षिणेत नेता का बनतो?
मुंबईने महाराष्ट्राला भांडवल दिले, पुण्याने सांस्कृतिक प्रमाण दिले; पण या दोघांनी मिळून एकसंध मराठी सांस्कृतिक चेतना घडवली नाही. त्यामुळे महाराष्ट्र दक्षिण भारतासारखा एखाद्या सिनेस्टारच्या मागे वेड्यासारखा धावला नाही — कारण मराठी समाजाचे अस्मिताभानच मुंबई, पुणे आणि ग्रामीण महाराष्ट्र अशा तीन वेगळ्या केंद्रांत तुटून पडले होते.
विनय गुप्ते
यात भांडवलाच्या स्वरूपाचाही मोठा फरक होता. दक्षिणेत ज्याच्या हातात पैशाचा निर्णय होता, तो अनेकदा त्याच भाषिक-सांस्कृतिक जगाचा भाग होता. तामिळ उद्योगपती तामिळ समाजातच प्रतिष्ठित होता; तेलुगू भांडवलदार तेलुगू समाजाच्या aspiration चा भाग होता; कन्नड किंवा मल्याळी उद्योजक स्थानिक समाजाला परका वाटत नव्हता. महाराष्ट्रात मात्र पैशाचा अंतिम निर्णय मराठी समाजाच्या हातात क्वचितच राहिला. मुंबईतील मोठे भांडवल बंदर, व्यापार, कापूस, वित्त, पारशी-गुजराती-मारवाडी-इंग्रजी व्यापारी नेटवर्क आणि औपनिवेशिक जागतिक बाजाराशी जोडलेले होते. त्यामुळे मराठी माणूस पैसा निर्माण करणाऱ्या श्रमसाखळीत होता; पण पैशाचे निर्णय घेणाऱ्या मालकी-साखळीत अनेकदा नव्हता. यामुळे दक्षिणेत पैसा “आपल्या समाजातून वर आलेली शक्ती” वाटला; महाराष्ट्रात पैसा अनेकदा “आपल्या भूमीवर असलेली पण आपल्या भाषेत न बोलणारी सत्ता” वाटला. (Why does a film hero become a political leader in the South?)
हा फरक फक्त आर्थिक नव्हता; तो सांस्कृतिक आत्मविश्वासाचा होता. ज्याच्या भाषेत पगार मिळतो आणि ज्याच्या भाषेत भांडवल मिळते, ह्या दोन गोष्टी वेगळ्या झाल्या की समाजाची upward mobility संस्कृतिक दृष्ट्या तुटक होते. कारण त्यामुळे Lookup to चेहरे बदलतात. दक्षिणेत या दोन्हींचा सांस्कृतिक दुवा जास्त टिकला; महाराष्ट्रात तो दुवा मुंबईतच कमकुवत झाला. भौगोलिक परिस्थितीनेही हा दुभंग वाढवला. महाराष्ट्रात सह्याद्री, घाट, कोकण, दख्खन पठार आणि मुंबईचे बंदर यामुळे आर्थिक प्रवाह एका बाजूला खेचले गेले. जुने अंतर्गत व्यापारी मार्ग आणि नवे औपनिवेशिक trade routes शेवटी मुंबईच्या बंदरात येऊन जमा झाले. त्यामुळे मुंबई जागतिक बाजाराशी जोडली गेली; पण उर्वरित महाराष्ट्राचा मोठा भाग कृषी, सहकार, स्थानिक बाजार आणि प्रादेशिक सत्तांमध्येच अडकून राहिला. दक्षिणेत मात्र समुद्रकिनारा, पठारी भाग, मंदिर-नगरे, अंतर्गत बाजारपेठा आणि औद्योगिक clusters यांची साखळी तुलनेने सलग राहिली. जुने व्यापारी मार्ग पूर्णपणे तुटले नाहीत; नव्या औद्योगिकीकरणाने त्यांनाच कोईम्बतूर, त्रिप्पूर, सालेम, गुंटुर, बेंगळुरू, हैद्राबाद अशा केंद्रांत नवी ऊर्जा दिली.
दक्षिण भारतात म्हणून सांस्कृतिक सलगता अधिक अबाधित राहिली. गाव, भाषा, देवस्थान, जात-समुदाय, स्थानिक उद्योग, सिनेमा आणि राजकारण हे एकमेकांपासून तुटले नाहीत. तामिळ, तेलुगू, कन्नड किंवा मल्याळी माणूस आधुनिक झाला, उद्योगपती झाला, आयटीत गेला, परदेशात गेला, तरी त्याचे सांस्कृतिक संदर्भ पूर्णपणे बदलले नाहीत. त्याच्या यशाची भाषा अजूनही त्याचीच भाषा राहिली. म्हणून दक्षिणेत “मोठे होणे” म्हणजे मूळ सोडणे नव्हते; ते मूळ मोठ्या व्यासपीठावर नेणे होते.
सिनेस्टारही तिथे फक्त मनोरंजन करणारा चेहरा राहिला नाही; तो गाव, भाषा, आई, जमीन, देव, अन्याय, सन्मान आणि प्रादेशिक अस्मिता यांचे दृश्य प्रतीक बनला. हीच सांस्कृतिक नाळ अबाधित राहिल्यामुळे दक्षिणेत सिनेमा, राजकारण आणि समाज यांच्यातील प्रवाह एकाच दिशेने वाहू शकला. (Why does a film hero become a political leader in the South?)