When It All Began : राकेश मारिया :सिर्फ नाम ही काफी है!!

When It All Began

 आपल्या असामान्य कर्तृत्वामुळे काही व्यक्तिमत्व एखादे क्षेत्र, विभागाशी इतके एकरूप होऊन जातात की ते त्या त्या क्षेत्राची ओळख बनून अजरामर होतात, सत्यागृह,अहिंसात्मक आंदोलन म्हटले राष्ट्रपिता महात्मा गांधी,तसेच सनईवादनाशी बिस्मिला खाँ, अभिनय दिलीपकुमार, क्रिकेटशी सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, गायनाशी लता मंगेशकर यांचे जे घट्ट नाते बनले आहे, ते कधीही वेगळे होऊ शकत नाही. अगदी तसेच मुंबई पोलीस दलाशी एकाची नाळ जोडली गेली आहे, ते म्हणजे राकेश मारिया. हे नाव ओलाडून कोणीही पुढे जाऊ शकत नाही.

जमीर काझी

 महाराष्ट्र व मुंबई पोलीस दलात अनेक कर्तबगार अधिकारी होऊन गेले आहेत. ज्यांनी आपल्या कल्पक नेतृत्व आणि कर्तृत्वामुळे या खात्याचे नाव देश व जगात उंचावलेले आहे.त्यामध्ये मारिया यांचे नाव वरच्या स्तरावर आहे. तब्बल ३८ वर्षे खाकी वर्दीची सेवा करताना या राजबिंडा व्यक्तिमत्वाच्या आयपीएस अधिकाऱ्याने ज्या पद्धतीने डिटेक्शनमध्ये काम केले आहे. त्याला तोड नाही. विशेषतः मुंबई अंडरवर्ल्डची पाळेमुळे उलगडुन काढताना त्यांनी आपल्या सोर्ससचे जे नेटवर्क उभे केले, ते सर्वसामान्याच्या कल्पनाशक्तीच्याही बाहेर आहे. (When It All Began)

झोकून देऊन छडा लावण्याचा स्वभाव

एकाद्या घटनेचा,गुन्ह्याचा छडा लावताना त्याच्या मुळापर्यत जाणे आणि त्यासाठी केवळ अधिकाऱ्यांना सूचना देऊन ज्युनियरवर विसंबून न राहणे, हे त्यांच्या स्वभावात नाही. स्वतः त्यामध्ये झोकून देऊन जोपर्यंत पूर्ण छडा लागल्याशिवाय ते स्वस्थ बसत नव्हते. त्यामुळे एखाद्या घटनेबद्दल वरिष्ठांना, मंत्र्यांना ब्रिफींग करताना किंवा पत्रकार परिषदेतही त्यांना कधीच हातात नोट्स, कागदाचा चिठोरा घेण्याची गरज लागत नसे. तारीख,वेळेपासून आरोपीच्या वैयक्तिक,आणि क्रिमिनल रेकॉर्ड इत्यभूत माहिती त्यांच्या डोक्यात फिट बसलेली असे.  

बिकट प्रसंगी फ्रंटफुटवर

 मुंबईतील १९९३ची बॉम्बस्फोट मालिका आणि २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यासारख्या देशातील अत्यंत महत्त्वाच्या तपासांतून ही बाब जगासमोर अधोरेखित झाली. मारियनी आपली पूर्ण कारकीर्द प्रत्येक महत्वाच्या घटना, बिकट प्रसंगावेळी ‘फ्रंटफुट ‘वर राहत सहकार्याचे खात्याचे मनोधर्य वाढविणाचे काम केले. त्याला अपवाद राहिला तो अखेरच्या वर्षे, दीड वर्षाचा. राजकीय द्वेषातून सत्ताधाऱ्याकडून त्यांना जाणीवपूर्वक ‘होमगार्ड्’चे डीजी म्हणून निवृत्त केले गेले. त्यांनी आपल्या पूर्ण कारकिर्दीसह या काल खंडाचा सविस्तर आढावा त्यांनी , ‘लेट मी से इट नाऊ’ या २०२० मध्ये प्रकाशित झालेल्या आत्मचरित्रामध्ये आपल्यापरीने मांडला आहे. (When It All Began)

या राजबिंड्या व्यक्तीमत्वाच्या मुंबई अंडरवर्ल्ड चा जणू चालता बोलता ‘इन सायक्लोपीडिया’ असणाऱ्या या अधिकाऱ्याबद्दल इतके विस्तुतपणे कथन करण्याचे कारण म्हणजे शुक्रवारी सायंकाळी जुहू येथे त्यांच्या ‘व्हेन इट ऑल बिगन’ या पुस्तकाचे प्रकाशन अत्यंत उत्साहात पार पडले. या कौटुंबिक सोहळ्यात बॉलीवूड,पोलीस, जर्नलिझमसह अन्य क्षेत्रातील मान्यवर हजर होते. मोजक्याच निकटवर्तीयांना मारिया यांनी स्वतः हून स्वतः फोन करून बोलाविल्याने हॉल तुडुंब भरून गेला होता.  

  काय आहे या पुस्तकात?

अंडरवर्ल्डमधील ज्या अंतर्गत घटना, घडामोडी आणि त्यामागील कारणे या पुस्तकात सविस्तरपणे मांडल्या आहेत.ज्या आतापर्यंत कधीही उघडकीस आलेल्या नव्हत्या. त्यासाठी  राकेश मारिया यांना डायरी लिहिण्याची सवय अत्यंत उपयुक्त ठरली आहे. पोलीस दलात रुजू झाल्यापासून ते निवृत्तीच्या दिवसापर्यतच्या ३८ वर्षाच्या दीर्घ प्रवासात रोज सानिध्यात येणाऱ्या व प्रत्येक महत्वाच्या घटनाची नोंद त्यांनी करून ठेवली होती. त्यामुळे

१९८० च्या दशकात मुंबईत गुन्हेगार जगताची दहशत केवळ देशातच नव्हे तर परदेशातही चर्चेचा विषय बनली होती.मात्र त्याची पाळेमुळे स्वातंत्र्यपूर्व काळापासून म्हणजेच १९३० पासून रुजत गेली होती. त्याचा आढावा या ठिकाणी आहे. (When It All Began)

पुढे समुद्रमार्गे तस्करीच्या माध्यमातून गडगंज झालेल्या गँगस्टरनी डोंगरी, पायधोनी, नागपाडा, आग्रीपाडा आणि भायखळा हा परिसर आपल्या दहशतीने व्यापून टाकला होता. या रस्त्यांनी पाहिलेल्या काही रक्तरंजित टोळीयुद्धे आणि दहशतीच्या राजवटी पाहिल्या. 

टोळी युद्धातील रक्तरंजित संघर्ष टिपला

   मुंबईतील पहिल्या एका भयानक डॉनपैकी मानले जाणाऱ्या अब्दुल करीम शेरखान पठाण उर्फ करीम लाला, त्याने पठाण सरदार बाबुल खान आणि जुम्मा खान यांच्याशी व्यापाराच्या युक्त्यांमध्ये प्रभुत्व मिळवले आणि हळूहळू त्याचे वर्चस्व प्रस्थापित केले. बाजारपेठेतील लहान गुन्हेगार ‘दादा’ आणि ‘भाई’ मध्ये विकसित होऊ लागले आणि त्यांनी स्वतःच्या टोळ्या बनवल्या.करीम लाला, हाजी मस्तान यांच्या पुढच्या पिढीत सत्ता संघर्ष अस्थिर होत गेला. त्यातून दाऊद इब्राहिम आणि त्याचे साथीदारांचा रक्तरंजित संघर्ष कसा पराकोटीला पोहोचत गेला, अशी दुर्मिळ माहिती, महत्त्वाच्या घटना आणि प्रत्येक वळणावर टोळीयुद्धांची किनार टिपली आहे.

हाजी मस्तान,आणि दिलीप अजीज, वलपाईन वरदची तस्करी, खंडणी आणि इतर रॅकेटचा इतिहास विषद केला आहे. टेमकर लेनचे येथील हवालदार इब्राहिम कासकर याची मुले, साबीर आणि दाऊद, जो आज डी गँगचा मोहरक्या म्हणून कुप्रसिद्ध आहे. आणि गिरगांवातील अरुण गवळी यांच्या वाढत्या वर्चस्वाची माहिती वाचकांना श्वास रोखून लावणारी आहे. मुंबईच्या अंडरवर्ल्डबद्दल जिज्ञासा असलेल्या प्रत्येकाने हे पुस्तक आवर्जून वाचावयास हवे, 

 अनुभवाचा वापर करून घेणे गरजेचे 

 सत्तरीच्या उंबरठ्यावर असलेले राकेश मारिया यांची कुशाग्र बुद्धिमत्ता, स्मरणशक्ती आणि शारीरिक फिटनेस आजही तसाच आहे.गेल्या काही वर्षात महाराष्ट्र व मुंबई पोलीस दलाची प्रतिमा सर्वच बाबतीत प्रचंड खालावत चालली आहे, अशा परिस्थितीत पूर्वीचा नावलौकिक मिळविणे, अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविणे आणि बेटर पॉलिसिंग साठी सरकारने त्यांच्या सारख्या असामान्य नेतृत्वगुण असलेल्या अधिकाऱ्यांचा अनुभव,कौशल्य व मार्गदर्शन घेणे नितांत गरजेचे आहे.मात्र केवळ राजकीय साठमारीत अडकलेल्या सत्ताधाऱ्यांकडून अशी अपेक्षा ठेवणे, म्हणजे वाळवंटात हिमनग शोधण्यासारखेच आहे.

तूर्तास इतकेच.

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर