मन मे है विश्वास’… आणि त्या विश्वासाला भेटले ‘विकास’!

Vikas’ meets Vishwas

जीवनात काही क्षण असे असतात की ते फक्त घडत नाहीत, तर आयुष्यभरासाठी मनात कोरले जातात. नंदुरबार तालुक्यातील वाघाळे गावातील एका साध्यासुध्या अभ्यासिकेत आज असाच एक क्षण घडला आणि त्याचा साक्षीदार झाला संपूर्ण गाव.

महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे जिल्हा दौऱ्यावर होते. विविध कामांची पाहणी करत असताना त्यांनी वाघाळे येथील जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या अभ्यासिकेला भेट दिली. गावातील युवक-युवती स्पर्धा परीक्षांच्या तयारीत मग्न होते. शांत वातावरण, पुस्तकांत हरवलेली स्वप्ने आणि भविष्य घडविण्याची धडपड सुरू होती.याच वेळी श्री. खारगे यांची नजर एका युवकावर गेली. त्या युवकाचे नाव होते अक्षय गांगर्डे. (‘Vikas’ meets Vishwas)

आणि विश्वास नांगरे पाटील यांना केला मोबाईल कॉल

अक्षय आपल्या अभ्यासात इतका तल्लीन होता की त्याला सभोवतालचे भानही नव्हते. त्याच्या हातात भारतीय पोलीस सेवेतील वरिष्ठ अधिकारी विश्वास नागरे-पाटील यांचे ‘मन मे है विश्वास’ हे पुस्तक होते. श्री. खारगे काही क्षण त्या पुस्तकाकडे पाहत राहिले. ते अक्षयच्या शेजारी जाऊन उभे राहिले आणि प्रेमाने विचारले, “या पुस्तकाचे लेखक तुला माहिती आहेत का?” अक्षयने तत्परतेने उत्तर दिले, “हो सर, विश्वास नांगरे-पाटील!” “कधी भेटला आहेस का त्यांना?” “नाही सर.” “मग बोलला आहेस का?” अक्षय थोडासा संकोचला. “नाही सर… बोलायची भीती वाटते.” हे उत्तर ऐकताच श्री. खारगे यांनी तत्काळ आपला मोबाईल काढला आणि विश्वास नांगरे-पाटील यांना मोबाईल कॉल केला. काही क्षणांतच त्यांनी अक्षयचा संवाद त्याच्या प्रेरणास्थानाशी घडवून आणला.

फोनवरील संवाद सुरू झाला आणि अक्षयचा आनंद गगनात मावेनासा झाला. ज्या व्यक्तीचे पुस्तक हातात घेऊन तो स्वप्ने रंगवत होता, ज्या अधिकाऱ्याच्या कार्यातून तो प्रेरणा घेत होता, त्या विश्वास नांगरे-पाटील यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधी त्याला मिळाली होती. (‘Vikas’ meets Vishwas)

माझे रोड मॉडेल विकास खारगे सर

याच संवादादरम्यान विश्वास नागरे-पाटील यांनी अक्षयला एक अशी गोष्ट सांगितली, ज्याने उपस्थित सर्वांनाच सुखद धक्का दिला. ते म्हणाले,“अक्षय, तुझा रोल मॉडेल जरी मी असलो, तरी माझे रोल मॉडेल आदरणीय विकास खारगे सर आहेत.”

हे शब्द ऐकताच अभ्यासिकेत एक वेगळीच भावना दाटून आली. ज्यांना आदर्श मानून अक्षय स्पर्धा परीक्षांची तयारी करत होता, त्या विश्वास नांगरे-पाटील यांचेही आदर्श स्वतः समोर उभे आहेत, हे ऐकून अक्षय भारावून गेला. उपस्थित युवकांच्या चेहऱ्यावर आश्चर्य, आनंद आणि प्रेरणेचे भाव एकाच वेळी उमटले.एका बाजूला आपल्या आदर्शाशी बोलण्याचे स्वप्न पूर्ण होत होते आणि दुसऱ्या बाजूला यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या व्यक्तीदेखील कोणाकडून प्रेरणा घेतात, हा जीवनाचा मोठा धडा त्या क्षणी युवकांना मिळत होता. (‘Vikas’ meets Vishwas)

त्या काही मिनिटांच्या संवादाने केवळ अक्षयच नव्हे, तर उपस्थित प्रत्येक युवकाच्या मनात आत्मविश्वासाची नवी ज्योत पेटली. स्वप्नांना आकार देण्यासाठी मेहनतीसोबत विश्वासही तितकाच महत्त्वाचा असतो, याची जाणीव त्या क्षणी सर्वांना झाली. उपस्थित ग्रामस्थांसाठीही हा अनुभव वेगळाच होता. प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेतात, त्यांची छोटीशी इच्छा ओळखतात आणि ती पूर्ण करण्यासाठी तत्परतेने पुढाकार घेतात, हे पाहून सर्वांनाच प्रशासनाचा संवेदनशील चेहरा अनुभवायला मिळाला.

या प्रेरणादायी भेटीदरम्यान जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, प्रांताधिकारी उषाराणी देवगुणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र सोनवणे, तहसीलदार प्रदीप पवार तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या सर्वांनी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि उत्साह जवळून अनुभवला.

योगायोग असा की अक्षयच्या हातात होते ‘मन मे है विश्वास’ आणि त्याच्या स्वप्नांना नवी ऊर्जा देण्यासाठी सोबत होते राज्या्सा महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे.म्हणूनच त्या भेटीनंतर उपस्थितांच्या मनात एकच भावना दाटून आली… “मन मे है विश्वास… आणि साथ मे है विकास!”

वाघाळेच्या त्या छोट्याशा अभ्यासिकेत घडलेला हा प्रसंग केवळ एका विद्यार्थ्याचा आणि त्याच्या प्रेरणास्थानाचा संवाद नव्हता; तो शासन,प्रशासन, प्रेरणा, संवेदनशीलता आणि माणुसकी यांचा सुंदर संगम होता. अक्षय गांगर्डेच्या आयुष्यातील हा क्षण कदाचित कधीही विसरला जाणार नाही. कारण आज त्याने केवळ आपल्या आवडत्या अधिकाऱ्याशी संवाद साधला नाही, तर स्वतःच्या स्वप्नांवरचा विश्वासही अधिक दृढ केला. आणि कदाचित म्हणूनच आजच्या  दिवसाची आठवण त्याच्या मनात कायम राहील… कारण कधी कधी एका फोन कॉलपेक्षाही मोठी गोष्ट असते ती म्हणजे, एखाद्याच्या स्वप्नांवर ठेवलेला अक्षय विश्वास. (‘Vikas’ meets Vishwas)

Related posts

पावसाळी अधिवेशनात सादर होणार महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक

महिला व ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवासासाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण ?