जमीर काझी : मुंबई : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूला दीड महिना उलटला असला तरी अद्यापही त्याचे गूढ उलगडलेले नाही. महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या घटनेवर आक्रमक भूमिका घेत, हा केवळ अपघात नसून तो एक नियोजित कट होता हे पुराव्यानिशी मांडत आहेत. तर दुसरीकडे, अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी वगळता अन्य नेते संथ चौकशीबाबत शांत असल्याचे चित्र आहे. त्यांच्या या निष्क्रियतेबद्दल सत्तेसाठी त्यांनी प्रफुल पटेल – सुनील तटकरे यांच्यासमोर लोटांगण घातले आहे, अशी घणाघाती टीका शरद पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते विकास लवांडे यांनी केली आहे. (Vikas Lawande launches a scathing attack)
ते म्हणाले,’अजितदादांच्या मृत्यूला दीड महिना पूर्ण झाला असला तरी, हा एक नियोजित कट होता अशीच चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात आहे. त्यांचे पुतणे रोहित पवार या प्रकरणाचा सर्व पातळ्यांवर पाठपुरावा करत आहेत. जगासमोर पत्रकार परिषद घेऊन ते सर्व पुरावे मांडत आहेत आणि मुद्द्यांच्या अनुषंगाने अत्यंत पारदर्शक तपास व्हावा यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. असे असताना, अजितदादांच्या राष्ट्रवादी पक्षाचे आमदार त्यांना न्याय मिळावा यासाठी कुठलेही प्रयत्न का करत नाहीत?, असा बोचरा सवाल लवांडे यांनी उपस्थित केला. केवळ मंत्रिपद मिळवण्यासाठी हे आमदार आपल्या प्रमुख नेत्यांची मर्जी राखण्यात धन्यता मानत आहेत, याची खंत वाटते. (Vikas Lawande launches a scathing attack)
विकास लवांडे म्हणाले,’ रोहित पवार यांची प्रामाणिक भूमिका या नेत्यांना का खटकते? याचबरोबर, भारतीय जनता पार्टीचे लोक अस्वस्थ असून त्यांना अजितदादांना न्याय मिळावा असे अजिबात वाटत नसल्याचा गंभीर आरोप लवांडे यांनी केला. अजितदादांच्या पक्षातील अमोल मिटकरी यांचा अपवाद वगळता, आमदार सुनील शेळके, आमदार अनिल पाटील आणि इतर काही आमदार केवळ पदाची आणि मंत्रिपदाची स्वप्ने पाहत आहेत. सत्तेच्या लालसेपोटी हे सर्व आमदार सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांसारख्या नेत्यांचे लांगुलचालन करत असून त्यांना खुश करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
ज्या अजितदादांनी पक्षाला आणि या आमदारांना सर्वकाही दिले, त्यांच्याच न्यायासाठी हे आमदार काहीही करत नाहीत, उलट जे लोक न्यायासाठी लढत आहेत, त्यांची या आमदारांना अडचण होत आहे, जर अजितदादांसारख्या मोठ्या नेत्याचा असा दुर्दैवी अंत सहज पचवला गेला, तर सामान्य माणसाला कधीही न्याय मिळणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
सामान्य माणसाने आता पेटून उठले पाहिजे, तरच न्याय मिळेल. जर न्याय मिळाला नाही, तर याला सध्याची शासन व्यवस्था आणि इथले क्रूर राजकारणच जबाबदार असेल. अजितदादांच्या पक्षातील आमदारांनी रोहित पवार यांच्या मागणीला साथ दिली पाहिजे, तरच न्याय मिळवण्यासाठी ताकद एकत्र येईल; अन्यथा ते फक्त सत्तेसाठी लालची आहेत,हेच सिद्ध होईल, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
विलीनकरणाचा मुद्दा चर्चेत असतानाच कसा अपघात – जयंत पाटील
अजितदादा हे दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण्यासाठी इच्छुक होते हे सर्वश्रूत आहे. त्याबाबत सकारात्मक निर्णय होत असतानाच त्यांच्या विमानाचा अपघात झाल्याने त्याबाबत संशय निर्माण झाला आहे, असे मत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी व्यक्त केले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, आमचे एकत्र यायचे नक्की झाले होते. दादांना पवार साहेबांची काळजी होती, त्यामुळे ते एकत्र येण्यासाठी खूप प्रयत्नशील होते. मात्र त्यांच्या जाण्याने हा विषय संपला आहे.’ असेही त्यांनी सांगितले. (Vikas Lawande launches a scathing attack)