नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल मंगळवारी (२२ एप्रिल) जाहीर झाला. या परीक्षेत शक्ती दुबे यांनी देशात अव्वल क्रमांक पटकावला आहे. हर्षिता गोयलने दुसरा तर पुण्याच्या अर्चित पराग डोंगरेने तिसरा क्रमांक पटकावला आहे. (UPSC Result)
शक्ती दुबे या उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथील आहेत. त्यांनी प्रयागराज येथेच प्राथमिक शिक्षण घेतले. अलाहाबाद विद्यापीठातून पदवी तर बनारस हिंदू विद्यापीठातून (बीएचयू) बायो केमिस्ट्री या विषयातून पदव्युत्तर पदवी घेतली आहे.
सप्टेंबर २०२४ मध्ये लेखी परीक्षा झाली. जानेवारी ते एप्रिल २०२५ दरम्यान झालेल्या मुलाखती संपल्या. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने अधिकृतपणे जाहीर केलेल्या निकालांमध्ये भारतीय प्रशासकीय सेवा (आएएस), भारतीय परराष्ट्र सेवा (आयएफएस), भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) आणि केंद्रीय सेवा, गट ‘अ’ आणि गट ‘ब’ मध्ये नियुक्तीसाठी शिफारस केलेल्या १००९ उमेदवारांची यादी समाविष्ट आहे. (UPSC Result)
नागरी सेवा परीक्षा नियम, २०२४ च्या नियम २०(४) आणि (५) नुसार २३० उमेदवारांची एकत्रित राखीव यादी देखील ठेवण्यात आली आहे.
निवडलेल्या १००९ उमेदवारांपैकी ३३५ सामान्य श्रेणीतील, १०९ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील (ईडब्ल्यूएस), ३१८ इतर मागासवर्गीय (ओबीसी), १६० अनुसूचित जाती (एससी) आणि ८७ अनुसूचित जमाती (एसटी) आहेत. यामध्ये चार श्रेणींतील बेंचमार्क अपंगत्व असलेल्या ४५ उमेदवारांचा समावेश आहे.(UPSC Result)
- अंतिम परीक्षेतील टॉप १०
शक्ती दुबे
हर्षिता गोयल
डोंगरे अर्चित पराग
शाह मार्गी चिराग
आकाश गर्ग
कोमल पुनिया
आयुषी बंसल
राज कृष्ण झा
आदित्य विक्रम अग्रवाल
मयंक त्रिपाठी