महायुतीने आधी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा

महाविकास आघाडी पत्रकार परिषद

मुंबईःमहायुतीने आधी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करावा, त्यानंतर आम्ही आमचा उमेदवार जाहीर करू, असे सांगून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या प्रश्न टोलवून लावला. वांद्रे पश्चिम येथील हॅाटेल ताज लॅंडस एन्डमध्ये महाविकास आघाडीतर्फे राज्यातील महायुती सरकारच्या कारभाराबद्दल ‘गद्दारांचा पंचनामा’ प्रसिद्ध करण्यात आला. त्यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

मविआच्या मुख्यमंत्रीपदाच्या प्रश्नावर उत्तर देताना मविआच्या नेत्यांनी, मविआत नेतृत्वाच्या प्रश्न नाही व खुर्चीसाठी वादही नाहीत, आमच्यात एकमत आहे. ही निवडणूक मविआ विरुदध महायुती अशी आहे. महायुतीने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर केल्यानंतर पाहू, असे स्पष्ट केले.
नाना पटोले म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ज्यांनी विरोध केला त्याच विचाराचे लोक आज सत्तेत आहेत. या सरकारच्या भ्रष्टाचारामुळेच मालवणमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळून विटंबना करण्याचे पाप केले, परंतु देवेंद्र फडणवीस यांनी अद्याप माफी मागितली नाही. शिवाजी महाराज, शाहू, फुले व आंबेडकरांच्या महाराष्ट्राला कलंक लावण्याचे पाप शिंदे फडणवीस सरकारने केले आहे. महायुती सरकार हे गुजरात धार्जिणे आहे, या सरकारला सत्तेतून बाहेर काढणे, हेच महाविकास आघाडीचे लक्ष्य आहे.

बाबा सिददीकी यांच्या हत्येने महाराष्ट्र हादरला. शाळेतील मुली सुरक्षित नाहीत, महिला सुरक्षित नाहीत. राज्यातली जनता सुरक्षित नाही आता तर सत्तेतील लोकही सुरक्षित नाहीत. कायदा सुव्यवस्था बिघडली आहे आता महायुतीच्या मंत्र्यांचे राजीनामे मागितले जाणार नाहीत तर जनताच यांना सत्तेतून खाली खेचेल, असेही पटोले यावेळी म्हणाले.

शरद पवार म्हणाले, महायुती सरकारने मंत्रिमंडळात धडाधड निर्णय घेतले पण त्यातील किती निर्णयांची अंमलबजावणी होईल? महाराष्ट्राच्या प्रशासनाचा देशात लौकिक होता पण महायुती सरकराच्या काळात ही प्रशासकीय व्यवस्था उद्ध्वस्थ झाली आहे, त्याची महाराष्ट्राला मोठी किंमत मोजावी लागत आहे. प्रशासन व्यवस्था उद्ध्वस्त करणाऱ्यांच्या हातून महाराष्ट्र वाचवावे लागेल आणि त्यासाठी मविआ प्रयत्न करत आहे.

हरियाणाच्या निकालावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, महाराष्ट्रातील जनता राज्यात बदल करण्यासाठी उत्सुक आहे. लोकसभा निवडणुकीवेळीही तसेच चित्र होते. मविआने ४८ पैकी ३१ जागा जिंकल्या आणि विधानसभेलाही तसेच परिणाम येतील असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.

उद्धव ठाकरे म्हणाले, बाबा सिद्दीकींची हत्या होईपर्यंत यंत्रणा काय करत होत्या? फडणवीसांचे सरकार असताना नाना पटोले यांचा फोन टॅप केला जात होता, विरोधकांवर बारीक लक्ष पण गुन्हेगारांवर लक्ष का नाही? ईडी, सीबीआय फक्त विरोधकांसाठीच आहे. महाराष्ट्राच्या राजधानीत जर हत्या होत असेल, महिलांवर अत्याचार होत असतील तर राज्यात कायदा आहे कुठे? अभिषेक घोसाळकर या तरुणाची हत्या झाली त्यावेळी, “गाडीखाली कुत्रे आले तरी विरोधक गृहमंत्र्याचा राजीनामा मागितील”, असे फडणवीस म्हणाले होते, हे जनतेला कुत्रे म्हणतात. महायुतीने महाराष्ट्राला गुजरातची वसाहत बनवले आहे परंतु मविआ मात्र शिव, शाहु, फुले, आंबेडकरांचे राज्य मोदीशाह यांचे होऊ देणार नाही.

यावेळी यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड, खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, सुप्रिया सुळे, अनिल देसाई, आमदार आदित्य ठाकरे आदी उपस्थित होते.

भाजपला राजकीय खांदा द्यायचा आहे
मी बाळासाहेबांचा शिवसैनिक, मला हलक्यात घेऊ नका
बाबा सिद्दिकी हत्याप्रकरणी बिश्नोई गँग की एसआरए प्रकरण?

Related posts

मंत्र्यांच्या खातेवाटपानंतर आता पालकमंत्री पदासाठी चढाओढ

उद्धव-राज ठाकरे एकत्र 

Maharashtra Cabinet Portfolio : गृह फडणवीसांकडेच, शिंदेंना नगरविकास, अजितदादांना अर्थ