- देवदत्त पट्टनायक
एका अतिशय गंभीर “सांस्कृतिक स्पंदनांवरील आंतरराष्ट्रीय परिषदेत” सूत्रसंचालकाने आपली किमती खादीची शाल नीट करत विचारले: “आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या धर्मतत्त्वविषयक प्रश्नावर चर्चा करणार आहोत. सनातन धर्मात गोऱ्या लोकांचे तीन प्रकार कोणते?” (three types of white people in Sanatan religion)
मंचावरील गुरूंनी शांतपणे स्मित केले.
“वत्सा, सर्व गोरे लोक सारखे नसतात. अन्न, भावना आणि व्हॉट्सअॅप फॉरवर्ड्सप्रमाणे त्यांचेदेखील सात्विक, राजस आणि तामस असे तीन प्रकार असतात.”
प्रेक्षकांतून आश्चर्याचा उद्गार उमटला…
रुद्राक्षमाळा घातलेला एक गृहस्थ उभा राहिला.
“गुरुजी, आधी सात्विक प्रकार समजावून सांगा.”
गुरुजींनी मान डोलावली
“सात्विक गोरे लोक हे पवित्र असतात. साधारणतः सोनेरी केसांचे. बहुतेक वेळा गोव्यातून विकत घेतलेले सैल सुती कपडे घातलेले. एखादा प्रेमभंग आणि दोन आयाहुआस्का रिट्रीटनंतर ते ऋषिकेशमध्ये दाखल होतात.”
“ओह्ह…” प्रेक्षक आदराने पुटपुटले.
“ते म्हणतात — भारत हा जगाचा आध्यात्मिक केंद्रबिंदू आहे. वैदिक विज्ञानाला क्वांटम फिजिक्स आधीच माहीत होती. संस्कृत ही सर्व भाषांची जननी आहे. नासाने अंतराळात ‘ॐ’ शोधला.”
टाळ्यांचा कडकडाट झाला. भावनातिरेकाने अश्रू आले. (three types of white people in Sanatan religion)
गुरुजी पुढे म्हणाले: “सात्विक गोरा पुरुष सहसा ‘कॉस्मिक भारत अवेकनिंग’ नावाचे यूट्यूब चॅनेल सुरू करतो. तो समजावतो की हिंदू धर्म वीस हजार वर्षे जुना आहे आणि वायफायचा शोध मुळात महाभारतात लागला होता.”
“खरं आहे! खरं आहे!” मागून कुणीतरी ओरडले.
“आणि सात्विक गोरी स्त्री आश्रमात नृत्य करते, विष्णुसहस्रनाम अचूक उच्चारांसह म्हणते, आणि हळूहळू संपूर्ण आध्यात्मिक संस्थेची प्रमुख प्रशासक बनते.”
एक भक्त घाबरत कुजबुजला:
“म्हणजे… परदेशी ब्राह्मण?”
गुरुजी गूढ हसले. (three types of white people in Sanatan religion)
“असे धोकादायक प्रश्न विचारू नयेत.”
सूत्रसंचालक मध्येच म्हणाला: “आणि राजस गोरे लोक?” (three types of white people in Sanatan religion)
गुरुजींनी दीर्घ श्वास घेतला.
“अहो, ईस्ट इंडिया कंपनी प्रीमियम प्लस सबस्क्रिप्शन पॅकेज.”
स्क्रीनवर खाजगी विमानांतून उतरणाऱ्या अब्जाधीशांचे स्लाइड्स दिसू लागले.
“राजस गोरे लोक येतात आणि म्हणतात — भारत खूप प्रतिभावान आहे. भारतीय खूप मेहनती आहेत. भारतीय गणिती प्रतिभावंत आहेत.”
प्रेक्षकांनी अभिमानाने टाळ्या वाजवल्या.
“ते तुम्हाला H1B व्हिसा देतात.”
आणखी टाळ्या.
“मग ते तुम्हाला दिवसाचे १७ तास सॉफ्टवेअर डीबगिंग करायला लावतात, आणि स्वतः कॅलिफोर्नियातील महालांत राहतात.”
सभागृहात शांतता पसरली.
“ते सांगतात की पश्चिमेच्या आधी पिंगलाचार्यांनी बायनरीचा शोध लावला होता. सगळे भावूक होतात. आणि मग ते शांतपणे तुमच्या श्रमांचे बिल तासाला ४०० डॉलर्सने आकारतात, पण तुम्हाला मोबदला म्हणून प्रेरणादायी लिंक्डइन पोस्ट्स देतात.”
एक आयटी अभियंता रागाने उभा राहिला.
“पण सर, ते आपल्या संस्कृतीचा आदर करतात!”
गुरुजींनी करुणेने मान हलवली.
“हो. जसा दुग्धव्यवसाय करणारा शेतकरी गायींचा आदर करतो.”
प्रेक्षक विचारमग्न झाले.
एका व्यावसायिकाने विचारले:
“पण पैसा तर चांगली गोष्ट आहे ना?”
“नक्कीच,” गुरुजी म्हणाले. “म्हणूनच ते राजस आहेत. ते महत्त्वाकांक्षा आणि स्टॉकहोम सिंड्रोम दोन्ही जागृत करतात.”
सूत्रसंचालकाने कपाळावरील घाम पुसला.
“आणि शेवटी… तामस गोरे लोक?”
संपूर्ण सभागृहाने आधीच हूटिंग सुरू केले.
गुरुजींनी आवाज खाली आणला. (three types of white people in Sanatan religion)
“हे सर्वांत धोकादायक असतात.”
दिवे मंद झाले.
“हे नॉर्वे, डेन्मार्क, विद्यापीठे, डॉक्युमेंटरी फिल्ममेकिंग आणि मानवी हक्क संघटनांसारख्या ठिकाणांहून येतात.”
प्रेक्षकातून फूत्कार आले…
“हे विचित्र प्रश्न विचारतात.”
“कसले प्रश्न?” कुणीतरी घाबरत विचारले.
“हे लोकशाहीबद्दल विचारतात. प्रसारमाध्यम स्वातंत्र्याबद्दल. गरिबीबद्दल. नद्यांमधील कचऱ्याबद्दल. अल्पसंख्याकांच्या अधिकारांबद्दल.”
सभागृहात गोंधळ उडाला. (three types of white people in Sanatan religion)
एक काका ओरडले:
“देशद्रोही!”
दुसरे किंचाळले:
“मॅकॉले व्हायरस!”
गुरुजी शांतपणे पुढे म्हणाले:
“हे मिठी नदीकडे पाहतात आणि प्राचीन संस्कृतीचे कौतुक करण्याऐवजी विचारतात की तिचा वास उग्र रासायनिक का येतो.”
एक स्त्री धक्का बसल्यासारखी म्हणाली:
“भयंकर.”
“हो,” गुरुजी म्हणाले. “आणि सगळ्यात वाईट म्हणजे… भारताने सगळ्या गोष्टींचा शोध लावला असे सांगितले तरी हे भावुक होत नाहीत.”
प्रेक्षक दुःखाने गदगदले.
एक तरुण उठून म्हणाला:
“पण गुरुजी, इटालियन लोकही सात्विक, राजस आणि तामसी असू शकतात का?”
गुरुजी अभिमानाने हसले.
“वत्सा, गुण हे सार्वत्रिक असतात.”
प्रेक्षकांनी टाळ्यांचा गजर केला.
“तुम्हाला कीर्तनात नाचणारे सात्विक अमेरिकन भेटतील. स्टार्टअप सुरू करणारे राजस अमेरिकन भेटतील. डॉक्युमेंटरी बनवणारे तामसी अमेरिकनही भेटतील.”
“आणि ब्रिटिश लोक?” कुणीतरी विचारले.
गुरुजींनी डोळे मिटले.
“प्राथमिक वर्गात आपण प्रगत विषयांवर चर्चा करत नाही.”
(मराठी अनुवादः मुग्धा धनंजय)