बंकर रॉयः दुष्काळाला ‘बेअरफूट’ भिडलेला माणूस

  • नीलेश बने

दुष्काळ म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर उभं राहतं ते संकट, उपासमार आणि हतबलता. पण याच दुष्काळाकडे एक संधी म्हणूनही पाहता येतं आणि त्यातून हजारो लोकांच्या आयुष्यात बदल घडवता येतो, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे बंकर रॉय. १९६६-६७ मध्ये बिहारमध्ये पडलेला भीषण दुष्काळ या तरुणानं जवळून पाहिला आणि त्याच्या आयुष्याला एक नवी दिशा मिळाली. पुढे याच दिशेनं चालताना त्यानं उभारलं ‘बेअरफूट कॉलेज’ आणि ग्रामीण भारताच्या विकासाची एक वेगळीच वाट जगाला दाखवली. हा माणूस काही दिवसांपूर्वी, १० नोव्हेंबर २०२६ रोजी आपल्याला सोडून गेला.

त्यांच्या मृत्यूनंतर फारसं कुठंच छापून आलं नाही, बोललं गेलं नाही. त्यामुळे त्यांची ही गोष्ट प्रत्येकानं समजून घ्यायलाच हवी. एखादा सेलिब्रेटी गेला तर, पुढील चार-पाच दिवस त्यांच्या आठवणी जागवल्या जातात. पण हे असं आयुष्य ओतलेला कार्यकर्ता जेव्हा आपल्याला सोडून जातो, तेव्हा त्याच्या स्मृती प्रत्येक संवेदनशील माणसानं जागवायलाच हव्यात.

संजीतचा बंकर कसा झाला?

बंकर रॉय यांचं मूळ नाव संजीत रॉय. त्यांच्या नावाचीही एक गंमत आहे. त्यांचं मूळ नाव संजीत असताना, मग ‘बंकर’ कुठून आलं? तर त्यांच्या भावाचं नाव होतं शंकर. बंगाली कुटुंबांमध्ये भावंडांची नावं यमक जुळवून ठेवण्याची एक गंमतशीर पद्धत आहे. त्यातून शंकरच्या जोडीला संजीतचं ‘बंकर’ झालं. लहानपणी मिळालेलं हे टोपणनाव पुढे इतकं रूढ झालं की जगभर ते संजीत ‘बंकर’ रॉय याच नावानं ओळखले जाऊ लागले.

१९४५ मध्ये एका उच्च मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला. देहरादूनच्या प्रतिष्ठित डून स्कूलमध्ये शिक्षण, त्यानंतर दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमध्ये महाविद्यालयीन शिक्षण. खेळातही ते तितकेच चमकदार होते. भारताचे राष्ट्रीय स्क्वॉश विजेतेपद त्यांनी तीन वेळा मिळवलं होतं. पुढे एखाद्या मोठ्या पदावरची नोकरी, सुखवस्तू आयुष्य आणि प्रतिष्ठेची कारकीर्द त्यांची वाट पाहत होती. पण या सगळ्याला कलाटणी देणारी एक घटना घडली.

बिहारच्या दुष्काळाने कलाटणी

बिहारमध्ये १९६६-६७ मध्ये भीषण दुष्काळ पडला होता. दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी काही मित्र बिहारला निघाले. कुतूहलापोटी बंकर रॉयही त्यांच्याबरोबर गेले. तिथं त्यांनी जे पाहिलं, त्यानं त्यांचं जगच बदलून टाकलं. उपासमारीनं मरण पावणारी माणसं, अन्नासाठी वणवण करणारी कुटुंबं, हतबलता आणि गरिबी. याआधी त्यांच्या जगण्यात या भारताचा कधीच सामना झाला नव्हता. आपल्या शिक्षणानं, आपल्या बुद्धिमत्तेनं आपण काहीही करू शकतो, असा त्यांचा समज होता. पण एका गावात जाऊन तिथल्या लोकांच्या अडचणी समजून घेणंही आपल्याला जमत नाही, याची जाणीव त्यांना झाली.

एका मुलाखतीत त्यांनी या अनुभवाबद्दल सांगितलं होतं, “मी चुकीच्या शाळेत गेलो, चुकीच्या कॉलेजात गेलो आणि तिथून खूप अहंकार घेऊन बाहेर पडलो.” बिहारमधल्या त्या अनुभवाने त्यांच्या मनात एक प्रश्न निर्माण केला. एवढं शिक्षण घेऊनही ग्रामीण भारताच्या प्रश्नांसाठी आपण काय करू शकतो? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी त्यांनी आपलं आयुष्यच बदलण्याचा निर्णय घेतला.

त्यांनी घरी जाऊन आईला सांगितलं की, आता आपल्याला गावात राहून काम करायचं आहे. अर्थात, हा निर्णय कुटुंबाला सहज पचणारा नव्हता. प्रतिष्ठित शिक्षणसंस्थांमध्ये शिकलेल्या, राष्ट्रीय पातळीवर खेळलेला मुलगा गावात जाऊन राहणार, विहिरी खोदणार, हे ऐकून आईला धक्काच बसला. पण बंकर रॉय आपल्या निर्णयावर ठाम होते.

शिकण्यासाठी देशभर प्रवास

पुढची दीड वर्षं त्यांनी देशभर प्रवास केला. वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्था कशा काम करतात, ग्रामीण भागात कोणते प्रश्न आहेत, त्यावर कोणत्या पद्धतीनं काम करता येईल, याचा अभ्यास केला. राजस्थानमध्ये त्यांनी पाणीविषयक काम सुरू केलं. अजमेर जिल्ह्यातील टिलोनिया हे गाव त्यांच्या आयुष्याचा पुढचा मुक्काम ठरलं. तिथं मेघराज नावाच्या एका स्थानिक शेतकरी आणि रॉक ड्रिलरच्या मदतीनं त्यांनी विहिरी, भूजल आणि पाण्याच्या प्रश्नांवर काम सुरू केलं.

१९७२ मध्ये त्यांनी ‘सोशल वर्क अँड रिसर्च सेंटर’ ही संस्था सुरू केली. पुढे याच संस्थेची ओळख ‘बेअरफूट कॉलेज’ म्हणून जगभर झाली. या संस्थेच्या नावामागेही एक महत्त्वाचा विचार होता. अनवाणी पायांनी जगणाऱ्या लाखो गरीब माणसांचं ते प्रतीक होतं. त्याचबरोबर शाळा-कॉलेजची औपचारिक पदवी नसली, तरी अनुभवातून मिळालेलं ज्ञान, कौशल्य आणि शहाणपण असलेल्या ग्रामीण माणसांचंही ते प्रतीक होतं.

गावातल्या माणसांचं ज्ञान

बंकर रॉय यांचा एक मूलभूत विश्वास होता. गावातल्या माणसांना त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी बाहेरून तज्ज्ञ आणण्याची किंवा शहरातल्या पदवीधरांवर अवलंबून राहण्याची कायम गरज नसते. गावातच अनेक कौशल्यं असतात. पाणी कुठं मिळेल हे सांगणारा माणूस, घरं बांधणारा कारागीर, औषधी वनस्पतींचं ज्ञान असलेली महिला, शेतीतले प्रयोग करणारा शेतकरी, या सगळ्यांकडे अनुभवातून आलेलं ज्ञान असतं. विकासाच्या नावाखाली या ज्ञानाकडे दुर्लक्ष करण्याऐवजी त्याला मान्यता आणि योग्य संधी दिली पाहिजे.

त्यामुळे बेअरफूट कॉलेजमध्ये शिकवण्याची पद्धतही वेगळी होती. तिथं मोठमोठ्या पदव्या मिळवण्याचा आग्रह नव्हता. गावातल्या माणसांना त्यांच्या गरजेनुसार कौशल्यं शिकवायची आणि त्यांनी पुन्हा आपल्या गावात जाऊन ती वापरायची, हा संस्थेचा दृष्टिकोन होता. पाणी व्यवस्थापन, आरोग्य, शिक्षण, बांधकाम, सौरऊर्जा अशा अनेक क्षेत्रांत स्थानिक लोकांना प्रशिक्षण दिलं जाऊ लागलं. ग्रामीण विकासाचं काम गावातल्या लोकांच्या सहभागातूनच उभं राहू शकतं, हे त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवलं.

या प्रयोगांमधला सर्वाधिक गाजलेला उपक्रम म्हणजे ‘सोलर मामा’. ग्रामीण भागातल्या, विशेषतः वयस्कर महिलांना सौरऊर्जेचं तंत्रज्ञान शिकवायचं, ही कल्पना अनेकांना सुरुवातीला अशक्य वाटली. यापैकी अनेक महिलांना लिहिता-वाचता येत नव्हतं. मग त्या सौरऊर्जेची उपकरणं कशी जोडणार, दुरुस्त कशी करणार, असा प्रश्न विचारला जायचा. पण बंकर रॉय यांनी याच समजुतीला आव्हान दिलं.

या महिलांना पुस्तकातलं तांत्रिक ज्ञान शिकवण्याऐवजी प्रत्यक्ष कामातून प्रशिक्षण दिलं जाऊ लागलं. रंग, खुणा आणि चित्रांच्या मदतीनं सौरऊर्जेची उपकरणं जोडणं, सोलर पॅनल बसवणं, बॅटरी आणि दिव्यांची देखभाल करणं त्या शिकू लागल्या. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर या महिला आपल्या गावात परतल्या आणि तिथं सौरऊर्जेची व्यवस्था उभी करू लागल्या. भारताबरोबरच आफ्रिका आणि इतर देशांमधल्या ग्रामीण महिलांनाही या उपक्रमाचा लाभ झाला. ज्या महिलांना समाजानं शिक्षणाच्या संधीपासून दूर ठेवलं होतं, त्याच महिला आपल्या गावातल्या ऊर्जाव्यवस्थेच्या तज्ज्ञ बनल्या.

स्त्रियांच्या आत्मविश्वासाचा प्रयोग

बंकर रॉय यांच्यासाठी हा केवळ सौरदिवे लावण्याचा कार्यक्रम नव्हता. तो स्त्रियांच्या आत्मविश्वासाचा, स्वावलंबनाचा आणि गावाच्या विकासात त्यांच्या नेतृत्वाला मिळालेल्या मान्यतेचा प्रयोग होता. गावातल्या आजीबाईही सौरऊर्जेचं तंत्रज्ञान शिकू शकतात, तर त्यांना कमी लेखण्याचा अधिकार कोणाला आहे, असा प्रश्नच त्यांनी जगासमोर ठेवला.

बेअरफूट कॉलेजचं काम केवळ सौरऊर्जेपुरतं मर्यादित राहिलं नाही. ग्रामीण मुलांसाठी रात्रीच्या शाळा सुरू करण्यात आल्या. दिवसभर शेतात किंवा घरकामात मदत करणाऱ्या मुलांना शिक्षणाची संधी मिळावी, हा त्यामागचा हेतू होता. गावातलेच लोक शिक्षक बनले. आरोग्यसेवा, पाणी साठवण, जलसंधारण, स्थानिक बांधकाम कौशल्यं आणि रोजगारनिर्मिती अशा अनेक क्षेत्रांत संस्थेनं काम केलं. विकास म्हणजे गावात शहराची नक्कल करणं नव्हे, तर गावातल्या लोकांना त्यांच्या गरजेनुसार सक्षम करणं, हा त्यांचा आग्रह होता.

अरुणा रॉय यांची साथ

या प्रवासात बंकर रॉय यांना त्यांच्या पत्नी अरुणा रॉय यांचीही साथ लाभली. अरुणा रॉय यांनी १९७५ मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेतून राजीनामा दिला आणि टिलोनियामध्ये बंकर रॉय यांच्याबरोबर काम सुरू केलं. पुढे त्या देशातल्या महत्त्वाच्या सामाजिक कार्यकर्त्यांपैकी एक बनल्या. माहितीच्या अधिकारासाठी उभ्या राहिलेल्या चळवळीत त्यांचं मोठं योगदान आहे.

बंकर रॉय यांच्या कामाची दखल देशात आणि परदेशातही घेतली गेली. १९८५ मध्ये त्यांना ग्रामीण विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या वापराबद्दल जमनालाल बजाज पुरस्कार मिळाला. १९८६ मध्ये पद्मश्री पुरस्कारानं त्यांचा गौरव करण्यात आला. पुढे टायलर पुरस्कार, स्कॉल पुरस्कार आणि ब्लू प्लॅनेट पुरस्कार असे अनेक आंतरराष्ट्रीय सन्मान त्यांना मिळाले. २०१० मध्ये टाइम मासिकानं जगातील १०० प्रभावशाली व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश केला.

पण या सगळ्या पुरस्कारांपेक्षा त्यांच्या कामामागचा विचार अधिक महत्त्वाचा होता. गावातल्या माणसांकडे ज्ञान नाही, त्यांना विकासाची समज नाही, त्यांच्यासाठी शहरातल्या तज्ज्ञांनी योजना आखल्या पाहिजेत, ही भूमिका त्यांनी नाकारली. उलट, गावातल्या माणसांवर विश्वास ठेवा, त्यांना संधी द्या, त्यांचं ज्ञान ओळखा आणि त्यांना निर्णय घेऊ द्या, असं ते सांगत राहिले.

बिहारच्या दुष्काळात त्यांना भारतातली एक वेगळीच वास्तवता दिसली होती. त्या वास्तवाकडे पाठ फिरवून ते आपल्या सुखवस्तू आयुष्यात परत जाऊ शकले असते. पण त्यांनी त्या अनुभवाला आपल्या आयुष्याचा केंद्रबिंदू बनवलं. एका दुष्काळानं त्यांना अस्वस्थ केलं आणि त्या अस्वस्थतेतून हजारो गावांपर्यंत पोहोचलेली एक चळवळ उभी राहिली.

असामान्य माणसाची गोष्ट

बंकर रॉय १० नोव्हेंबर २०२६ रोजी राजस्थानमधल्या टिलोनिया इथं वयाच्या ८१व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. पण त्यांनी उभा केलेला प्रश्न आजही तितकाच महत्त्वाचा आहे. माणसाचं ज्ञान त्याच्या पदवीवर ठरतं की त्याच्या कौशल्यावर? विकासासाठी गावाकडे बाहेरून उपाय घेऊन जायचे की गावातच असलेल्या ज्ञानाला बळ द्यायचं?

बंकर रॉय यांनी आपल्या आयुष्यातून या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला. दुष्काळाच्या संकटातून त्यांनी केवळ स्वतःच्या आयुष्याची दिशा बदलली नाही, तर हजारो लोकांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याची संधी दिली. म्हणूनच त्यांची गोष्ट केवळ एका सामाजिक कार्यकर्त्याची गोष्ट नाही. ती संकटाकडे पाहण्याची दृष्टी बदलणाऱ्या आणि सामान्य माणसाच्या क्षमतेवर विश्वास ठेवणाऱ्या एका असामान्य माणसाची गोष्ट आहे.

Related posts

नेहा बोरा म्हणते मी नॉन-बायनरी! म्हणजे नेमके काय?

स्वातंत्र्यलढ्यात अदिवासींचे बलिदान

महात्मा फुले : कृतीशीलतेचे अग्रदूत