जमीर काझी : मुंबई : खासदार सुनील तटकरे हे रायगडमधील ‘आका’ आहेत. त्यांच्या सुतारवाडीतील घरात खोपोलीतील नवनिर्वाचित नगरसेविकेचा पती मंगेश काळोखेच्या हत्येचा कट रचण्यात आला आहे, असा गंभीर आरोप कर्जतमधील शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी शनिवारी केला.त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या रणांगण तापले असतानाच त्यांच्यातील राजकीय संघर्षामुळे पुन्हा राज्यात चर्चेला आला आहे.
थोरवेंचे समर्थक काळोखेंची हत्या
खोपोली नगरपरिषदेच्या निवडणुकीत चा निकाल लागून अवघे पाच दिवस उलटत नाही तोच नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती आणि आमदार महेंद्र थोरवे यांचे कट्टर समर्थक मंगेश काळोखे यांची २६ डिसेंबर रोजी निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. मंगेश काळोखे यांच्या हत्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि जिल्हा प्रवक्ते भरत भगत यांच्यासह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुधाकर घारे हे खासदार सुनील तटकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात, त्यामुळे या प्रकरणाला आता मोठे राजकीय वळण लागले आहे.
मानसी काळोखेकडून उर्मिला देवकरांचा पराभव
खोपोली नगरपरिषदेच्या प्रभाग क्र. ३ मध्ये मानसी काळोखे यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या उर्मिला देवकर उभ्या होत्या. २१ डिसेंबरला लागलेल्या निकालात उर्मिला देवकर यांचा ७०० पेक्षा जास्त मतांनी पराभव केला.त्यामुळे मंगेश काळोखे यांची शुक्रवारी सकाळी तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या केली, अशी तक्रार काळोखे यांच्या कुटूंबियाकडून करण्यात आली आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सुधाकर परशुराम घारे, जिल्हा प्रवक्ते भरत भगत , रवींद्र परशुराम देवकर, दर्शन रवींद्र देवकर, धनेश रवींद्र देवकर, सचिन संदीप चव्हाण, रवींद्र देवकर यांचा बाऊन्सर आणि इतर तीन जणावर गुन्हा दाखल असून आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली आहे.
रायगडे आका सुनील तटकरे
मयत मंगेश काळोखे हे कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांचे खंदे समर्थक होते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत त्यांनी आज काळोखे यांच्या कुटूंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी आ. थोरवे यांनी त्यांच्याविरुद्ध विधानसभा निवडणूक लढलेल्या सुधाकर घारे हे खरे सूत्रधार असल्याचा आरोप केला. ते म्हणाले,’ “लोकशाही पद्धतीने आतापर्यत सगळ्या निवडणुकांना आपण सामोरे गेलो. पण सुनील तटकरे सत्तेत आल्यापासून रायगडमध्ये रक्तरंजित राजकारण सुरु आहे. बीडनंतर आता रायगडचे आका सुनील तटकरे आहेत. त्यांच्या माध्यमातून माझ्या कार्यकर्त्यांना मारण्यात येत आहे. आजही घारे त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन बैठका घेत आहेत. तटकरे यांनी सुधाकर घारेचा याच्यामध्ये हात नसल्याचे सांगत आहेत. प्रकरणाचा त्यांनी तपास केला आहे का? याचा अर्थ हे सगळे पूर्वनियोजित आहे. घारे एफआयआरमधला आरोपी आहे. ही घटना घडण्याच्या दोन दिवस आधी रवी देवकर सरकारी वकिलांच्या मार्फत सुतारवाडीला गेला होता. तिथे तटकरेंसोबत बसून, चर्चा करुन नियोजितपणे मंगेश काळोखेंची हत्या करण्यात आली,” असा गंभीर आरोप केला.
आरोपींना फासावर लटकवू
शिंदे काळोखे कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, या प्रकरणाचा सखोल तपास केला जात असून हल्लेखोरांना फासावर लटकवले जाईल, कोणीही असलेतरी त्यांना सोडले जाणार नाही,’
एसआयडीकडून तपास करावा
तटकरे आमदार महेंद्र थोरवे यांनी केलेल्या आरोपाबाबत बोलताना सुनील तटकरे म्हणाले,’ राज्यात निवडणुका सुरू असताना असे आरोप करणे चुकीचे आहे याबाबत सरकारने एसआयटी स्थापन करून मारेकऱ्यांना पकडावे, अशी आमची मागणी आहे.