Tension in Kolhapur : कोल्हापुरातील दंगलप्रकरणी  ५०० जणांवर गुन्हा

Tension in Kolhapur

कोल्हापूर : प्रतिनिधी : साउंड सिस्टीमच्या कारणावरुन सिद्धार्थनगर आणि राजेबागस्वार परिसरात झालेल्या दंगल प्रकरणी राजेबागस्वार आणि सिद्धार्थनगरातील ५००जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दंगलसदृश्य दगडफेकीत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस उप निरीक्षक शेष मोरे, लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबल आबीद मुल्ला यांच्यासह सात जण जखमी झाले. लक्ष्मीपुरी पोलिसांनी संशयितांची धरपकड करण्यासाठी शोध महिम वेगाने राबवण्यास सुरुवात केली आहे.

राजेबागस्वार परिसरातील अरिफ शेख, शहारुख शेख, कौशिक राजू पटवेगार, सोहेल पटवेगार, तणवीर मुजावर, नौशाद मुजावर, शाहरुख रिक्षावाला, तौसिफ शेख, अब्दुल रौफ सिद्धीकी, अश्पाक गॅसवाला, जरीब इनामदार रिक्षावाला, सोहेल शेख, समीर मिस्त्री गॅरेजवाला, परवीन बशीर शेख, आश्रफ सिद्धीकी, इजाज शेख, सद्दाम महात, आश्पाक नायकवडी, इकबाल सरकवास, बिलाल शेख, मुन्ना सिद्धीकी आणि १५० ते २०० जणांवर गुन्हा नोंद झाला आहे. सिद्धार्थ नगर येथील सूरज कांबळे, अभिजीत कांबळे, शुभम कांबळे, विजय पटकारे, महेश कांबळे, लखन कांबळे, गणेश कांबळे यांच्यासह दीडशे दोनशे विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. साउंड सिस्टीमच्या कारणावरुन सिद्धार्थनगर आणि राजेबागस्वार परिसरात राडा झाला. दोन्ही गटाकडून दगडफेक झाल्याने पोलिसांसह दहा जण जखमी झाले. जमावाने वाहनांची तोडफोड करत वाहने पेटवून दिल्याने परिसरात दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. पोलिसांची जादा कुमक आल्यानंतर हल्लेखोरांना पिटाळून लावले. सर्किट बेंच, शहर डीवायएसपी कार्यालय जवळ असतानाही हिंसाचार घडल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांनी साउंडसिस्टीमवर वेळीच कारवाई केली असती तर राडा टळला असता अशी जागरुक नागरिकांकडून प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. पोलिसांकडून परिस्थिती निवळण्यासाठी बैठकांचे सत्र सुरू झाले असून परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. (Tension in Kolhapur)

शुक्रवारी भारत तरुण मंडळ प्रणित राजेबागस्वार फुटबॉल क्लबचा वर्धापन दिन होता. वर्धापनदिनानिमित्त दुपारी साऊंड सिस्टीम लावली होती. त्यासाठी रस्ता व्यापणारे स्ट्रक्चर उभारण्यात आले. सिद्धार्थनगरकडे जाणाऱ्या रस्ता अडवला जात होता असे सिद्धार्थनगरातील नागरिकांचे म्हणणे होते. या संदर्भात काही नागरिकांनी पोलिसांकडे विचारणा केली होती. त्यानंतर पोलिसांनी साऊंड सिस्टीम बंद केली. त्यामुळे राजेबागस्वारमधील काही तरुण संतप्त झाले होते.

दरम्यान रात्री पावनेदहा वाजण्याच्या सुमारास सिद्धार्थनगरकडे जाणाऱ्या कमानीच्या दिशेने काही हुल्लडबाज तरुणांचा जमाव निघाला. त्यांनी दिसेल ती वाहने फोडण्यास सुरूवात केली. मालवाहतूक करणारी रिक्षा, टेप्मो उलटवून टाकले. जमाव सिद्धार्थनगराकडे जात असताना नागरिक घराबाहेर आले. त्यांच्यावर जमावाने दगड विटा फेकण्यास सुरुवात केल्यावर सिद्धार्थनगरातील नागरिकांनी प्रत्युत्तर दिले. दादासाहेब शिर्के उद्यानासमोर पार्क केलेली वाहने पेटवून देण्यात आली. त्यानंतर राजेबागस्वारमधील मोठा जमाव सिद्धर्थनगरकडे चाल करुन गेला. त्यांनी दगड, विटा, बाटल्यांचा मारा केला. दोन्ही गटांकडून तुफान दगडफेक झाल्याने दगड विटा, फरशांचा खच पडला होता. दरम्यान या घटनेची माहिती कळताच पोलिस घटनास्थळी आली पण त्यांची संख्या तोकडी होती. त्यांनी जमाव पांगवण्यासाठी लाठीमार केला पण पोलिसांना जमाव आवरताना दमछाक करावी लागली. त्यातच रस्त्यांवरील स्ट्रीट लाईन बंद झाल्याने दोन्ही गटांनी त्याचा फायदा घेत दगडफेक केली. (Tension in Kolhapur)

एकीकडे दगडफेक सुरू असताना सीपीआर चौक ते टाऊन हॉल मार्गावरील वाहतूक सुरू होती. दगड पडू लागल्यावर दोन्ही बाजूची वाहने थांबली. काहींनी वाहने वळवली. त्यानंतर पोलिसांच्या तुकड्या दाखल झाल्या. पोलिस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरजकुमार बच्चू, शहर पोलिस अधीक्षक प्रिया पाटील, पोलिस उप अधीक्षक महेश सावंत यांच्यासह सर्व पोलिस ठाण्याचे निरीक्षक घटनास्थळी आले. पोलिसांचा फौजफाटा आल्यावर जमावाला नियंत्रण ठेवण्यात यश आले. दोन्ही बाजूला जमाव थांबून होता.

दरम्यान सिद्धार्थनगर कमानीजवळील निळा ध्वज पाडल्याचे लक्षात आल्यावर जमाव प्रक्षुब्ध झाला. हल्लेखोरांवर कारवाई करा, अशी मागणी जमावाने केली. तर पोलिसांसह परिसरातील काही तरुणांनी पुन्हा ध्वज लावल्यावर जमाव शांत झाला. त्यानंतर दोन्ही गटाच जमाव पांगला. परिसरात कडकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. (Tension in Kolhapur)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवारांचा पोलिस ठाण्यात ठिय्या

मृत्युदंडाच्या शिक्षा अपिलात का टिकत नाहीत?