पुणे : प्रतिनिधी : प्रख्यात बंगाली कादंबरीकार शरदचंद्र चट्टोपाध्याय यांचे १५० वी जयंती वर्ष १५ सप्टेंबर २०२५ पासून सुरू झाले आहे. त्या निमित्ताने साधना प्रकाशनाकडून त्यांच्या श्रीकांत व सव्यसाची या दोन कादंबऱ्यांच्या नव्या आवृत्त्या आल्या आहेत. १९४० च्या दशकात या दोन्ही कादंबऱ्यांचे अनुवाद भा. वि. तथा मामा वरेरकर यांनी केले होते आणि ते अनुक्रमे नवभारत प्रकाशन व अभिनव प्रकाशन यांनी प्रकाशित केले होते. मात्र मागील पन्नास वर्षे ती पुस्तके उपलब्ध नव्हती. (Srikanth)
या दोन्ही कादंबऱ्यांच्या नव्या आवृत्त्यांचे प्रकाशन आज पुणे येथील साधना कार्यालयात ज्येष्ठ अनुवादक उमा कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. ही पुस्तके पुन्हा प्रकाशित होणे हा केवळ शरद चंद्राचा सन्मान नसून, अनुवादक मामा वरेरकर यांचाही सन्मान आहे असे त्या म्हणाल्या. त्यावेळी समीक्षक विजया देव आणि लेखिका वर्षा गजेंद्रगडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. (Srikanth)
या कादंबऱ्यांच्या नव्या आवृत्त्या प्रकाशित करताना संपादन सहाय्य करून , प्रस्तावना लिहिणाऱ्या सुप्रिया सहस्त्र बुद्धे यांनी यावेळी प्रास्ताविक केले. शरदचंद्रांच्या कादंबऱ्यांमधील मूल्ये कालातीत असून, आजच्या तरुण पिढीसमोर हे लेखन येणे आवश्यक होते. त्यामुळे, आज सुनीताबाई देशपांडे आणि नरहर कुरुंदकर हयात असते, तर या नव्या आवृत्त्या आल्याचा त्यांना सर्वाधिक आनंद झाला असता, असे त्या म्हणाल्या. (Srikanth)
‘श्रीकांत’ ही शरच्चंद्रांची सर्वाधिक महत्त्वाची, रोमाँ रोला या नोबेल विजेत्या साहित्यिकाने वाखाणलेली व गाजलेली अभिजात कादंबरी आहे. अलिप्तता व सह्रदयता यांचा दुर्मीळ संयोग असलेल्या श्रीकांतने केलेल्या भ्रमणाची ही ह्रदयस्पर्शी गाथा आहे. त्यातून त्या काळची बंगालची शहरी व ग्रामीण समाजस्थिती समोर येते, जी अखिल भारतापेक्षा काय वेगळी असणार! पारतंत्र्य, आर्थिक विषमता, स्त्रीसाठी अन्यायी दारुण विवाहसंस्था हे सगळे पाहताना व अनुभवताना तो त्याच्या संपर्कात येणाऱ्यांच्या दुःखांशी एकरूप होऊन त्यावर फुंकर घालतो. एक प्रकारे हे शरच्चंद्रांचे आत्मचरित्र मानले जाते. एम. एन. रॉय तर म्हणाले होते, गीतांजली ऐवजी श्रीकांत ला नोबेल पारितोषिक मिळायला हवे होते. (Srikanth)
स्वातंत्र्यलढ्याची राजकीय पार्श्वभूमी असलेली ‘सव्यसाची’ ही कादंबरी म्हणजे शरद साहित्याचे सर्वोच्च शिखर आहे. कलकत्त्याचे त्या वेळचे पोलीस आयुक्त शरच्चंद्रांना म्हणाले होते, “शरद बाबू, कुठेही आम्ही क्रांतिकारकांना पकडल्यावर त्यांच्याकडे दोन पुस्तकं सापडतात, ‘भगवतगीता’ आणि ‘सव्यसाची’. या कादंबरीने क्रांतिकारकांना वेड लावलं आहे.” क्रांती व स्वातंत्र्याच्या भव्य स्वप्नाने भारावलेला या कादंबरीचा साहसी नायक सव्यसाची कोणत्या क्रांतिकारकावरून घेतला आहे, याविषयी अनेक तर्क केले जातात. रासबिहारी बोस, अरविंद घोष, सुभाषचंद्र बोस वगैरेंची नावे येतात. पण यातील कोणी एक नव्हे तर या सर्वांच्या व्यक्तिमत्त्वांची वैशिष्ट्ये त्याच्यामध्ये एकत्र झालेली आहेत.
मूळ बंगाली भाषेत श्रीकांत ही कादंबरी १९१७ ते १९३३ या काळात चार भागांमध्ये प्रकाशित झाली होती, तर सव्यसाची ही कादंबरी बंगाली भाषेत ‘पथेर दाबी’ या नावाने १९२६ मध्ये प्रकाशित झाली होती. म्हणजे या दोन्ही कादंबऱ्यांच्या जन्माला आता शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. सव्यसाची वर १९७७ मध्ये बंगाली भाषेत चित्रपट आला होता तर श्रीकांत वर १९८७मध्ये दूरदर्शन मालिका प्रसारित झाली होती. (Srikanth)
१९४० नंतरच्या दहाबारा वर्षांत मराठीतील प्रख्यात साहित्यिक व नाटककार मामा वरेरकर यांनी शरद चंद्राच्या अनेक कादंबऱ्या थेट बंगाली भाषेतून मराठीत आणल्या होत्या. त्यातील पाच कादंबऱ्यांच्या नव्या आवृत्त्या साधना प्रकाशनाने आणायचे ठरवले असून, त्यातील शेषप्रश्न, चरित्रहीन व देवदास या तीन कादंबऱ्याही लवकरच प्रकाशित करणार आहोत , असे साधना प्रकाशनाचे संपादक विनोद शिरसाठ यांनी सांगितले. १५ सप्टेंबर २०२६ रोजी शरदचंद्र यांचे १५० वे जयंती वर्ष संपेल तेव्हा साधना साप्ताहिकाचा विशेषांक प्रकाशित करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.