स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सचिव शुभांगी गावडे यांचे निधन

Shubhangi Gawade passes away

कोल्हापूर : प्रतिनिधी :  श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सचिवा प्राचार्या शुभांगी मुरलीधर गावडे (वय ५३ ) यांचे आज गुरुवारी (दि. ३० एप्रिल) निधन  झाले.  त्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या नात, संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या कन्या व  संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या आकस्मिक निधनाने शैक्षणिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. 

त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ताराबाई पार्क, कोल्हापूर येथील संस्थेच्या परिसरातील शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे स्मृतिभवन येथे शुक्रवारी १ मे रोजी सकाळी नऊ ते सकाळी ११ या वेळेत ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर अंत्ययात्रा निघणार असून  दुपारी १२ वाजता पंचगंगा स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. (Shubhangi Gawade passes away)

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेमध्ये २००८ पासून सलग १८ वर्षे सचिव म्हणून त्यांनी शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचा शैक्षणिक, सामाजिक कार्याचा वारसा समर्थपणे सांभाळला. संस्थेच्या सुमारे ४१० संस्कार केंद्रातून त्यांच्या सचिवा पदाच्या प्रशासकीय  कालावधीत  त्यांच्या कार्यकर्तृत्वातून शैक्षणिक क्षेत्रात आधुनिक बदल करण्यासाठी त्यांनी नवनवीन योजना संस्थेच्या विविध शाखांमध्ये राबविल्या.  इंजिनिअरींग, नर्सिंग, हॉटेल मॅनेजमेंट, आर्टिफिशीयल इंटिलिजन्स्, लॉ कॉलेज या शाखांचा शुभारंभ त्यांच्या कार्यकाळात झाला. त्यांनी विविध शाखांना गुणवत्तापूर्ण करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा पुरवून संस्थेचा नावलौकिक वाढविला. संस्थेच्या विद्यार्थ्यांसाठी साहित्य, नृत्य, नाटय, कला, संगीत आणि इंग्रजी, फ्रेंच, संस्कृत, जर्मन भाषांच्या विकासासाठी महत्व्‍पूर्ण योगदान दिले. (Shubhangi Gawade passes away)

त्यांनी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेमध्ये सहशिक्षिका, प्राचार्या व सेक्रेटरी पदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली.  न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या, शिवाजी विद्यापीठाच्या सिनेट सदस्या, राज्य शासनाच्या तेजस्विनी महिला आश्रमामध्ये शिक्षणतज्ज्ञ व महिला कल्याण समितीवर सदस्य म्हणून त्यांनी काम केले आहे. त्यांना आदर्श महिला पुरस्कार, राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार,  आधुनिक सावित्री पुरस्कार  इत्यादी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी  राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय सेमीनार मध्ये आपले शैक्षणिक विचारांसोबत कृतीशील आराखडा सादर केला.

त्यांच्या पश्चात आई, वडील, बहिण, पती, दोन मुले, सासू, सुन  असा मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन शनिवारी २ मे रोजी सकाळी नऊ वाजता पंचगंगा स्मशानभूमी येथे होणार आहे. (Shubhangi Gawade passes away)

Related posts

राष्ट्रवादीकडून झिशान सिद्दीकींना संधी, बच्चू कडूंचा शिवसेनेत प्रवेश

विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून अंबादास दानवेंना उमेदवारी जाहीर

अल्पसंख्याक मुलींच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या उभारणीला गती द्या : सुनेत्रा  पवार