कोल्हापूर : प्रतिनिधी : शारदीय नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी करवीर निवासिनी अंबाबाईची महाविदया श्री बगला माता रुपातील पूजा बांधण्यात आली. देवीच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविक मंदिरात दाखल झाली असून भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. (Shri Bagla Mata)
दिवसभरातील धार्मिक विधीनंतर मंगळवारी दुपारी देवीची अलंकार पूजा बांधण्यात आली. श्री बगला माता रुपातील पूजेत देवी अमृत समुद्रामधील, मणिमंडपाच्या, रत्नखचित वेदिवरील,सिंहासनावर बसलेली आहे. तिने पिवळी वस्त्र नेसले असून अलंकार धारण केलेले आहेत. एका हातात शत्रूची जीभ आणि दुसरा हातात गदा धरली आहे. (Shri Bagla Mata)
श्री बगला देवीचे महात्म असे आहे की सत्ययुगात सकल ब्रह्मांडात मोठे वादळ, उत्पात माजले. तेव्हा हे अरिष्ट थांबण्यासाठी भगवान् विष्णूंनी सौराष्ट्रातील हरिततीर्थाकाठी देवीची उपासना केली असता,श्रीविष्णूंच्या तपतेजापासून चैत्रशुद्ध अष्टमीस ती प्रकट झाली. ही आठवी महाविद्या असून, मृत्युंजय हा हिचा सदाशिव आहे. ही श्रीकुलातील देवता, दाक्षिणाम्नायपीठस्था आहे. बडवामुखी, जातवेदमुखी, उल्कामुखी, ज्वालामुखी, बृहद्भानु या नावांनी ही देवी ओळखली जाते. हिची द्विभुज व चतुर्भुज रुपात उपासना होते. देवीची अंलकार पूजा श्रीपूजक अजित ठाणेकर, श्रीनिवास जोशी आणि नितीश सांगवडेकर यांनी बांधली आहे. (Shri Bagla Mata)