कोल्हापूर : प्रतिनिधी : मराठीतील ख्यातनाम कथाकार शंकर खंडू पाटील यांची जन्मशताब्दी महाराष्ट्र शासनातर्फे साजरी केली जाणार असून राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने तसा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. कोल्हापूर येथे १४ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या सहकार्याने जन्मशताब्दी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. (Shankar Khandu Patil Birth Centenary Program)
सांस्कृतिक कार्यसंचालक खेडेकरांकडून निर्णय जाहीर
दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे माजी अध्यक्ष डॉ. विजय चोरमारे यांनी शंकर खंडू पाटील यांची जन्मशताब्दी साजरी करण्यासंदर्भात राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्याकडे प्रस्ताव मांडला. साहित्य सभेचे अध्यक्ष डॉ. विनोद कांबळे, कार्याध्यक्ष दि. बा. पाटील, भीमराव धुळुबुळू आदींनी त्याचा पाठपुरावा केला. त्यानुसार सांस्कृतिक कार्य संचालक प्रशांत खेडेकर यांनी त्यासंदर्भातील निर्णय जाहीर केला आहे. जन्मशताब्दीचा कार्यक्रम १४ नोव्हेंबर रोजी कोल्हापूर येथे राजर्षी शाहू स्मारक भवनात होणार आहे. कार्यक्रमाचा तपशील लवकरच जाहीर करण्यात येईल. (Shankar Khandu Patil Birth Centenary Program)
चित्रपट कथा-पटकथेसह शंकर पाटलांचे विपुल लेखन
शंकर खंडू पाटील यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९२५ रोजी पेठ (जि. सांगली) येथे झाला. त्यांचे वास्तव्य बराच काळ कोल्हापूर येथेच राहिले. कथा, कादंबरी, चित्रपट कथा-पटकथा याबरोबरच राजकीय, सामाजिक विषयांवरही त्यांनी विपुल लेखन केले. चोरा मी वंदिले, सागराचे पाणी, सवाल, बाजिंदा हे त्यांचे चार कथासंग्रह आणि सरपंच, इशारा, घुंगरू, कुलवती, बेईमान, ललाटरेषा, सून माझी सावित्री या सात कादंब-या प्रकाशित आहेत. कौल दे खंडेराया आणि सून माझी सावित्री हे चित्रपट त्यांच्या साहित्यकृतींवर निघाले. भल्या घरची मी कामिनी हे लोकनाट्य आणि सून मोठी भाग्याची हे त्यांचे नाटकही गाजले. लोकशिक्षण मासिकाच्या संपादक मंडळावर तसेच महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी अनेक वर्षे काम केले. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या चिटणीसपदाची जबाबदारीही त्यांनी काही काळ सांभाळली होती. कथाकथनकार म्हणून त्यांची विशेष ख्याची होती.
पूर्णवेळ लेखक म्हणून कारकीर्द घडवली
प्रारंभीच्या काळात प्राथमिक शिक्षक तसेच माध्यमिक शिक्षक म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले, परंतु शिक्षकी पेशात त्यांचे मन रमले नाही. अनेक अडचणींवर मात करीत कोल्हापूर येथे पूर्णवेळ लेखक म्हणूनच त्यांनी कारकीर्द घडवली. दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या स्थापनेमध्ये पुढाकार असलेल्या प्रमुख व्यक्तिंमध्ये त्यांचा सहभाग होता. (Shankar Khandu Patil Birth Centenary Program)