नागपुरात स्क्रीप्ट लिहिलेला शक्तीपीठ महामार्ग सिनेमा फ्लॉप ठरणार

'Shaktipeeth Mahamarg' movie is set to flop

कोल्हापूर : प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तीपीठ महामार्गाची स्क्रीप्ट नागपुरात लिहिली असली तरी १३ जिल्ह्यात त्यांचा हा सिनेमा चालणार नाही. शक्तीपीठ महामार्गाचा फ्लॉप शो होणार आहे अशी घणाघाती टीका विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केली. शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात कोल्हापुरात भव्य मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

शक्तीपीठ महामार्गाला विरोधाचा केंद्रबिंदू कोल्हापुरात  प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात भव्य मोर्चा काढला. मोर्चात सर्वपक्षीय नेत्यांचा समावेश होता. आमदार सतेज पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी, आमदार जयंत आसगांवकर, आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली दसरा चौकातून मोर्चास सुरुवात झाली. मोर्चात महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. शक्तीपीठ विरोधात त्यांनी आपल्या भावनांना मोकळी वाट करुन राज्य सरकारवर टीका केली. ‘एकच जिद्द, शक्तीपीठ रद्द’, ‘एकच निर्धार, शक्तीपीठ हद्दपार’ अशा घोषणा देण्यात आल्या. (‘Shaktipeeth Mahamarg’ movie is set to flop)

शेतकऱ्यांचा शक्तीपीठला विरोध

दसरा चौकातून शहरातील मुख्य मार्गावर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. तिथे मोर्चाचे रुपांतर जाहीर सभेत झाले. यावेळी बोलताना सतेज पाटील यांनी आम्ही विकासाच्या विरोधात नसून गरज नसलेला आणि पिकाऊ जमिनीचे भूसंपादन करणाऱ्या शक्तीपीठ रद्द व्हावा अशी आमची भूमिका आहे. गेले सव्वा दोन वर्षे शक्तीपीठ महामार्गाला विरोध करत आहे. शेतकऱ्यांनाही हा महामार्ग नको आहे. रस्त्यांवर उतरुन शक्तीपीठाला विरोध करत असताना शेतकरी हा महामार्ग रेटण्याचा प्रयत्न करत आहे. त्याला सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी कार्यकर्ते, शेतकरी, कष्टकरी विरोध करणार आहेत असे त्यांनी स्पष्ट केले. (‘Shaktipeeth Mahamarg’ movie is set to flop)

११ नद्यावरुन हा महामार्ग जाणारा असल्याने महापुराचा धोका

शक्तीपीठाचे तोटे सांगताना आमदार सतेज पाटील म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील ११ नद्यावरुन हा महामार्ग जाणारा असल्याने महापुराचा धोका अनेक गावांना बसणार आहे. या मार्गावरील जमिनी, मंदिरे बाधित होणार आहेत. हिंदूत्वाचे घोषणा देणारे भाजपवाले कुठे आहेत असा सवालही त्यांनी केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची घोषणा केली होती. पण पुन्हा महामार्गाचा आदेश कसा निघू शकतो. या महामार्गाच्या विरोधात पुरुषांनी काठी तर महिलांनी लाटणे घेऊन लढायला तयार व्हावे असे आवाहन केले.

आंदोलनात सर्वपक्षीय नेते सहभागी

आंदोलनात माजी आमदार संपतराव पवार पाटील, सत्यजीत पाटील, ऋतुराज पाटील, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रवीण केसरकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित पवार, जिल्हा बँकेच संचालक ए.वाय.पाटील, कॉ. उदय नारकर, गिरीश फोंडे, संपत देसाई, जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादीचे गटनेते सुधीर देसाई, जि.प.सदस्य राजेंद्र सूर्यवंशी, सागर धुंदरे, मनोज फराकटे, सत्यजित जाधव, आर.वाय.पाटील, धैर्यशील पाटील, हिंदूराव चौगुले, बाबासाहेब देवकर, राहूल देसाई, जीवन पाटील, पांडुरंग भांदिगरे, सुनील शिंत्रे, गोकुळचे माजी संचालक बाबासाहेब चौगुले, बाळासाहेब खाडे, प्रकाश पाटील यांच्यासह शेतकरी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.  (‘Shaktipeeth Mahamarg’ movie is set to flop)

Related posts

सैन्यदलाचा अपमान करणाऱ्या गिरीष महाजनांची हकालपट्टी करा : हर्षवर्धन सपकाळ

मोदींनी पत्रकार परिषद घेण्याचे धाडस दाखवावे : संजय राऊत

बेळगावच्या कित्तूरमध्ये पावसाने दाणादाण