कुलाब्यातील महिला अपक्ष उमेदवारांचे विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांवर गंभीर आरोप 

Serious allegations by independent candidates

जमीर काझी : मुंबई :  एका माजी खासदारांचे पोलीस संरक्षण काढून टाकण्याची धमकी देत असल्याबद्दल व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर आता एका अपक्ष महिला उमेदवाराने दंड थोपटले आहेत. कुलाबा वार्ड क्रमांक २२६ मधून उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मला व माझ्या पतीला नार्वेकर व त्यांच्या पीएने पैश्याचे आमिष दाखवण्याबरोबरच धमाविले होते, असा गंभीर आरोप अपक्ष उमेदवार तेजल पवार यांनी केला आहे. तेजल पवार यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार केली आहे. 

नार्वेकरांची पैशाची ऑफर नाकारली

कुलाबा वार्ड क्रमांक २२६ मध्ये केवळ दोनच उमेदवार रिंगणात आहेत. तेजल पवार यांची लढत नार्वेकर यांचे बंधू व महायुतीचे उमेदवार मकरंद नार्वेकर यांच्याबरोबर होत आहे.  त्यांना शिवसेना ठाकरे गट, मनसे व काँग्रेस या पक्षांनी पाठिंबा दिला आहे. गुरुवारी त्यांनी खासदार अरविंद सावंत व पती दीपक पवार यांच्यासह पत्रकार परिषद घेऊन राहुल नार्वेकर यांच्याकडून आलेल्या धमकीबाबत माहिती दिली. त्या म्हणाल्या,’ ३१ डिसेंबर रोजी छाननी प्रक्रियेत माझा अर्ज वैध ठरल्यानंतर भायखळा परिसरात मकरंद नार्वेकर यांच्या कार्यकर्त्यांनी माझ्या पतीला एका कारमध्ये बसवून नेले. त्यामध्ये मकरंद नार्वेकर आणि राहुल नार्वेकर उपस्थित होते. त्यानंतर दुसऱ्या कार्यकर्त्यांने मला वेगळ्या कारमधून नार्वेकर यांच्या कफ परेड येथील बंगल्याकडे नेण्यात आले. त्यावेळी मी माझी लहान मुलं घरी असल्याचे सांगुन तिथून निघून आले. मात्र, माझ्या पतीला पैशांची ऑफर देण्यात आली. यावेळी हा निर्णय पत्नीचा असल्याचं सांगत त्यांनी ती नाकारली. (Colaba, Tejal Pawar, Rahul Narvekar. BMC election.)

माघारीसाठी १० लाखांची ऑफर

त्यानंतर मकरंद नार्वेकर यांनी मला फोन करून भेटीसाठी बोलावले. मात्र, मी येण्यास नकार देत पतीला पाठवण्यास सांगितलं आणि त्यांच्याशी चर्चा करून निर्णय कळवण्याचं स्पष्ट केले. त्यावेळी नार्वेकर यांचे पीए घरी येऊन उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी समज देत होते.संभाषणादरम्यान त्यांनी ‘राजू’ नावाच्या व्यक्तीचा उल्लेख करत त्याला तडीपार केल्याचं आणि त्याच्यावर गुन्हे दाखल केल्याचं सांगितले. त्यावर मी, “तुम्ही मला धमकावत आहात का?” असा थेट सवाल केला. त्यानंतर अर्ज मागे घेण्यासाठी १० लाख रुपयांची ऑफर देण्यात आली. मात्र, मला पैसे नको असून निवडणूक लढवायची आहे,”असे सांगितल्याचं तेजल पवार यांनी नमूद केलं. (Colaba, Tejal Pawar, Rahul Narvekar. BMC election.)

निवडणूक लढण्यावर आम्ही ठाम

या घटनेनंतर मी पती आणि मुलांसह घर सोडून दोन जानेवारीपर्यंत वेगळ्या ठिकाणी राहायला गेल्याचं सांगून त्या म्हणाल्या,’ तेव्हा नातेवाईकांच्या माध्यमातून संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते. तसेच पतीला मुंबई महापालिकेतील कंत्राटे, रोख पैसे अशा विविध ऑफर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दबाव आणत होते. मात्र आम्ही निवडणूक लढाविण्यावर ठाम राहिलो आणि पती दीपक पवार यांनी नार्वेकरांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

तेजल पवारांना युबीटी, मनसे, काँग्रेसचा पाठींबा

तेजल पवार यांचे पती दीपक पवार हे शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी होते. त्यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांनी आपल्या पत्नीला अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले.  दरम्यान या प्रकरणानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), मनसे आणि काँग्रेसकडून अपक्ष उमेदवार तेजल पवार यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांनी तेजल पवार यांच्या तक्रारीबाबत मुंबई आयुक्तांशी फोनवर चर्चा केल्याचं खासदार अरविंद सावंत यांनी सांगितले. (Colaba, Tejal Pawar, Rahul Narvekar. BMC election.)

राहुल नार्वेकरांनी आरोप फेटाळले

 या आरोपांबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना विचारलं असता ते म्हणाले, “ज्या महिला उमेदवार तेजल पवार माझ्यावर आरोप करत आहेत. त्यांना मी आजवर कधीही भेटलो नाही. जेव्हा आपली बाजू कमजोर असेल, तेव्हा राजकारणात हे प्रयत्न होतात. एक वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत कुलाब्यातून मी ५० हजारांच्या मताधिक्याने निवडून आलो आहे. प्रभाग क्रमांक २२६ मधून मला १४ हजार मतांचं मताधिक्य मिळालं आहे. त्यामुळे कुलाबा मतदारसंघातील तीनही प्रभाग भाजपासाठी सुरक्षित असल्याने कोणालाही उमेदवारी अर्ज मागे घ्यायला सांगणं, धमकावणं याचा प्रश्नच येत नाही.” असे त्यांनी स्पष्ट केले.

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर