मुंबई : विशेष प्रतिनिधी : राजकोट किल्ल्यावर बसवलेल्या शिवछत्रपतींच्या नव्या पुतळ्याच्या कामात पुन्हा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. तसेच इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेप्रश्नी संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणीही त्यांनी सोमवारी (१६ जून) केली. (Sapkal alleges Maha Govt)
शिवाजी महाराज यांच्या राजकोट किल्ल्यावरील पुतळ्याचे अनावरण ११ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्या चबुतऱ्याच्या ठिकाणी अवघ्या महिन्याभरात मोठे भगदाड पडल्याने बांधकामाचा दर्जा स्पष्ट झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिसेंबर २०२४ मध्ये महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. त्या कामात प्रचंड भ्रष्टाचार झाल्यानेच पुतळा आठ महिन्यांतच कोसळला होता. या गंभीर दुर्घटनेनंतर जनतेने प्रचंड संताप व्यक्त केल्यानंतर नवा पुतळा उभारण्यात आला. पण या कामातही भ्रष्टाचार झाला आहे. महाभ्रष्ट महायुतीने महापुरुषांच्या पुतळ्याच्या कामातही भ्रष्टाचाराची कीड लावली असल्याची टीका सपकाळ यांनी केली. (Sapkal alleges Maha Govt)
सरकारच्या हलगर्जीपणाचे बळी
पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेले मृत्यू हे सरकारच्या हलगर्जीपणाने घेतलेले बळी आहेत. कुंडमळा येथे पावसाळ्यात शेकडो पर्यटक येतात याची माहिती असताना तो धोकादायक पूल खुला का ठेवला? याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणीही सपकाळ यांनी केली.
ते म्हणाले की, कुंडमळा येथील लोखंडी पूल कमकुवत झाला होता. त्याला पर्यायी पुलासाठी वर्षभरापूर्वी निधीही मंजूर केल्याचे सरकार सांगत आहे. मग वर्षभर काम का झाले नाही? सरकार दुर्घटना होण्याची वाट पहात बसले होते का? त्या पुलावर ‘पाटी’ लावली होती असे प्रशासन सांगत आहे, पण अशा पाट्या लावून ‘पाट्या’ टाकण्याचेच काम शासन व प्रशासन करत आहे. ५५ पर्यटक वाहून गेले, त्यातील अनेकांना वाचवण्यात आले, पण चार जण ठार झाले तर सहा गंभीर जखमी झाले, याला जबाबदार कोण? मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख दिले म्हणजे सरकारची जबबादारी संपत नाही, असे ते म्हणाले. (Sapkal alleges Maha Govt)
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याचे निर्देश देणे म्हणजे ‘वरातीमागून घोडे’ असा प्रकार असल्याची टीकाही सपकाळ यांनी केली.
हेही वाचा :
लाज बाळगा; महाराष्ट्र सरकारला सुनावले
महाराष्ट्रात १५ दिवसांत १८ पाऊसबळी