Sanjay Jagtap: संजय जगतापांच्या भाजप प्रवेशाचा `बारामती`वर थेट परिणाम

sanjay jagtap

राजकारण कसं बदलत चाललंय बघा. पुरंदरचे दादा जाधवराव आज ९१ वर्षांचे आहेत. त्यांनी १९७२ पासून पुढच्या पन्नास वर्षांत नऊ वेळा विधानसभा निवडणूक लढवल्या. प्रत्येक निवडणूक वेगळ्या चिन्हावर लढवली. सहा वेळा ते निवडून आले. जनता पक्ष एकदाच सत्तेत होता, बाकी आयुष्यभर विरोधी पक्षात राहिले. जनता पक्षाशी निष्ठा असलेल्या दादा जाधवरावांनी जनता परिवार सोडला नाही. सत्तेत नाही म्हणून लोकांची कामे करू शकत नाही, असं त्यांना कधी वाटलं नाही. त्यांनी निष्ठा बदलल्या नाहीत. हे आठवण्याचं कारण म्हणजे आजच पुरंदरच्या संजय जगताप यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. (Sanjay Jagtap)

  • डॉ. विजय चोरमारे

आपल्याला आठवत असेल की भोर मतदारसंघातून सहा वेळा आमदार आणि दीर्घकाळ मंत्री असलेले अनंतराव थोपटे यांचे पुत्र संग्राम थोपटे हेसुद्धा वडिलांच्यानंतर तीनवेळा निवडून आले होते. २०२४च्या विधानसभेला त्यांचा पराभव झाला आणि त्यांनी भाजपची वाट धरली. धुळ्याच्या कुणाल पाटील यांचे घराणे तर स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या निवडणुकीपासून काँग्रेससोबत. त्यांनाही पराभवानंतर वर्षभरसुद्धा धीर धरवला नाही. या दोघांच्या पाठोपाठ आता पुरंदरच्या संजय जगताप यांनी आता काँग्रेसचा हात सोडून भाजपच्या तळ्यात उडी मारली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष असला पाहिजे, असा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार आहे. त्यादृष्टिकोनातून या सगळ्या घडामोडी घडायला लागल्या आहेत, हे नाकारून चालणार नाही. परंतु संजय जगताप यांचा प्रवेश तेवढ्यापुरता मर्यादित नाही. बारामती मतदार संघावरील पवार कुटुंबाचे वर्चस्व मोडून काढण्याची रणनीती भारतीय जनता पक्षाने आखलेली आहे. आणि त्यादृष्टिने त्यांची वाटचाल सुरू असल्याचे दिसून येते. (Sanjay Jagtap)

म्हणजे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतलं गणितच बघा.

संग्राम थोपटे काँग्रेसमध्ये होते. म्हणजे महाविकास आघाडीसोबत होते. त्यावेळी भोर मतदार संघामध्ये सुप्रिया सुळे यांना एक लाख ४३ हजार २४५ मते मिळाली होती. तर सुनेत्रा पवार यांना ९०४४० मते मिळाली होती. इथे ५२८०५ मतांची आघाडी सुप्रिया सुळे यांना मिळाली होती. त्याचप्रमाणे पुरंदर मतदारसंघात संजय जगताप काँग्रेसमध्ये होते. म्हणजे महाविकास आघाडीसोबत होते. त्यावेळी पुरंदरमध्ये सुप्रिया सुळे यांना एक लाख २५ हजार ९४८ मते मिळाली होती. तर सुनेत्रा पवार यांना ९० हजार ६६७ मते मिळाली होती. लोकसभा निवडणुकीला अजून साडेतीन-चार वर्षांचा अवकाश आहे. वर्षभरातच एवढी पडझड झालीय तर पुढच्या तीन वर्षांत आणखी काय काय होणार आहे, याचा अंदाज बांधणे कठीण आहे. परंतु बारामतीचा गड सर करण्याच्या दिशेने भाजपने गंभीरपणे वाटचाल सुरू केली आहे, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

आता संजय जगताप यांची राजकीय पार्श्वभूमी बघूया.

चंदूकाका जगदाप हे सासवडमधलं बडं प्रस्थ. ते सासवडचे रहिवासी असून सासवड नगरपरिषदेचे ते १९८५ ते १९९२ व पुन्हा २००२ ते २००७ या काळात नगराध्यक्ष होते. १९८५ सालापासून सलग सात वेळा ते पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक होते. २००४ मध्ये काही महिन्यांसाठी ते पुणे स्थानिक स्वराज्य मतदार संघातून विधानपरिषदेवर निवडून गेले. तर २००८पासून तीन वर्षांसाठी ते राज्य सहकार परिषदेचे (मंत्री दर्जा) अध्यक्ष होते. (Sanjay Jagtap)

संजय जगताप हे चंदूकाका जगताप यांचे पुत्र. संजय जगताप २००९ मध्ये पुरंदरमधून अपक्ष लढले होते, तेव्हा त्यांना ३३ हजार मते मिळाली होती. विजय शिवतारे ६७ हजार मते घेऊन निवडून आले होते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिगंबर दुर्गाडे ४४ हजार मते घेऊन दुसऱ्या क्रमांकावर होते. २०१४ मध्ये ७३ हजार मते मिळवणाऱ्या संजय जगताप यांचा शिवतारे यांनी ९ हजार मतांनी पराभव केला. २०१९ मध्ये मात्र संजय जगताप यांनी शिवतारे यांचा पराभव केला. मात्र २०२४ला संजय जगताप यांचा पराभव करून शिवतारे यांनी आपला गड पुन्हा काबीज केला. काही वर्षांपूर्वी संजय जगताप पुणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष होते. विधानसभा निवडणुकीतील पराभवाला एक वर्षही झाले नाही, तोवर त्यांनी पक्ष सोडून थेट भाजपमध्ये प्रवेश केला. सत्तेत असल्याशिवाय विकासकामे होत नाहीत, असा समज अजितदादा पवार यांनी रूढ केला आहे आणि तो सगळीकडे रुजायला लागला आहे. इथे ज्या दादा जाधवराव यांनी आयुष्य विरोधी पक्षात काढले, त्यांच्या मतदारसंघातील संजय जगतापांना एक वर्षही दम निघाला नाही.

संजय जगताप भाजपच्या वाटेवर असल्याची काही दिवसांपासून चर्चा होती. सासवड आणि जेजुरी येथील काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी संजय जगताप यांना भेटून भाजपमध्ये प्रवेश करण्याची मागणी केली होती, असे सांगतात. भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत संजय जगताप यांचा पक्षप्रवेश पार पडला. या पक्षप्रवेशामुळे आगामी निवडणुकीआधी काँग्रेसला निश्चितच मोठा धक्का बसला आहे. कारण संजय जगताप यांना सोबत घेण्यामागचे तातडीचे कारण हेच आहे.

पंचायत समिती, जिल्हा परिषद, पुणे महानगरपालिका या ठिकाणी आपल्या कुठल्याही पैलवानाची पाठ मातीला लागणार नाही असा विश्वास देतो. येणाऱ्या काळात आम्ही भाजपाचा प्रचार आणि प्रसार करू. जी जबाबदारी द्याल, ती जबाबदारी तळमळीने शेवटपर्यंत पार पाडण्याचं काम करेन, अशी ग्वाही संजय जगताप यांनी भाजप प्रवेशावेळी दिली. (Sanjay Jagtap)

मात्र भारतीय जनता पक्षाचा भर तात्कालिक राजकारणापेक्षा दीर्घकालीन राजकारणावर असतो. २०२९ मध्ये महाराष्ट्राची सत्ता स्वबळावर जिंकण्याचा भाजपचा निर्धार आहे. त्यामुळे पुढच्या विधानसभा निवडणुकीआधी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यापासून भाजपने स्वतःची सोडवणूक करून घेतली तर आश्चर्य वाटायला नको. त्या पार्श्वभूमीवर संजय जगताप, संग्राम थोपटे, कुणाल पाटील हे काँग्रेसमधून आलेले नेते भाजपला त्या त्या ठिकाणी निश्चित उपयोगी ठरणार आहेत.

हेही वाचा :
दीपक काटेचा गॉडफादर बावनकुळेच : प्रविण गायकवाडांचा आरोप
हिंमत असेल तर मला अटक करा : ममतांचे आव्हान

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर