बेळगाव : प्रतिनिधी : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात महाराष्ट्र सरकारने उच्चाधिकार समिती आणि तज्ञ समितीची पुनर्रचना करून लवकरात लवकर बैठक घ्यावी, अशी विनंती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने ज्येष्ठ नेते शरद पवार यांना केली. समितीने त्यांची भेट घेऊन सीमा प्रश्नाबाबत चर्चा केली. मराठी भाषिक जनतेच्या भावना त्यांच्या कानावर घातल्या. (Samiti meeting with pawar)
सीमाप्रश्नाच्या दाव्या संदर्भात वकील आणि समन्वयकांची नेमणूक तसेच सीमा कक्षातील कर्मचाऱ्यांची नेमणूक याबाबत लवकर निर्णय व्हावेत, महाराष्ट्राचे सेवानिवृत्त महाअधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांची वकिलांच्या पॅनलवर नियुक्ती करावी, राज्य पुनर्रचना या विषयावर अविनाश कोल्हे यांची नेमणूक व्हावी अशा अनेक मागण्या संदर्भात यावेळी शरद पवार यांच्याशी चर्चा करण्यात आली.
श्री. पवार यांनी अत्यंत आस्थेवाईकपणे साऱ्या गोष्टींची माहिती घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर संबंधितांशी चर्चा करू, याबाबत लवकरात लवकर बैठक बोलवण्याची विनंती करतो, असे सांगितले. (Samiti meeting with pawar)
समितीने मागणी केलेल्या गोष्टींपैकी समन्वयकाची नेमणूक करण्यात आली, पण समन्वयक मंत्र्यांनी वेळोवेळी सीमा भागात येऊन येथील मराठी भाषिकांशी चर्चा करावी, अशी ही विनंती यावेळी करण्यात आली. केंद्रीय गृह मंत्रालयाने महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रदेशातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्राचे व कर्नाटकाचे तीन मंत्री यांची समिती स्थापन केली आहे, पण याचीही बैठक घेतली जात नाही. यासाठी आपण स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करावी अशी विनंती यावेळी शिष्टमंडळाने केली. (Samiti meeting with pawar)
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळात मध्यवर्ती समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, तालुका समितीचे सेक्रेटरी एम. जी. पाटील, खानापूर समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई, उपाध्यक्ष गोपाळराव पाटील व महादेव मंगनाकर यांचा समावेश होता.
हेही वाचा :
गुजरातेत सापडले हजारावर बांगलादेशी