Home » Blog » संकटाच्या गर्तेतून राष्ट्रवादी काँग्रेस कशी मार्ग काढणार?

संकटाच्या गर्तेतून राष्ट्रवादी काँग्रेस कशी मार्ग काढणार?

by प्रतिनिधी
0 comments
How will the NCP find a way forward

विविध घटना-घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेस सध्या चर्चेत आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर पडदा पडला नसला तरी तो विषय मागे पडला आहे. सुनील तटकरे यांच्या ताज्या मुलाखतीने त्यासंदर्भात काही नवे मुद्दे समोर आणले आहेत. आणि अमोल मिटकरी यांच्या ट्विटने राष्ट्रवादीतील अंतर्गत राजकारणावर प्रकाश टाकला आहे. पक्षासाठी गुलाबी रणनीती आखणा-या डिझाइन बॉक्सच्या नरेश अरोरा यांचे कंत्राट संपले आहे. त्याचवेळी रुपाली चाकणकर आणि नरहरी झिरवळ यांच्या प्रकरणांच्या सावटातून पक्ष अजून बाहेर पडलेला नाही.

विजय चोरमारे

नरेश अरोरा आणि डिझाइन बॉक्स ही नावे अलीकडे सातत्याने चर्चेत होती. अजित दादांच्या अपघाती मृत्यूनंतर राष्ट्रवादीअंतर्गत राजकारणात ते अधिक सक्रीय दिसत होते. अजितदादांच्या मृत्यूनंतर तिस-या दिवशी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यामागे नरेश अरोरा असल्याचं सांगितलं जात होतं. दरम्यान मधल्या काळात नरेश अरोरा यांना अजित पवार यांनी झापल्याचे रोहित पवार यांनी जाहीरपणे सांगितलं होतं. आता अजितदादांच्या पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनीही अरोरांच्या कार्यपद्धतीबाबत जाहीर विधाने केल्यामुळे रोहित पवारांच्या आरोपांना बळकटी मिळाली आहे.

 दरम्यान अरोरा यांचं कंत्राट राष्ट्रवादीनं रद्द केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. मात्र ३१ मार्चला मुदत संपल्यामुळं ते रद्द झाल्याचं पक्षाच्या सूत्रांकडून सांगण्यात येतं. अरोरा २०२४च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आले होते. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही ते अजितदादांसोबत होते. नजिकच्या काळात कुठल्या निवडणुका नसल्यामुळे पक्षाला अशा रणनीतीची आवश्यकता नाही. (How will the NCP find a way forward)

अमोल मिटकरी यांचा ट्विटरबाँब

दरम्यान अमोल मिटकरी यांनी ट्विट करून अरोरा यांच्यासंदर्भातील काही गंभीर बाबी समोर आणल्या आहेत. त्यांनी म्हटलंय की “अजितदादांच्या विमानाचा घातपात की अपघात या चर्चेतील मुख्य व लक्ष नसलेलं एक पात्र म्हणजे डिझाईन बॉक्स वाला गडी,नरेश अरोरा ! आता पुढील काळ निवडणुका नसल्याने याचं पक्षातील काम संपलं असलं तरीही काही बाबी दादांवर जीव ओवाळणाऱ्या जनतेला माहित असाव्या म्हणून हा शब्द प्रपंच..

राष्ट्रवादीतील सध्या निवडून आलेल्या आमदारांना तिकीट देऊ नये म्हणून चुकीचे सर्व्हे करून याने दादाना दिले मात्र तेच आमदार ५० हजारांहून अधिक मतांनी निवडून आले. डिझाईन बॉक्सच्या सर्व्हेला न जुमानता अजितदादांनी स्वतःच्या यंत्रणेच्या तिकीट दिले. ही माहिती पक्षातील अनेक आमदारांना आहे.

पक्षातील एखादा आमदार नरेश अरोरांना भेटत नाही, ओळखत नाही किंवा नमस्कार करत नाही, या कारणांवरून त्या आमदारांविषयी चुकीची माहिती अजितदादांना अरोरा द्यायचा. सुरुवातीच्या काळात हा संघटनेत प्रामाणिकपणे काम करत असावा असा विश्वास ठेवून अजितदादांनी काही आमदारांना झापलेही; पण नंतर संबंधित आमदारांनी अरोरांशी संबंध सुधारल्यावर त्यांचे रिपोर्ट आपोआप चांगले येऊ लागले. निवडणुकीत अजितदादा अधिक जागा लढवण्याच्या तयारीत असताना याच अरोराने कमी जागा लढवाव्यात, सेना भाजपविरोधात उमेदवार देऊ नयेत, आणि दिल्यास त्यांचा प्रचार करू नये, असे प्रयत्न केले. अजितदादांच्या अनेक सभा रद्द करण्यात आल्या.

अजितदादांना या सर्व गोष्टींची जाणीव होती; मात्र ऐन निवडणुकीच्या काळात नवीन प्रचारयंत्रणा उभी करणे योग्य ठरणार नाही म्हणून त्यांनी या गोष्टींमध्ये लक्ष घातले नाही. पत्रके वाटणे, बॅनर लावणे आणि वातावरण निर्मिती करणे या नावाखाली पक्षाकडून अरोरा आर्थिक लाभ घेत असला तरी प्रत्यक्षात काहीच काम झाले नव्हते. अजितदादांवर विविध माध्यमांतून टीका होत असताना याने कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही व कोणतीही प्रभावी प्रतिक्रिया दिली नाही. याला महाराष्ट्राचा इतिहास, राजकारण आणि समाजकारण याविषयी एक टक्काही माहिती नव्हते. १०–१२ फोटोग्राफर लावणे आणि दादाना पिंक जॅकेट घालण्याचा सल्ला देणे यापलीकडे अरोराचे कोणतेही ठोस योगदान नव्हते.

अजितदादा सत्तेत होते आणि ४१ आमदार निवडून आले हे संपूर्ण श्रेय अजितदादांनाच जाते. त्यात इतरांचे व याचे काडीचेही योगदान नव्हते. अजितदादांनी अवाजवी घोषणा कराव्यात अशा सूचना अरोरा द्यायचा मात्र दादांनी स्पष्ट शब्दांत नकार देत सांगितले की, “मी जे करू शकतो तेच लोकांसमोर बोलणार,” आणि त्यांनी ते काटेकोरपणे पाळले.

पवार साहेबांवर टीका करावी अशा सूचना तो द्यायचा मात्र अजितदादांनी त्या कधीही मान्य केल्या नाहीत. राष्ट्रवादीच्या जोरावर अरोराने एक विमान कंपनी स्थापन केल्याची माहिती ऐकिवात आहे. सेकंड-हँड विमान खरेदी केल्याचेही सांगितले जाते. या प्रश्नाची उत्तरे दिल्याशिवाय याने महाराष्ट्र सोडू नये.“ (How will the NCP find a way forward)

विधानसभेच्या यशाचे श्रेय कुणाचे?

नरेश अरोरांवर मिटकरी यांनी केलेले आरोप गंभीर स्वरुपाचे आहेत. परंतु तरीसुद्धा अरोराशी असलेले कंत्राट व्यावहारिक स्वरुपाचे होते. ते संपले आहे. व्यावसायिक व्यक्तिशी राजकीय पक्षाने कसे संबंध ठेवायचे, याच्या काही सीमारेषा असायला हव्या होत्या, त्या इथे नव्हत्या. सुरुवातीपासून तशी कुजबूज होती, तक्रारी येत होत्या. परंतु विधानसभेला यश मिळाल्याने प्रश्न कुणी प्रश्न विचारू शकले नाही.

आता विधानसभेच्या निवडणुकीतील यशाचे श्रेय अरोराला कसे द्यायचे? कारण विधानसभेला सगळ्या महायुतीलाच यश मिळाले. आणि त्यांच्या त्यांच्या क्षमतेनुसार ते यश मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेसला ४१ जागा मिळाल्या. शरद पवारांच्या पक्षाला १० जागा मिळाल्या. म्हणजे दोन्ही राष्ट्रवादींना ५१. आता एकत्रित राष्ट्रवादीच्या जागांचे प्रमाण सर्वसाधारण तसेच राहिले आहे. जर अजितदादांच्या राष्ट्रवादीला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेपेक्षा अधिक जागा मिळाल्या असत्या, तर डिझाईन बॉक्सच्या रणनीतीला काही श्रेय देता आले असते. परंतु सत्ताधा-यांच्या लाटेत किमान जागा टिकवल्या याचे श्रेय रणनीती आखणा-या कंपनीला देणे इष्ट ठरणार नाही. (How will the NCP find a way forward)

विलिनीकरणाबाबत तटकरेंचे नवे विधान

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा गेल्या तीन-साडेतीन महिन्यांपासून आहे. अजितदादांच्या अपघाती मृत्यूनंतर ती अधिक ठळकपणे पुढे आली. तेव्हा शरद पवार यांच्या पक्षातील नेत्यांना अजितदादांच्या पक्षावर ताबा घ्यायचा आहे, अशी चर्चा सुरू झाली. प्रकरण एकदम टिपेला पोहोचले आणि एकदम शांत झाले. प्रारंभीच्या काळात विलिनीकरणाबाबत कानावर हात ठेवणारे अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी एबीपीशी बोलताना विलिनीकरणाच्या मुद्द्याला पुन्हा तडका दिला आहे. राष्ट्रवादीचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येण्याबाबत चर्चा झाल्याची कबुली सुनील तटकरे यांनी दिली आहे. आपण विलीनीकरणाच्या विरोधात नव्हतो, मात्र अजितदादांच्या निधनानंतर समीकरण पूर्ण बदलले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की, आता ते विलिनीकरणासाठी अनुकूल नाहीत.

रायगडमधील एका कार्यक्रमातील फलकावरूनही राजकारण तापले आहे. या पोस्टरवर अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचे फोटो नसल्याने त्यासंदर्भात सोशल मीडियावरून चर्चा झाली. पक्षातील गटबाजीची चर्चा त्यानिमित्ताने करण्यात आली. त्याबद्दल सुनील तटकरे आणि महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना स्पष्टीकरणही द्यावे लागले. (How will the NCP find a way forward)

चाकणकर, झिरवळ प्रकरणामुळे पक्षाची नाचक्की

नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातच्या अटकेनंतर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर वादात सापडल्या. त्यांना दोन्ही पदांचे राजीनामे द्यावे लागले. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या मंत्रालयातील कक्षात लाचखोरीचे प्रकरण घडले. त्यानंतर झिरवळ यांची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली. त्यामुळेही पक्षाची नाचक्की झाली.

दरम्यान पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी १६ फेब्रूवारीला निवडणूक आयोगाला पत्र देऊन पक्षाचे अधिकार आपल्याकडे घेतले. २६ फेब्रुवारीला सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली आणि पार्थ पवार राज्यसभेचे उमेदवार ठरले. त्यानंतर १० मार्चला सुनेत्रा पवार यांनी, अजितदादांच्या मृत्यूनंतरच्या काळात झालेला कोणताही पत्रव्यवहार ग्राह्य धरू नये, असे पत्र निवडणूक आयोगाला दिले आहे. त्यावरून पक्षातील सत्तासंघर्षाची चर्चा होते. कारण त्यासंदर्भात कोणीही जबाबदार नेत्याने स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यामुळे त्याबाबतचा संशय आणि संभ्रम कायम आहे.

अजितदादांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत खंबीरपणे परिस्थितीचा सामना करण्याऐवजी अंतर्गत संघर्ष उफाळला आहे. तशातच पक्षापुढची संकटे वाढत आहेत. रोज नव्या संकटाचा सामना करावा लागत आहे. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्ष या संकटांचा सामना करीत कशी वाटचाल करतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00