कोल्हापूर : प्रदीर्घ कालावधीच्या मागणीनंतर कोल्हापूरला आय.टी.पार्क स्थापन करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. कोल्हापूरमधील प्रस्तावित आयटी पार्कमुळे आयटी कंपन्यांना पर्यायी केंद्र उपलब्ध होईल आणि प्रदेशातील आर्थिक विकासाला गती मिळेल. आय.टी.पार्क कोल्हापूर शहर व जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरणार असून, या आय.टी.पार्कच्या माध्यमातून छत्रपती ताराराणी यांच्या शौर्याला, स्मृतींना उजाळा मिळावा या उद्देशाने करवीर संस्थापिका छत्रपती ताराराणी यांच्या नगरीमध्ये स्थापिल्या जात असलेल्या आय.टी.पार्कचे “करवीर संस्थापिका छत्रपती ताराराणी आय.टी.पार्क” असे नामकरण करावे, अशी मागणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली.
आय.टी.पार्क विकसित होत असताना महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडून उच्च दर्जाच्या पायाभूत सोयी सुविधा उपलब्ध कराव्यात अशी मागणीही क्षीरसागर यांनी केली. कोल्हापूर जिल्ह्याच्या शिवसेना संपर्कप्रमुख पदावर नियुक्तीनंतर उद्योग मंत्री उदय सामंत आज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते.
आमदार क्षीरसागर यांनी प्रथमत: कोल्हापूरला आय.टी.पार्क मंजूर केल्याबद्दल जाहीर आभार व्यक्त केले. कोल्हापुरात सुमारे ३४.३६ हेक्टर जागेत हे आय.टी.पार्क होत असताना कोल्हापूर हे सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांसह सीमाभागाचा केंद्रबिंदू असल्याने या भागातील युवकांना त्याचा उपयोग व्हावा. यासाठी उत्कृष्ठ असे आय.टी.पार्क निर्माण करून त्याला मुंबई, बेंगलोर, पुणेच्या धर्तीवर आय.टी.हबचा दर्जा प्राप्त करून द्यावा. मोठमोठ्या कंपन्यांनी याठिकाणी गुंतवणूक करावी याकरिता मित्र संस्थेच्या माध्यमातून आवश्यक ते सर्वतोपरी सहकार्य करू असेही ते म्हणाले. (IT Park should be named after Maharani Tararani)
आमदार क्षीरसागर म्हणाले, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडून आय.टी.पार्क विकसित करीत असताना उच्च दर्जाच्या पायाभूत सोयी सुविधा विकसित करणे आवश्यक आहे. यामध्ये प्रामुख्याने ‘झिरो-डिग’ युटिलिटी ट्रॅचेस, ग्लोबल आयटी सीएफसी, डार्क फायबर कॉरिडॉर व प्रायव्हेट सिक्स जी टेस्टबेड, ग्लोबल आयपी आणि पेटंट डेस्क, १००% ‘झिरो कार्बन’ ग्रीन बिल्डिंग्स, आयटी पार्कमध्येच समर्पित एक्सप्रेस फीडर आणि २२०/३३/११ केव्ही सबस्टेशनसह मजबूत वीजपुरवठा नेटवर्क, २००० घनमीटर जीएसआर आणि १००० घनमीटर ईएसआरसह समर्पित २४ तास पाणीपुरवठा, जागतिक दर्जाचे प्रशिक्षण केंद्र, भारतातील सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क्समार्फत (केंद्र सरकारची सेवा) मजबूत इंटरनेट सेवा, कोल्हापूरच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीला साजेसे सजावटीचे प्रवेशद्वार आदी सुविधा निर्माण करण्यात याव्यात. (IT Park should be named after Maharani Tararani)
शिवसेनेतील निष्ठावंताना पदांच्या माध्यमातून न्याय द्यावा
कोल्हापुरात १९८६ पासूनच्या स्थापनेपासूनचे शिवसैनिक निस्वार्थी आणि एकनिष्ठपणे काम करत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेल्या उठावानंतर त्यांच्या भूमिकेला समर्थन करण्याची सर्वप्रथम भूमिका फक्त कोल्हापूर शहरातील पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी घेतली. आमच्या सर्वांच्या घरावर प्रसंगी मोर्चे आले, जाणीवपूर्वक टार्गेट करण्यात आले. अशा या त्रासदायक वेळेतही न डगमगता खंबीरपणे शिंदे साहेबांना साथ दिली. या निष्ठावंत पदाधिकाऱ्यांना विविध समित्या, महामंडळे, विविध पदांच्या माध्यमातून न्याय देणे आवश्यक असून, यामाध्यमातून निष्ठावंत शिवसैनिकांना न्याय द्यावा, अशी मागणीही राजेश क्षीरसागर यांनी मंत्री सामंत यांच्याकडे केली. (IT Park should be named after Maharani Tararani)
यावेळी जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, जिल्हा समन्वयक सत्यजित कदम, नगरसेवक वैभव माने, नगरसेवक स्वरूप कदम, शहरप्रमुख रणजित जाधव, उपजिल्हाप्रमुख तुकाराम साळोखे, किशोर घाटगे, संजयगांधी निराधार योजना अध्यक्ष दीपक चव्हाण, समन्वयक कमलाकर जगदाळे, हर्षल सुर्वे, सुनील जाधव, आश्पाक आजरेकर, रिक्षासेना जिल्हाप्रमुख राजू पवार, अनिल पाटील, टिंकू देशपांडे, कृष्णा लोंढे, अंकुश निपाणीकर, सौरभ कुलकर्णी, देवेंद्र खराडे, सचिन भोळे, किरण अतिग्रे, अर्जुन संकपाळ, मुन्ना तोरस्कर, आदर्श जाधव आदी उपस्थित होते. (IT Park should be named after Maharani Tararani)