जमीर काझी : मुंबई : मुंबई महापालिकेची निवडणूक प्रचारात मराठी माणूस व महाराष्ट्र हा मुद्दा महत्वाचा बनला असताना मुंबई हे महाराष्ट्राचे शहर नसून आंतरराष्ट्रीय शहर आहे,असे वादग्रस्त विधान भाजपाचे स्टार प्रचारक व तामिळनाडूतील नेते के. अण्णामलाई यांनी केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. विरोधकांनी त्याबाबत आक्रमक भूमिका घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली आहे. त्याबाबत भाजपाच्या राज्यातील नेत्यांनी चुप्पी साधली आहे. मुंबईत मराठीसह मोठ्या प्रमाणावर अमराठी मतदार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपाकडून परप्रांतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध राज्यांतील नेत्यांना प्रचारासाठी मुंबईत उतरवण्यात येत आहे. अशाच प्रचारादरम्यान अण्णामलाई यांनी केलेल्या वक्तव्यामुळं राजकीय वातावरण तापले आहे.
मुंबईत निवडणूक प्रचारादरम्यान एका स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना अण्णामलाई यांनी, “मुंबईत ट्रिपल इंजिन सरकार आवश्यक आहे. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबईत भाजपाचा महापौर असायला हवा. मुंबई हे महाराष्ट्राचे शहर नाही तर आंतरराष्ट्रीय शहर आहे. या शहराचं बजेट सुमारे ४० हजार कोटीचे आहे. चेन्नईचे बजेट आठ हजार कोटी, तर बंगळुरूचं १९ हजार कोटी आहे. त्यामुळं मुंबईसारख्या शहरासाठी सक्षम प्रशासनाची गरज आहे.”असे वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांच्या या विधानाचा शिवसेना ठाकरे गटाचे खा. संजय राऊत व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार)पक्षाच्या खा. सुप्रिया सुळे यांनी या वक्तव्याचा निषेध केला. (K. Annamalai’s controversial statement)
अण्णामलाई यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे … खासदार राऊत म्हणाले,’ अण्णामलाई यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे, हे विधान मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर भूमिका स्पष्ट करावी, अशीही मागणी त्यांनी केली. खा.सुप्रिया सुळे म्हणाल्या, “मुंबई ही महाराष्ट्राची आहे आणि महाराष्ट्राचीच राहील. मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करता येणार नाही,” (K. Annamalai’s controversial statement)
कोण आहेत के. अण्णामलाई?…. के. कुप्पुसामी अण्णामलाई हे भाजपाचे नेते आणि माजी आयपीएस अधिकारी आहेत. कर्नाटक कॅडरमध्ये कार्यरत असताना त्यांनी २०१९ मध्ये पोलीस सेवेचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत तामिळनाडूतील कोयंबतूर मतदारसंघातून निवडणूक लढविताना पराभूत झाले. मुंबई महापालिका निवडणुकीत ते भाजपाचे स्टार प्रचारक म्हणून काम करत आहेत. (K. Annamalai’s controversial statement)