जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीच्या वेळी जो काही राडा झाला, त्यामुळे यशवंतराव चव्हाण यांच्या सातारा जिल्ह्याला आणि महाराष्ट्रातल्या लोकशाहीला शरमेनं मान खाली घालावी लागली. अजितदादा पवार हयात नसल्याचे किती भीषण परिणाम असू शकतात, हे यानिमित्ताने महाराष्ट्राला बघायला मिळाले. खुद्द एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यातच देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस बळाचा वापर करून शिंदे यांची नाचक्की केल्याची सार्वत्रिक प्रतिक्रिया आहे. कॅप्टन अशोक खरातच्या अटकेपाठोपाठ साताऱ्यातील नाट्य म्हणजे एकनाथ शिंदे यांचे काउंटडाऊन सुरू झाल्याचे राजकीय वर्तुळात मानले जाते.
- विजय चोरमारे
सगळी प्रसारमाध्यमे कॅप्टन अशोक खरात या भोंदू बाबाच्या अटकेनंतरच्या घडामोडी आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा राजीनामा मागण्यामध्ये मश्गूल होती. त्याच काळात इकडे यशवंतराव चव्हाणांच्या सातारा जिल्ह्यातल्या राजधानीच्या शहरात लोकशाहीचा खून पडत होता. भाजपने कोणताही विधिनेषेध न पाळता पोलिसांचा आणि प्रशासनाचा गैरवापर केला. त्यामुळे प्रसारमाध्यमांनी या सगळ्या नाट्याचे जेवढं गांभीर्य होते, त्या गांभीर्याने त्याकडे लक्ष दिले नाही किंवा सोयीस्कर दुर्लक्ष केले. एखादी निवडणूक जिंकण्यासाठी आपण कोणत्या थराला जाऊ शकतो, हे देवेंद्र फडणवीस यांनीही यानिमित्ताने दाखवून दिले.
पालकमंत्र्यांना फाट्यावर मारुन प्रशासनाकडून भाजपचे काम
कल्पना करा. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक आहे. भारतीय जनता पक्ष एकीकडे आणि राज्याच्या सत्तेत असलेले शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या विरोधात. भाजपकडे दोन मंत्री – जयकुमार गोरे आणि शिवेंद्रराजे भोसले. तर विरोधकांकडे शिवसेनेचे शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादीचे मकरंद पाटील. शिवाय राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री शशिकांत शिंदे. शंभूराज देसाई पालकमंत्री असल्यामुळे जिल्ह्याच्या पोलिस आणि प्रशासनावर त्यांचेच आदेश चालायला हवे होते. परंतु थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातले होते. कोणत्याही परिस्थितीत सातारा हातातून जाऊ द्यायचा नाही, याचा निर्धार त्यांनी केला असावा. त्यामुळे साताऱ्यातील पोलिस दलाने आणि प्रशासनाने पालकमंत्र्यांना फाट्यावर मारून भारतीय जनता पक्षाचे काम केले. सातारा पोलीस भाजपच्या घरगड्यासारखे वागले, हा शंभूराज देसाई यांच्या आरोपावरून वस्तुस्थितीची कल्पना येऊ शकते. ( Countdown for Eknath Shinde has begun in Satara)
पालकमंत्री जखमी झाले, खासदार जिन्यावरुन पडले
सगळ्या गदारोळात हाणामारीत पालकमंत्री जखमी झाले, त्यांच्या बोटाला दुखापत झाली. खासदार नितीन पाटील जिन्यावरून खाली पडले. एका मंत्र्याच्या सोबत असलेल्या सदस्याला दुसऱ्या मंत्र्याने खेचण्याचा प्रयत्न केला. मतदानाच्या आधी मंत्री सभागृहात जाऊन सदस्यांना मतदान करण्यासाठी धमकावत होते. जिल्हा परिषदेशी संबंध नसलेल्या लोकांना सभागृहात घुसायला पोलीस आणि प्रशासनाने परवानगी दिली. जे रणकंदन झाले, ते कोणत्या पातळीवरचे होते, याची कल्पना यावरून येऊ शकते. पोलिस आणि प्रशासनाचा वापर करून भाजपने सातारा जिल्हा परिषद ताब्यात घेतली. भाजपने निवडणूक जिंकली असली तरी या पक्षाची जी नाचक्की झाली आहे, त्यामुळे १९९९ मध्ये साताऱ्यात झालेल्या रक्तरंजित राजकारणाची अनेकांना आठवण आली. फरक एवढाच होता, की खासदार उदयनराजे भोसले या सगळ्या गोंधळापासून दूर राहिले. उदयनराजेंची प्रगल्भता वाढायला लागली आहे, हेच यावरून दिसून येते.
भाजपकडून खतरनाक चाल
सातारा जिल्हा परिषदेचं सभागृह ६५ सदस्यांचे आहे. त्यात भाजपचे २७, राष्ट्रवादीचे २०, शिवसेनेचे १५, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एक, अपक्ष २ असे संख्याबळ होते. दोनपैकी एक अपक्ष भाजपसोबत असल्यामुळे त्यांचे संख्याबळ २८ होतं. अध्यक्ष निवडून आणण्यासाठी ३३ सदस्यांचे पाठबळ आवश्यक होते. भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे प्रत्येकी दोन सदस्य आधीच फोडले होते. त्यामुळे त्यांचे संख्याबळ ३२ झाले. तरीसुद्धा विरोधकांकडे एक सदस्य जादा होता.
भाजपने एक खतरनाक चाल खेळली. निवडीच्या आदल्या रात्री राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांवर अपहरणाचा गुन्हा दाखल केला. वाई तालुक्यातील यशवंतनगर मतदारसंघातील बापूसाहेब शिंदे यांच्या मुलाने अपहरणाची फिर्याद दिली. अनिल देसाई आणि संदीप मांडवे या दोन सदस्यांसह इतर दोघांनी आपल्या वडिलांचे अपहरण केल्याची ही फिर्याद होती. पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला. ( Countdown for Eknath Shinde has begun in Satara)
राष्ट्रवादी, शिवसेनेचे सदस्य मतदानासाठी बसमधून आले. परंतु पोलिसांच्या रडारवर असलेल्या सदस्यांना शंभूराज देसाई स्वतः आपल्या गाडीतून घेऊन आले आणि त्यांना जिल्हा परिषद सभागृहाकडे घेऊन गेले. आता पालकमंत्री हे जिल्ह्याच्या संपूर्ण प्रशासनाचे पालक. परंतु त्यांच्या ताब्यातल्या या दोन सदस्यांना पोलिसांनी अटक केली आणि मतदान करू दिले नाही. का, तर म्हणे त्यांच्यावर अपहरणाचा गुन्हा आहे. जन्मठेप भोगत असलेले विधिमंडळ सदस्य विधानपरिषद किंवा राज्यसभेच्या मतदानासाठी येत असतात. न्यायालय त्यांना परवानगी देत असते. परंतु इथे खोटा गुन्हा दाखल असलेल्या सदस्यांना मतदानापूर्वी पोलिस अटक करून घेऊन जातात, यावरून परिस्थिती किती हाताबाहेर गेली आहे, याची कल्पना येऊ शकते. राष्ट्रवादीचा आणखी एक सदस्य सभागृहात फोडला. त्यामुळे भाजपनं ३३ विरुद्ध ३० अशा फरकानं निवडणूक जिंकली. या एकूण प्रकाराविरोधात रस्त्यावरच्या लढाईबरोबरच न्यायालयीन लढाई करण्याचा इशारा विरोधकांनी दिला आहे. तो ते कुठपर्यंत नेतात की मधेच गळपटतात हे बघावे लागेल.
उपमुख्यमंत्री शिंदे यांची नाचक्की करण्याचा प्रयत्न
आता यातली आणखी एक गंमत लक्षात घ्या. महेश शिंदे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार. त्यांच्या पत्नी भाजपच्या जिल्हा परिषद सदस्या. त्यांनाच अध्यक्षपदासाठी उमेदवारी देण्याची चाल भाजपनं खेळली. शिवाय कोरेगावचे शिवसेनेचे दोन सदस्य भाजपसोबत गेले. म्हणजे एकनाथ शिंदे यांची जेवढी म्हणून नाचक्की करता येईल तेवढी करण्याचा भाजपने प्रयत्न केला.
एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील ज्येष्ठ मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले शंभूराज देसाई हे जखमी होतात. बाळासाहेब देसाई यांचा नातू जखमी होतो. एकनाथ शिंदे यांच्यासह शंभूराज यांचे राजकीय आणि मानसिक खच्चीकरण करण्याचा भाजपचा प्रयत्न यातून स्पष्ट होतो.
भाजपने जयकुमार गोरे आणि शिवेंद्रराजे भोसले यांना काहीही करण्यास मुभा दिली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवसभरात आठ वेळा पोलिस आधिकाऱ्यांना फोन करून सूचना दिल्या. यावरून भाजपने ही निवडणूक किती प्रतिष्ठेची केली होती, हे लक्षात येऊ शकते. ( Countdown for Eknath Shinde has begun in Satara)
शिवसेनेचे सदस्य सुरक्षित स्थळी म्हणून गोव्याला नेले होते. तिथे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा वापर करून गोवा पोलिसांच्या मदतीने शिवसेनेच्या दोन सदस्यांना उचलल्याचा आरोप विरोधी नेत्यांकडून करण्यात आला आहे. यावरून एका जिल्हा परिषदेसाठी भाजपने किती यंत्रणा कामाला लावल्या होत्या, हे लक्षात येऊ शकते. चुकून जर एखाद्या पक्षाने सदस्यांना इस्राएलला नेले असते तर भाजपने बेंजामिन नेत्यान्याहू यांनाही कामाला लावले असते.
खरेतर सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही अशीच अटीतटी होती. तिथेही पोलिस यंत्रणेचा वापर केला. पहाटे हॉटेलवर छापा टाकण्यात आला. परंतु तिथं एका मर्यादेपलीकडे पोलिस बळाचा वापर केला गेला नाही. चंद्रकांतदादा पाटील हे सांगलीचे पालकमंत्री आहेत. साताऱ्यात मात्र शेंडी तुटो वा पारंबी अशा आवेशात सगळं केलं गेलं. त्याचं एकच कारण – एकनाथ शिंदे यांची ठासायची.
आता सातारा जिल्हा परिषदेत भाजपच्या प्रिया महेश शिंदे यांची अध्यक्षपदी तर राजू भोसले यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. त्यामुळे भाजपची प्रतिष्ठा वाढली की, नाचक्की झाली हे जिल्ह्यातील भाजपच्या कार्यकर्त्यानाही सांगता येत नाही. एकनाथ शिंदे आणि शंभूराज देसाई यांची नाचक्की मात्र झाली.दिल्लीत जाऊन नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांचं काउंटडाऊन सुरू केलं आहे, असे महाराष्ट्राच्या राजकारणात मानले जाते.
सुरुवातीला म्हटले आहे की, अजितदादा नसल्याचे भीषण परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणात दिसून येत आहेत. सातारा जिल्ह्यात एकच चर्चा आहे, अजितदादा हयात असते तर देवेंद्र फडणवीसांनी एवढे धाडस केले असते का?( Countdown for Eknath Shinde has begun in Satara)