शेअर बाजारामध्ये सायकॉलॉजिकल बॅरियर नावाचा मजेशीर प्रकार असतो. एखादा शेअर विशिष्ट आकड्याच्या वर गेला की तो प्रचंड वाढणार असं मानलं जातं. किंवा खालच्या पातळीवर एका विशिष्ट आकड्यापेक्षा एका अंकाने जरी खाली गेला की त्याच्यावरचा विश्वास डळमळीत होऊन त्या शेअरची जोरदार विक्री सुरू होते. वरची आणि खालची पातळी दर्शवणाऱ्या आकड्यांना अनेकदा ठोस शास्त्रीय आधार नसतो. पण त्यांच्या आधारे टेक्निकल अॅनालिसिस करून लोकांना भरपूर गुंगवलेही जाते आणि बाजारही दारुड्यासारखा झुलू शकतो. मुंबई महापालिकेतील विजयानंतर भाजपचा जल्लोष तसल्याच मानसिक अडसराचा चांगला नमुना आहे.
राजेंद्र साठे
२०१७ च्या निवडणुकीत एकट्याने लढूनही ८२ जागा मिळाल्या, तेव्हाच वास्तविक पाहता मुंबई महापालिकेची सत्ता भाजपच्या टप्प्यात आली होती. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपची पकड आणखी मजबूत झाली. मुंबईत पालिकेच्या जागा आहेत २२७ आणि विधानसभेच्या एकूण जागा आहेत ३६. म्हणजे एका विधानसभा मतदारसंघात सरासरी सहा नगरसेवक पडतात. २०२४ च्या विधानसभेमध्ये भाजपला मुंबईत १५ जागा मिळाल्या होत्या. याचाच अर्थ, ९० नगरसेवक जिंकून आणण्याइतकी मते त्याला मिळाली होतीच. आता एक वर्षांनंतर भाजपला बरोबर तेवढ्याच जागा मिळाल्या आहेत. म्हणजे वर्षभरापूर्वीच्या यशाची पुनरावृत्ती झाली आहे. आता आकड्यांच्या हिशेबात सर्वात मोठा पक्ष ठरून भाजपची सत्ता अखेर एकदाची येणार आहे. यामध्ये २०१४ मध्ये काँग्रेस जाऊन भाजपची सत्ता येणार हे जितकं नक्की होतं, तितकाच मुंबईतला निकालही अपेक्षित होता हे लक्षात ठेवायला हवं. (Thackeray and Shinde will become like ‘Ramdas Athawale’)
खुशीची गाजरे
भाजपच्या या कथित बॅरियर तोडण्यामुळे गुजराती, जैन, मारवाडी आणि हिंदी भाषक लोक बरेच खूश आहेत. जणू मुंबई ही मराठी लोकांनी जबरदस्तीने ताब्यात ठेवली होती व ती आता स्वतंत्र झाली आहे, असा आनंद सोशल मीडियातून व्यक्त करण्यात येत आहे. २०१४ मध्ये भारताला खरे स्वातंत्र्य मिळाले, असे म्हणणाऱ्यांचे भाईबंदच हा आनंद व्यक्त करण्यात सर्वात पुढे आहेत, हे सांगायला नकोच. गंमत अशी, की कोलकात्याची पालिका बंगाली लोकांच्या किंवा चेन्नईची तमीळ लोकांच्या ताब्यात आहे, म्हणून कधी कोणाला वाईट वाटत नाही. मुंबईतील मराठी माणसांचे वर्चस्व मात्र या ज्यांचा याच्याशी थेट संबंध नाही, अशा उत्तर हिंदुस्थानी लोकांनाही खटकत असते.
गेल्या वर्षी फडणवीस सरकारने पहिलीपासून हिंदीची सक्ती केल्यानंतर सुरू झालेल्या आंदोलनात मराठी न बोलणाऱ्या फेरीवाल्यांना मारहाणीचे काही प्रकार घडले. यावर एरवी सर्व प्रश्नांवर समतोल भूमिका घेणाऱ्या ‘न्यूजलॉन्ड्री’ सारख्या डिजिटल वाहिनीचाही तोल ढळला. मराठी प्रांतात हिंदी लोकांना सर्रास मारहाण सुरु आहे, असा सूर त्यांनी लावला. हिंदी सक्तीला विरोध म्हणजे देशाला विरोध असे समीकरण दैनिक हिंदुस्तान या हिंदुस्तान टाइम्स गटाच्या अग्रगण्य हिंदी दैनिकाच्या अग्रलेखात मांडण्यात आले. वास्तविक मारहाणीचे चार-पाच प्रकार तुरळक घडले होते. इतकी वर्षे हिंदी प्रांतातून आलेल्यांशी सर्व मराठी लोक कायम हिंदीतून बोलत आले आहेत, त्यामुळेच या हिंदी लोकांना इथे बस्तान बसवणे, चेन्नई किंवा बंगळुरूच्या तुलनेत सोपे गेले आहे, याकडे दिल्लीतील मीडियाने पूर्ण दुर्लक्ष केले होते. बाकी हिंदी चॅनेलवाल्यांचे तर विचारायचीच सोय नव्हती. तीच स्थिती यंदाच्या निवडणूक निकालानंतरही दिसली. भाजपने मराठी माणसाला सहा फूट खाली गाडले, मराठी ठाकरे सेनेकडून भाजपने मुंबई सोडवली अशी अनेक ट्विट्स हिंदी पट्ट्यातून करण्यात आली. (Thackeray and Shinde will become like ‘Ramdas Athawale’)
मराठी अस्तित्वाचा अर्थ
योगायोग पाहा, मुंबई पालिकेचे निकाल येत होते, तेव्हाच सोमनाथ मंदिरावरील हल्ल्याला एक हजार वर्षे पूर्ण झाल्याची आठवण केली जात होती. हिंदू अस्मितेवरचा हल्ला उलटवून लावून आज सोमनाथ मंदिर व परिसर कसा डौलाने उभा आहे, याची नरेंद्र मोदी आठवण करून देत होते. सोमनाथमध्ये हिंदू अस्मितेच्या रक्षणाची ठाम भूमिका मांडणारे व त्याला टाळ्या वाजवणारे लोकच मुंबईतील मराठी अस्मिता चिरडण्याची मागणी करीत होते. तिचा निवडणुकीत पराभव झाला म्हणून आनंद व्यक्त करीत होते.
या देशात मुंबई व कोलकाता ही दोनच खऱ्या अर्थाने महानगरे आहेत. ती दोन्ही ब्रिटिशांनी निर्माण केली आहेत. दिल्ली व चेन्नई ही वाढलेली खेडेगावे आहेत. मुंबई उभी करताना ब्रिटिशांनी स्थानिकांची संस्कृती चिरडण्याचा प्रयत्न केला नाही. उलट मराठीचा अभ्यास केला व तो करायला पैसेही दिले. संस्था उभारल्या. काळाच्या ओघात मुंबई हे संपूर्ण भारतातले (म्हणजे पाकिस्तानी व बांगलादेशी प्रांत धरून) एक वैशिष्ट्यपूर्ण शहर बनले. इथली कार्यसंस्कृती, वक्तशीरपणा, कायदा व सुव्यवस्था, खुलेपणा, सिनेमासारख्या कलेचा विकास, धंदेउद्योगांना मिळालेले स्वास्थ्य हे अद्वितीय ठरले. मुद्दा असा की, मराठी माणूस हा धंदेवाला नसेल, त्याला पैशांची समज नसेल. पण हे शहर उभे करण्यात, ते सुविहितपणे चालवण्यात व इथली आधुनिक संस्कृती घडवण्यात मराठी माणसांचे मोठे योगदान आहे. प्रामाणिकपणा, कायद्याचे पालन करणे, न्याय्य गोष्टींच्या बाजूने उभे राहणे, कामामध्ये चोख असणे, वक्तशीरपणा हे मराठी समाजाचे सरासरी गुण सांगता येतात. अनेकांनी ते मान्य केले आहेत. मुंबईमध्ये पैसे आल्याने तिचा विकास झाला हे अर्धसत्य आहे. मराठी समाजाच्या वैशिष्ट्यांमुळे तिला एक मजबूत आधार मिळाला व तिचा विकास झाला.
साधी गोष्ट आहे. मुंबईचं पोलिस दल जगातील उत्कृष्ट पोलिसांपैकी एक मानलं जात असे. बेस्ट ही बससेवा सर्व देशात उत्तम होती. महाराष्ट्राच्या आयएएस किंवा प्रशासकीय सेवेच्या केडरमध्ये येण्यासाठी सर्व तरुण धडपडत असत. कारण, येथे चांगले काम करायला मिळते व फार हस्तक्षेप नसतो असा लौकिक होता. या सर्व व्यवस्था कोण चालवत होते किंवा यांचे कारभारी कोण होते? ते अधिकारी असोत वा अगदी राजकारणी प्रामुख्याने मराठीच होते. त्यांना त्यांचे म्हणून काही श्रेय द्यायला हवे की नको?
दुसऱ्या बाजूने न्यायासाठी भांडणे करणे हाही मराठी लोकांचा विशेष आहे. मुंबईत उभ्या राहिलेल्या सर्व चळवळी, आंदोलने, कामगारांचे लढे यामध्ये मराठी माणूस अग्रगण्य राहिलेला आहे. भ्रष्टाचारविरोधाची, पर्यावरण रक्षणाची, बिल्डरांच्या विरोधातील किंवा बेस्ट वाचवा यासारखी सार्वजनिक प्रश्नांवरची आंदोलने करण्यात मराठी समाजच पुढे असतो. मुंबईतील मराठी लोकांची संख्या आता जेमतेम तीस टक्के आहे. हिंदी अधिक गुजराती, जैन वगैरेंची संख्यात्याहून अधिक आहे. मात्र मुंबई शहराबद्दलच्या आस्थेने किंवा सामाजिक जाणीव म्हणून हे समाज फारच क्वचितरित्या अशा आंदोलनांमध्ये आढळतात. याही समाजांमध्ये काही जागृत कार्यकर्ते आहेत व ते यामध्ये नक्कीच भाग घेतात. पण एक समाज म्हणून ज्या हिरीरीने मराठी समाज सामाजिक, राजकीय वा आर्थिक प्रश्नांवर चळवळी करण्याचा प्रयत्न करतो, तसा इतर समाजांतून होत नाही. याचे कारण हेच आहे की, मराठी लोकांना मुंबई आपली वाटते आणि इतरांना ती वाटत नाही. परवा मुंबईतील निकालांनंतर अनेक इंग्रजी टीव्ही वाहिन्यांना निमित्त मिळाले. त्यांच्या चर्चेत ‘मराठी माणूस’ या शब्दाचा उपयोग ते शिवीसारखाच करताना दिसतात. एक बाई म्हणाल्या, मुंबई ही काय फक्त ‘मराठी माणस‘ ने निर्माण नाही केली. इथले उड्डाणपूल बांधणाऱ्या झारखंडच्या कामगाराचाही त्यात वाटा आहे. या बाई असे बोलत होत्या, जसे की हा कामगार म्हणजे त्यांचा चुलताच आहे. या बाई दिल्लीत बसणार, तिथे तिथल्या घरकामगारांना किंवा रस्त्यावरच्या मजुरांना बिहारी म्हणून हिणवणार. इथे येऊन मात्र झारखंडच्या कामगाराच्या बाजूने बोलणार. (Thackeray and Shinde will become like ‘Ramdas Athawale’)
मराठीचे विरोधक कोण ?
मुंबईमध्ये गेली दोन शतके अनेक जातीधर्मपंथांचे लोक येऊन राहिले व त्यांनी मुंबईची संपत्ती वाढवली हे खरे आहे. पण मुंबई हे अन्य कोणत्याही शहरासारखे एक शहर झाले नाही. दिल्लीमध्ये सर्व गोष्टी राजकीय सत्तेभोवती फिरतात. तसे इथे झाले नाही. त्याला स्वतःचा चेहरा लाभला तो इथल्या चळवळ्या आणि सजग लोकांमुळे. या लोकांमध्ये मराठी समाज अग्रगण्य होता व आहे. यात हिंदी पट्ट्यातून आलेले फार अपवादाने दिसतात. त्याची इतर आर्थिक वा सांस्कृतिक कारणे असतील व त्यांचे विश्लेषण करता येईल. पण ही वस्तुस्थिती लपत नाही.
दरम्यान, या निवडणुकीत ठाकरे हरणार असे वातावरण तयार झाले होते. पण त्यांनीही तो मानसिक अडथळा ओलांडला. यातही गंमत अशी की, ठाकरे सेनेला विधानसभेला दहा जागा होत्या. म्हणजे त्याचे सुमारे ६० नगरसेवक निवडून यायला हवे होते. प्रत्यक्षात ते दहाने जास्त आहेत. याउलट शिंदे सेनेला ६ जागा होत्या. म्हणजे त्याचे ३६ तरी नगरसेवक जिंकायला हवे होते. पण त्यांची गाडी २९ वर अडखळली. त्यातही विशेष म्हणजे विधानसभेला ठाकरेसेना व काँग्रेस यांची आघाडी होती. यावेळी ती नव्हती. अर्थात तेव्हा मनसे सोबत नव्हती, ती आता होती हाही मोठा फरक होता. असो.
मराठी अस्मिता की हिंदुत्व असा पेच येईल, तेव्हा तेव्हा भाजप हिंदुत्वाच्या बाजूनेच उभी राहील हे यावेळी स्पष्टपणे समोर आले. महापौर मराठी होणार की नाही याबाबत भाजपवाल्यांना बरीच कसरत करावी लागली व शेवटी तो हिंदू मराठी असेल असा पर्याय काढावा लागला. भाजप व शिंदे सेनेच्या वरळीतील पहिल्या संयुक्त सभेमध्ये प्रारंभीची घोषणा ही सियावर रामचंद्र की जय ही होती. अमित साटम नावाचा मुंबई शहराध्यक्ष ती देत होता. त्यानंतरही बऱ्याच हिंदी घोषणा दिल्या गेल्या. या स्थितीत मराठी समाजानेच ही निवडणूक हाती घेतली व त्यांनी ठाकऱ्यांना मते दिली. ठाकऱ्यांबाबत अनेक आक्षेप, शंका, भीती आहेत. मराठी अस्मिता या नावाने त्यांनी जे राजकारण केले त्यातून काय साध्य झाले व ते त्याबाबत किती प्रामाणिक आहेत याबाबत अनेकांना प्रश्न आहेत. तरीही भाजपच्या विरोधात उभे राहिल्याने लोकांनी ठाकऱ्यांना मते दिली.
गुजराती, जैन, मारवाडी, भैय्ये यांच्यासारखाच आणखी एक समाज इतकीच मराठी समाजाची हैसियत राहावी, असा भाजपचा प्रयत्न होता व राहील. त्याला अटकाव करण्यासाठी लोकांनी ठाकरे यांना मते दिली आहेत. महापालिका निकालानंतर ठाकरे बंधूकडून संमिश्र संकेत मिळाले असले तरीही, त्यापासून बोध घेऊन ते योग्यमार्गावर राहतील, अशी आशा करायला हवी. राज ठाकरे यांनी शेवटच्या सभेत अदानीच्या सर्वभक्षक विस्तारावर एक उत्तम आलेख सादर केला. हा अदानी केवळ मराठी लोकांच्या मुळावर आलेला नाही. त्याचा त्रास गुजराती धंदेवाले, मारवाडी किंवा सिंधी बिल्डर आणि टाटा, बिर्ला यांच्यासारखे उद्योगपती यांनाही होतो आहे. ते आज उघडपणे बोलू शकत नाहीत. आज मुंबईचा विमानतळ, वीज सेवा, बंदरे, रस्ते, धारावीसारखी मोठी वस्ती हे सर्व अदानीच्या ताब्यात गेले आहे. अदानीला सरकारी डेअरीच्या, मिठागरांच्या वा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातल्या जमिनी दिल्या जात आहेत. हा सर्व समाजाचाच तोटा आहे. त्याविरुध्द राज यांनी आवाज उठवणे हे मराठी समाजाच्या आजवरच्या चळवळींना साजेसे झाले. मुंबईवर खरे प्रेम असेल व मालकी सांगायची असेल तर गुजराती व हिंदी समाजांनी या लढ्यात पुढे यायला हवे हे आव्हान इथून पुढे त्यांना दिले जायला हवे. तसे करण्यातूनच मराठीची लढाई अधिक व्यापक होऊ शकेल. अन्यथा, संख्येच्या हिशेबात ठाकरे किंवा मराठीवाले मागे पडत जातील. ठाकरे यांचा राज्यातला किंवा पालिकेतल्या सत्तेचा पूर्वतिहास हा फारकर्तबगारीचा नसल्याने त्यांची आणखी पंचाईत आहे हेही त्यांनी लक्षात ठेवावे लागेल.
अवघड जागेची अडचण
दरम्यान, कालच्या निवडणुकीत शिंदे गटाला जोरदार दणका मिळाला. विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीणचा गाजावाजा करून शिंदेंनी धकवून नेले. पण हिंदुत्व विरुद्ध मराठी असा संघर्ष उभा राहिल्यावर ते उघडे पडले. शिंदे सेनेला नरेंद्र मोदींच्या गोठ्यात राहून तिकडचा चारा खायचा आहे. पण त्याचवेळी मराठीच्या गव्हाणीत तोंड घालून इकडेही हक्क सांगायचा आहे. निकालांनंतर त्यांनी वृत्तपत्रांना पानभर जाहिराती दिल्या. त्यात बाळासाहेबांच्या जोडीने नरेंद्र मोदींचे आभार मानलेले होते. शिवाय कहर म्हणजे मोदी, शाह यांच्या जोडीने जेपी नड्डा यांचाही फोटो छापलेला होता. भाजपसोबत यांचे संबंध किती लाचारीचे आहेत, हे दर्शवणारी ही जाहिरात होती. गंमत म्हणजे, भाजपने लाथाडल्यामुळे राज्यातील पुणे, संभाजीनगर, नाशिक अशा अनेक शहरांमध्ये शिंदे सेनेला स्वतंत्र लढावे लागले. तिथे भरपूर मार तिने खाल्ला.
एकनाथ शिंदे हे कष्टाळू राजकारणी आहेत, हे खरे. पण त्यांच्याकडे स्वतःची काहीही विचारसरणी नाही. तशी गरजही त्यांना वाटत नाही. हीच गोष्ट भविष्यात त्यांना खड्ड्यात घालणार आहे. मुंबईमध्ये त्याचा प्रत्यय आला आहे. हिंदी सक्तीची करण्याच्या संदर्भात त्यांनी अतिशय संदिग्ध भूमिका घेतली. ते सध्या सत्तेच्या सोबत आहेत. त्यामुळे त्यांना भरपूर अधिकार व पैसे मिळतात. हे पैसे वाटून लोकांना उपकृत करायचे व मते मिळवायची, असा त्यांचा सर्वसाधारण फंडा आहे.
शिंदे दिवसातून दहा वेळा नरेंद्र मोदींचे नाव घेतात. नीतीशकुमार, चंद्राबाबू किंवा एनडीएतील अन्य कोणताही नेता असे करीत नसेल. इथे तर शिवसेनेसारख्या लढाऊ संघटनेच्या नावाने राजकारण करताना शिंदे यांचा हा लाळघोटेपणा अत्यंत हास्यास्पद वाटतो. आज सत्तेत आहेत म्हणून हे सर्व खपून जाते. पण इथून पुढच्या काळात भाजप त्यांचे पंख क्रमाक्रमाने कापणार आहे हे, त्यांच्या लक्षात आलेले नाही वा त्याकडे ते दुर्लक्ष करीत आहेत.
जीवदान आणि इशारा
मुंबई पालिकेतील सत्तेसाठीच मुख्यतः भाजपने आजवर शिंदे यांना सांभाळून घेतले. आता ती सत्ता कह्यात आली आहे. इथून पुढे फडणवीस ठाकरे सेना किंवा काँग्रेसच्या नगरसेवकांना फोडून शिंदेंचे महत्त्व शून्यावर आणून ठेवू शकतात. राज्याच्या सत्तेत अजितदादांना बरोबर घेऊन त्यांनी हेच तर केले होते. हे करतानाच त्यांनी अजितदादांनाही संपवले आहेच. आता शिंदे यांचा नंबर आहे. अशा स्थितीत शिंदे यांना टिकून राहायचे असेल, तर एखादी ठोस विचारसरणी घेतल्याखेरीज पर्याय नाही.
काँग्रेसच्या सबगोलंकारी राज्यात एम. जी. रामचंद्रन, जयललिता (अण्णा द्रमुक), चंद्राबाबू नायडू (तेलुगू देसम), नवीन पटनाईक (बिजू जनता दल) यांच्यासारखे कोणतीच तीव्र विचारसरणी नसलेले लोक बराच काळ सत्ता भोगत राहिले. पण आजच्या काळात ममता बॅनर्जी वा स्टालिन यांच्यासारखी कडवी प्रादेशिक अस्मिता धारण केल्याखेरीज किंवा कम्युनिस्ट वा समाजवादासारखी विचारसरणी उचलून धरल्याखेरीज भाजपकेंद्रित राजकारणात टिकून राहणे अशक्य आहे. शिंदे सेनेला राज्यभरात पालिका निवडणुकांमध्ये जे यश मिळाले ती बाळासाहेबांच्या शिवसेनेची जुनी पुण्याई आहे. पण ती फार काळ टिकत नाही, हे ठाकरे यांना दिसले आहे. अन्यथा, राज आणि उद्धव यांनाच मते मिळाली असती. भाजपच्या दांडग्या राजकारणापुढे शिंदे सेना जेव्हा दुय्यम भूमिकेत जाईल, तेव्हा तिला यश मिळवणे कठीण होत जाईल. अशा स्थितीत शिंदे यांना पुन्हा मराठी अस्मितेच्या कडव्या राजकारणाकडे वळावे लागेल किंवा भाजपमध्ये विलीन व्हावे लागेल.
ठाकरे बंधूना यंदाच्या मुंबई निवडणुकांनी एक जीवदान दिले आहे आणि शिंदे यांना सज्जड इशारा. या दोघांनाही आपल्या राजकारणाची नव्याने मांडणी करावी लागणार आहे. ठाकऱ्यांकडे विचारधारा आहे. त्यांना ती अधिक तासून धारदार करावी लागणार आहे. तर शिंदे यांना विचारधारा हवी हे स्वतःला पटवावे लागणार आहे. तसे केले नाही तर मात्र या दोघांचीही अवस्था मराठी अस्मितेच्या राजकारणातले ‘रामदास आठवले’ अशी व्हायला वेळ लागणार नाही. (Thackeray and Shinde will become like ‘Ramdas Athawale’)
(राजेंद्र साठे हे लेखक ज्येष्ठ पत्रकार, संपादक आहेत. ‘सरदार वल्लभभाई पटेल : एक सडेतोड व्यक्तिमत्त्व’ (मनोविकास) हे त्यांचे अलीकडचे प्रकाशित झालेले अनुवादित पुस्तक आहे.)
(समतावादी मुक्त संवाद पत्रिका मधून साभार)