मुंबई : प्रतिनिधी : राहुल गांधी पळणारे नाही लढणारे नेते आहेत, तर संसदेतील चर्चेत भाग न घेणारे नरेंद्र मोदी व अमित शाह हेच खरे पळपुटे नेते आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. टिळक भवन येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीचे एक महत्वपूर्ण बैठक झाली. बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. (Harshvardhan Sapkal criticizes Modi and Shah)
पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, राहुल गांधी हे पळणारे नेते नाहीत तर लढणारे नेते आहेत. विद्यार्थ्यांवर लाठीहल्ला केला त्यावर संसदेत चर्चा करण्याची मागणी विरोधी पक्ष सातत्याने करत आहेत. पण चर्चेत भाग घेण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह घाबरत आहेत. १२ वर्षात एकही पत्रकार परिषद न घेणारे पंतप्रधान व चर्चेपासून पळ काढणारे अमित शाह हेच खरे पळपुटे आहेत. राहुल गांधींना पळ काढणारे म्हणणाऱ्या खासदार अशोक चव्हाण यांनीच वस्तुस्थितीला सामारे जाण्याऐवजी काँग्रेस पक्षातून पळ काढला, असा टोला हर्षवर्धन सपकाळ यांनी लगावला. (Harshvardhan Sapkal criticizes Modi and Shah)
दिल्लीतील विद्यार्थी हल्ल्यावर भाजपने आंदोलन करायला हवे होते
.. झारखंड मधील विद्यार्थी आंदोलनासंदर्भात भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनी संसद परिसरात आंदोलन केले यावर विचारलेल्या प्रश्नावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, भाजपाचे हे आंदोलन हास्यापद आहे. दिल्लीत जंतरमंतरवर व देशभर पेपरफुटीच्या प्रश्नावर तरुणांनी मोठे आंदोलन केले असता त्यांच्यावर अमानुष पद्धतीने लाठीहल्ला केला, पॅलेट गन चालवल्या गेल्या, शेकडो विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल केले, मुलींना अत्यंत वाईट वागणूक दिली, त्यावेळीच भाजपाच्या खासदारांनी असे आंदोलन करायला हवे होते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी झारंखडच्या विद्यार्थी आंदोलनावर केलेला लाठीहल्ला चुकीचाच आहे, असे स्पष्ट केले आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
आरएसएसने कार्यालयावर कधीही तिरंगा झेंडा फडकावला नाही
भारतीय जनता पक्षाची पितृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपला राष्ट्रध्वज तिरंगा झेंड्याला अनेक वर्ष विरोध केला. ते तिरंग्याला अपशकूनी मानत होते, स्वातंत्र्य चळवळीत त्यांचा काहीही सहभाग नव्हता. तसेच स्वातंत्र्यानंतर ५०-५५ वर्ष आरएसएसने आपल्या कार्यालयावर तिरंगा झेंडा फडकवलाही नाही, आज त्यांना तिरंग्याचे प्रेम वाटत असेल तर हे स्वागतार्हच आहे, ‘देर आये दुरुस्त आये’, पण यामागे भाजपा व आरएसएसचा काही कावा नसावा, असा हल्लाबोल हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. (Harshvardhan Sapkal criticizes Modi and Shah)
भाजप सरकार सर्व पातळ्यावर अपयशी
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, भारतीय जनता पक्षाचे सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी ठरले असून सरकारमध्ये भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात बोकाळला आहे, महागाई वाढली आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, बेरोजगारीचा प्रश्न आहे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे पण सरकार त्याकडे लक्ष देत नाही. जनतेच्या प्रश्नांवरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी जातीपातीच्या व धर्माच्या नावावर द्वेष पसरवला जात आहे. ‘फोडा आणि राज्य करा’ या नितीप्रमाणे भाजपाचे काम सुरु आहे. परंतु भाजपा महायुती सरकारचा हा डाव काँग्रेस हाणून पाडेल व जनतेच्या प्रश्नावर सरकारला जाब विचारण्यासाठी आंदोलनात्मक भूमिका घेईल, असे सपकाळ यांनी सांगितले.
काँग्रेसच्या बैठकीत रणनितीवर चर्चा
काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीला विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस वर्किंग कमीटीचे सदस्य बाळासाहेब थोरात, नसीम खान, माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, यशोमती ठाकूर, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, प्रदेश सरचिटणीस अभिजीत सपकाळ उपस्थित होते. या बैठकीत संघटनात्मक आढावा घेण्यात आला तसेच राज्यातील राजकीय, सामाजिक व इतर महत्वाच्या प्रश्नांवर तसेच रणनितीवरही चर्चा करण्यात आली. (Harshvardhan Sapkal criticizes Modi and Shah)


