बेळगाव : प्रतिनिधी : सीमाभागात करण्यात येणारी कन्नड सक्ती रद्द करा. तसेच घटनेने दिलेले अधिकार मराठी भाषिकांना मिळाले पाहिजेत, या मागण्यांचे निवेदन सोमवारी (११ ऑगस्ट) महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. (Kannada compulsion)
निवेदन स्वीकारून घटनेनुसार योग्य ती कार्यवाही करण्याची घोषणा जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केली. यावेळी हजारो मराठी भाषिक उपस्थित होते.
गेल्या काही दिवसापासून कन्नड विकास प्राधिकरणाच्या आदेशानुसार सीमाभागात कन्नड सक्ती तीव्र करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीने भव्य मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्याचे निश्चित केले होते. पण पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारल्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांच्या नेतृत्वाखाली हजारो मराठी भाषिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र जमून आपली ताकद दाखवून दिली. (Kannada compulsion)
कन्नड सक्ती रद्द करून पूर्वीप्रमाणे सगळीकडे मराठी फलक बसावावेत, महापौरांच्या कारवरील फलकही मराठीत बसवावा, मराठीत परिपत्रके मिळावीत अशा मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. निवेदन देण्यासाठी जमलेल्या कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी करून जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला.