Home » Blog » मुक्तीचे जीवनगाणे…. ब्रिजेट बार्दो, डॉ. रुथ लॉरेन्स

मुक्तीचे जीवनगाणे…. ब्रिजेट बार्दो, डॉ. रुथ लॉरेन्स

जागतिक पटलावर आपापल्या क्षेत्रांत ठसा उमटवणाऱ्या या दोन कर्तृत्ववान स्त्रियांचा परिचय

by प्रतिनिधी
0 comments
The Life-Song of Liberation….. Brigitte Bardot, Dr. Ruth Lawrence

डॉ. रुथ लॉरेन्स आणि ब्रिजेट बादों. जागतिक पटलावर आपापल्या क्षेत्रांत ठसा उमटवणाऱ्या या दोन कर्तृत्ववान स्त्रिया. अलीकडेच काळाच्या पडद्याआड गेल्या. भिन्न स्वभाव प्रकृतीच्या असलेल्या या दोघींपैकी एकीने क्षमता आणि ताकदीच्या बळावर ग्लॅमरच्या जगात धुमाकूळ घातला, दुसरीने स्तनपानाचं महत्त्व पाश्चात्य जगाला समजावून सांगण्यासाठी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या बहुरंगी आयुष्याचा आलेख मांडणारा हा दुपेडी लेख…

  • सायली परांजपे

 स्तनपानाच्या खंद्या समर्थक प्रख्यात बालरोगतज्ज्ञ डॉ. रुथ लॉरेन्स यांनी वयाची शंभरी पार केली होती. २०२५ मधल्या ऑक्टोबर महिन्यात त्यांनी या जगाचा निरोप घेतला. सुरुवातीच्या काळात सेक्स सिम्बॉल म्हणून पण नंतरच्या आयुष्यात प्राणीहक्कांसाठी केलेल्या कामामुळे प्रसिद्धीस पावलेल्या जगप्रसिद्ध फ्रेंच मॉडेल अभिनेत्री ब्रिजेट बार्दो २८ डिसेंबरला वयाच्या ९१व्या वर्षी काळाच्या पडद्याआड गेल्या.

या दोघीही पाश्चिमात्य जगतातल्या असल्या तरी देश आणि खंडही वेगवेगळे. एक अमेरिकन, तर दुसरी फ्रेंच. त्यांची आयुष्यं वरकरणी दोन ध्रुवांवरची भासत असली तरी आपापल्या परीने मुक्त स्त्रीचे जीवनगाणे रचण्यातले त्यांच्यातले साम्य त्यांना जोडणारे ठरले. रुथ आणि ब्रिजेट या दोघींच्या वयात सुमारे नऊ वर्षांचं अंतर असलं आणि कार्याचं स्वरुप भिन्न असली, तरी दोघींची कारकीर्द सुरू होण्याचा कालखंड एकच होता. रुथ यांनी १९४९ मध्ये वैद्यकीय पदवी प्राप्त केली, तर ब्रिजेट यांनी याच वर्षी एल आणि ले जार्दी दे मोट्स या मासिकांसाठी ‘ज्युनियर मॉडेल’ म्हणून काम सुरू केलं.

स्तनपानाचं बाळकडू

रुथ यांचा जन्म १९२५ साली न्यूयॉर्कमध्ये झाला. त्यांची आई लॉरेटा अँडरसन यांनी बाळंत झाल्यानंतर रुथ यांना तर दूध पाजलंच, शिवाय हॉस्पिटलमधल्या पुरेसं दूध न येणाऱ्या मातांच्या बाळांनाही दूध पाजलं होतं. नवजात अर्भकासाठी स्तनपानाच्या महत्त्वाचं बाळकडू रुथ यांना तिथूनच मिळालं असावं. रुथ दहा वर्षांच्या असताना त्यांच्या वडलांचा कार अपघातात मृत्यू झाला. त्यांच्या बालपणाबद्दल फार काही वाचायला मिळत नसलं, तरी ते अगदी सुरळीत नसणार हे नक्की. या उलट ब्रिजेट बार्दो यांचं बालपण वैभवात गेलं. वडील इंजिनिअर होते, पॅरिसमध्ये त्यांचे अनेक कारखाने होते. घरातलं वातावरण कडक शिस्तीचं होतं. अगदी घरातही शिष्टाचारांचं काटेकोर पालन करण्याबाबत वडील आग्रही होते.

ब्रिजेट आणि त्यांच्या धाकट्या बहिणीचे मित्रमैत्रिणी कसे असावेत, याबद्दल आईदेखील चिकित्सक होती. त्यामुळेच ब्रिजेट यांना लहानपणी फारशा मित्रमैत्रिणी नव्हत्या. ब्रिजेट आणि त्यांच्या बहिणीने लहानपणी खेळताखेळता आईवडिलांची आवडती फुलदाणी फोडली म्हणून, वडलांनी दोघींना वीस-वीस फटके मारल्याच्या दुखऱ्या आठवणीचा सल ब्रिजेट यांच्या मनात दीर्घकाळ होता. एवढंच नाही, तर शिक्षा म्हणून आईवडलांनी दोघींना पुढचे काही दिवस अनोळखी व्यक्तीप्रमाणे वागवलं होतं, ‘वुज’ हे फ्रेंच भाषेत अपरिचितांसाठी वापरलं जाणारं आदरार्थी संबोधन त्यांनी आईवडलांना वापरावं असं फर्मावलं होतं. ब्रिजेट यांच्या पुढच्या आयुष्यातल्या बंडखोरीची बिजं बहुदा या काळातच पेरली गेली होती. (The Life-Song of Liberation….. Brigitte Bardot, Dr. Ruth Lawrence)

संशोधन आणि ‘स्व’च्या शोधातली भरारी

डॉ. रुथ लॉरेन्स यांचं अकॅडेमिक करिअर असामान्य होतं. येल युनिव्हर्सिटीने इंटर्नशिप दिलेल्या रुथ या पहिल्या स्त्री. नंतर तिथेच पेडिअॅट्रिक्समध्ये रेसिडेन्सी पूर्ण केल्यानंतर १९५२ मध्ये न्यूयॉर्कमधल्या युनिव्हर्सिटी ऑफ रॉचेस्टर मेडिकल सेंटरमध्ये अध्यापनासाठी निवड झालेल्या पहिल्या काही स्त्रियांपैकी त्या एक होत्या. रुथ यांनी त्यांची सात दशकांची दीर्घ कारकीर्द इथेच घडवली. विषचिकित्सा (टॉक्सिकोलॉजी) आणि स्तनपान वैद्यक (लॅक्टेशन मेडिसिन) या दोन विषयांत त्यांनी सखोल संशोधन केलं.

दुसरं महायुद्ध पेटलेलं असताना रुथ कॉलेजमध्ये शिकत होत्या, तर ब्रिजेट शाळेत. ब्रिजेट यांच्या फ्रान्सचा ताबा नाझी जर्मनीने घेतल्याच्या काळात घराबाहेर पडण्यावर निर्बंध असल्याने ब्रिजेट यांना घरात रेकॉर्ड्सवर नृत्य करण्याचा छंद लागला. बॅले नृत्यात कारकीर्द घडवण्याची क्षमता त्यांच्यात असल्याचा शोध त्यांच्या आईला याच काळात लागला. नंतर घराजवळच्या खासगी कॅथलिक शाळेत शिकत असतानाच ब्रिजेट स्थानिक स्टुडियोत नृत्याचे धडेही घेत होत्या. मासिकांसाठी मॉडेलिंग करण्याला मात्र आईवडलांचा ठाम विरोध होता. अर्थात ब्रिजेट यांनी तो जुमानला नाही. १९५०मध्ये एला मासिकाच्या मुखपृष्ठावर ब्रिजेट यांचा फोटो झळकल्यानंतर अभिनयाचे प्रस्तावही येऊ लागले आणि त्यांची अभिनय कारकीर्द सुरू झाली.

वैद्यकीय शिक्षणातले सहाध्यायी बॉब लॉरेन्स यांच्याशी रुथ यांनी १९५० मध्ये लग्नगाठ बांधली. हे नातं तब्बल ५५ वर्षांनी संपुष्टात आलं, ते बॉब यांच्या मृत्यूमुळे. ब्रिजेट यांनी १९५२ मध्ये वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी त्या काळात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करणाऱ्या रॉजर वादीम यांच्याशी लग्न केलं. हे लग्न फार काळ टिकलं नाही आणि त्यानंतरची ब्रिजेट यांची आणखी दोन लग्नंही अल्पायुषीच ठरली. याउपर आपली सतरा प्रेमप्रकरणं झाल्याचं त्यांनी स्वतःच एका मुलाखतीत नमूद केलं होतं. ब्रिजेट यांच्या मते, जगण्यात उत्कटता खूप महत्त्वाची होती. उत्कटता संपली म्हणजे त्यांना नात्यातून बाहेर पडण्याची इच्छा व्हायची. या इच्छेकडे त्यांनी दुर्लक्ष केलं नाही. अर्थात १९९२ साली केलेलं चौथं लग्न दीर्घकाळ टिकलं. त्यापूर्वी दुसरे पती जॅकस शैरिअर यांच्यापासून ब्रिजेट यांना निकोलस नावाचा एक मुलगा झाला होता. (The Life-Song of Liberation….. Brigitte Bardot, Dr. Ruth Lawrence)

चौकटी मोडणाऱ्या दोघी

येल युनिव्हर्सिटीत इंटर्नशिप आणि नंतर रेसिडेन्सी करत असताना रुथ यांना पेडिअॅट्रिक क्षेत्रातल्या अनेक तज्ज्ञांचं मार्गदर्शन लाभलं. या काळातच रुथ यांना ‘रूमिंग-इन’ अर्थात बाळ जन्मल्यानंतर नवमातेला आणि बाळाला एकाच खोलीत ठेवून स्तनपान देण्याच्या संकल्पनेविषयी अधिक जाणून घेण्याची संधी मिळाली. त्या काळात नवजात अर्भकांना फॉर्म्युला अर्थात दुधाला पर्याय असणारं मिश्रण पाजणं अत्यंत लोकप्रिय आणि रुढ झालेलं असूनही, न्यू हेवनमधल्या रुग्णालयांमध्ये ‘रूमिंग-इन’ पद्धत वापरली जात होती. रेसिडेन्सी करत असतानाच स्वतःच्या पहिल्या मुलाला स्तनपान करणाऱ्या रुथ यांनी स्वानुभवातून यातली आव्हानं समजून घेतली आणि पुढे रोचेस्टरमध्ये गेल्यानंतरही त्या लॅक्टेशन मेडिसिन या विषयावर संशोधन करत राहिल्या.

मातेचं दूध हे निसर्गाने नवजाताला दिलेलं संरक्षण आहे, त्यापासून त्याला वंचित ठेवलं जाऊ नये, या भूमिकेतून त्या कार्यरत राहिल्या. नवजात अर्भकाला आईसोबत ठेवणं किंवा फॉर्म्युलाऐवजी स्तनपानाला प्राधान्य देणं यात वेगळं काय आहे, असा प्रश्न भारतात विचारला जाऊ शकतो. मात्र, रुथ यांचं काम केवळ स्तनपानाच्या प्रसारापुरतं मर्यादित नव्हतं. मुळात आईने बाळाला दूध पाजण्यात डॉक्टरचा सहभाग आवश्यक आहे, ही संकल्पनाच त्या काळात अमेरिकेत नवीन होती. बाळाने स्तनपान करण्यात (किंवा न करण्यात) डॉक्टरांचा किंवा औषधांचा सहभाग शून्य होता. स्तनपान सहज होत असेल तर करायचं, पण ते होत नसेल तर फॉर्म्युलाचा पर्याय आहेच अशी एकंदर धारणा होती. अनेकदा स्तनपानासाठी घ्यावे लागणारे कष्ट टाळण्यासाठीही फॉर्म्युलाचा पर्याय स्वीकारला जात होता. या पार्श्वभूमीवर, स्तनपानात आव्हानं येत असतील तर त्यावर मात करण्यात डॉक्टर, औषधं मदत करू शकतात, या नवीन विचाराचा पाया रुथ यांच्या कामाने घातला गेला. (The Life-Song of Liberation….. Brigitte Bardot, Dr. Ruth Lawrence)

कारकीर्दीला बहर

नवजातासाठी स्तनपान किती महत्त्वाचं आहे, हे जगाला दाखवून देण्याचा प्रयत्न रूथ करत होत्या, त्याच काळात ब्रिजेट अभिनय क्षेत्रात पाय रोवत होत्या. मासिकांसाठी मॉडेलिंग आणि काही चित्रपटांत छोट्या भूमिका केल्यानंतर ब्रिजेट यांच्या वाट्याला प्रमुख भूमिका आली, ती १९५४ मध्ये. इटालियन, फ्रेंच भाषांतल्या चित्रपटांत अभिनय केल्यानंतर त्यांना इंग्रजी चित्रपटांतूनही भूमिका मिळाल्या होत्या, काही हॉलिवूडपटांतही त्या चमकल्या होत्या. १९५६ साली प्रदर्शित झालेल्या ‘अँड गॉड क्रिएटेड वुमन’ या चित्रपटाने ब्रिजेट यांना केवळ फ्रान्समध्येच नव्हे, तर जगभरात ओळख मिळवून दिली. या चित्रपटातल्या कामुक व्यक्तिरेखेमुळे ब्रिजेट यांच्या नावापुढे ‘सेक्स किटन’ ही काहीशी बदनामीकारक उपाधी चिकटली खरी, पण त्यांना ‘स्टारडम’ प्राप्त झाले तेही याच चित्रपटामुळे. पुढे १९५८ मध्ये त्या फ्रान्समधल्या सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्रीही ठरल्या.

ब्रिजेट यांनी पुढे काही विनोदी चित्रपटांतही भूमिका केल्या. त्यातला ‘बेबे गोज टू वॉर’ हा दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवरचा विनोदी चित्रपट खूपच गाजला. ‘द टुथ’ हा कोर्टरूम ड्रामाही यशस्वी ठरला. ब्रिजेट यांना याच चित्रपटासाठी डेव्हिड दी दोनातेलो पुरस्कारही प्राप्त झाला. फ्रेंच चित्रपटांपुरतं मर्यादित न राहता त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्येही भूमिका केल्या. अभिनयाच्या क्षेत्रात यशाची शिखरं पार करत असतानाच ब्रिजेट यांना संगीताचं क्षेत्रही खुणावत होतं. १९६० आणि १९७०च्या दशकात त्यांनी गायलेली अनेक गाणी तुफान लोकप्रिय ठरली. उत्कटता (पेंशन) हा ब्रिजेट यांच्या जगण्याचा पाया असल्यामुळे असेल कदाचित, पण अभिनयात उत्कटता वाटेनाशी झाली, तेव्हा निवृत्ती घेण्याचं त्यांनी ठरवलं. त्यानुसार १९७३ मध्ये त्यांनी अभिनयाला रामराम ठोकला. मात्र त्यांच्या स्वभावातली बंडखोरी लोपली नाही. अभिनय सोडल्याच्या पुढल्याच वर्षी त्यांनी प्लेबॉय मासिकासाठी ‘न्यूड फोटोशूट’ करून चाळिसावा वाढदिवस साजरा केला. (The Life-Song of Liberation….. Brigitte Bardot, Dr. Ruth Lawrence)

ध्येयनिष्ठ वाटचाल

ब्रिजेट मॉडेलिंग, अभिनय, गायन आदी विविध कलांच्या क्षेत्रात स्वतःला आजमावत असतानाच्या काळात रुथ यांनी स्तनपानावरच्या संशोधनावर लक्ष केंद्रित केलं होतं. अनेक वर्षांचं संशोधन, अभ्यास, अध्ययन आणि आई म्हणून घेतलेले प्रत्यक्ष अनुभव यांचा परिपाक म्हणून १९७९ साली ‘ब्रेस्टफीडिंग: अ गाइड फॉर द मेडिकल प्रोफेशन’ हे त्यांचं पुस्तक प्रकाशित झालं. हे पुस्तक आजही डॉक्टरांसाठी स्तनपान या विषयावरच्या संदर्भग्रंथाची मोलाची भूमिका बजावत आहे. या पुस्तकाची नववी आवृत्ती सध्या बाजारात आहे, अनेक भाषांमध्ये या पुस्तकाचं भाषांतर झालं आहे. स्तनपान या विषयावर रुथ यांनी दोनशेंहून अधिक शोधनिबंध लिहिले आहे. १९८५ मध्ये त्यांनी रोचेस्टर युनिव्हर्सिटीत ब्रेस्टफीडिंग अँड ह्युमन लॅक्टेशन स्टडी सेंटर स्थापन केलं आणि त्याच्या संचालक म्हणून त्या काम करू लागल्या.

रॉचेस्टरमधले पहिले काही नवजात अर्भक आणि बाल अतिदक्षता विभाग सुरू करण्यात रूथ यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. सार्वजनिक आरोग्य यंत्रणेतही त्या सातत्याने सल्लागार म्हणून काम करत होत्या. नवजात अर्भकांच्या पोषणाबाबत राष्ट्रीय स्तरावर तयार होणाऱ्या धोरणांमध्ये त्यांचा सल्ला घेतला जात होता. अकॅडेमी ऑफ ब्रेस्टफीडिंग मेडिसिनच्या स्थापनेसाठी रुथ यांनी १९९६-९७मध्ये पुढाकार घेतला, नंतर २००५ मध्ये यासंदर्भातलं मासिक काढण्यातही त्यांनी हातभार लावला. २०१४ साली सुरू करण्यात आलेल्या लॅक्टेशन मेडिसिन क्षेत्रातल्या फेलोशिप कार्यक्रमासाठी त्यांनी सहाय्य केलं होतं. त्या २०२० साली एमेरिटा प्रोफेसर ऑफ पेडिअॅट्रिक्स या पदावरून निवृत्त झाल्या होत्या. मात्र पायाला भिंगरी लागल्यागत व्याख्यानं देण्यासाठी ठिकठिकाणी जात राहिल्या.

प्राणिहक्क संरक्षणाचं क्षेत्र

अभिनय, मॉडेलिंग, गायन यांसारखी वलयांकित क्षेत्रं गाजवल्यानंतर ब्रिजेट यांनी एका वेगळ्याच क्षेत्रात प्रवेश केला. ते क्षेत्र होतं प्राणीहक्क संरक्षणाचं. ग्लॅमरस क्षेत्रांत कमावलेलं नाव ब्रिजेट यांनी प्राणीहक्कांबाबत जागरूकता वाढवण्याच्या कामासाठी उपयोगात आणलं. सी शेफर्ड कंझर्वेशन सोसायटी स्थापन करणारे कॅनेडिअन अमेरिकी पर्यावरणवादी पॉल वॉटसन यांच्या संपर्कात ब्रिजेट आल्या. कॅनडातल्या सील शिकारीविरोधात वॉटसन यांनी सुरू केलेल्या चळवळीत ब्रिजेट सहभागी झाल्या. पुढे १९८६ मध्ये त्यांनी स्वतः प्राण्यांच्या कल्याणासाठी तसंच संरक्षणासाठी ब्रिजेट बार्दो फाउंडेशनची स्थापना केली. त्या स्वतः पूर्णपणे शाकाहारी झाल्या. या फाउंडेशनचा खर्च चालवण्यासाठी त्यांनी दागिने आणि स्वतःच्या वस्तूंचा लिलाव करून तीस लाख फ्रैंक एवढी रक्कम उभी केली.

घोड्याचे मांस कुणीही खाऊ नये असं आवाहन टीव्हीवरून केल्यामुळे ब्रिजेट यांना ठार मारण्याच्या धमक्याही आल्या, पण त्या मागे हटल्या नाहीत. फ्रान्ससोबतच चीन, डेन्मार्क आदी देशांतील प्राणीहत्यांचा निषेध त्यांनी त्या त्या देशांतल्या राष्ट्रप्रमुखांना पत्रं लिहून केला. रोमानियात भटक्या कुत्र्यांची हत्या होऊ नये म्हणून, त्यांनी मोठ्या देणग्या दिल्या. भारतातल्या बोधगया इथल्या प्राण्यांच्या कल्याणाची जबाबदारी ब्रिजेट यांनी अनेक वर्षं घेतली होती. ऑस्ट्रेलियातले राजकीय नेते ग्रेग हण्ट यांच्या २० लाख मांजरी मारून टाकण्याच्या योजनेचा निषेध ब्रिजेट यांनी २०१५ मध्ये पत्राद्वारे केला होता. या शिरकाणामुळे मांजरींच्या काही प्रजाती नामशेष होण्याचा धोका होता.

रुथ यांनी स्वतःच्या नऊ मुलांना स्तनपान तर केलंच, शिवाय त्यांच्या सगळ्या जबाबदाऱ्या निभावल्या. मुलांचे केस विंचरून देण्यापासून शाळेतल्या पालकसभांना उपस्थित राहण्यापर्यंत सगळं काही केलं. दुसऱ्या बाजूला ब्रिजेट यांनी मात्र आपल्या एकुलत्या मुलाला अंगावर पाजायला नकार दिला. हा मुलगा म्हणजे अवघड जागचं दुखणं आहे, यापेक्षा कुत्र्याला जन्म दिला असता, तर बरं झालं असतं असं त्या म्हणायच्या. परिणामी मुलगा कायमचा दुरावला. रुथ यांच्या तुलनेतली वर्तन ही विसंगती, लक्ष वेधून घेणारी असली तरीही, दीर्घायुष्यं आणि आयुष्याच्या अखेरपर्यंत कार्यरत राहणं हा या दोघींच्या आयुष्यातला समान धागा म्हणता येईल. (The Life-Song of Liberation….. Brigitte Bardot, Dr. Ruth Lawrence)

संगती-विसंगती

रुथ यांनी नऊ मुलं सांभाळून स्तनपान वैद्यकाच्या क्षेत्रात खोलवर जाऊन अभ्यास केला, तरी त्यांच्या घरातलं वातावरण पुराणमतवादी वळणाचं होतं. ‘जोवर घरं नीटनेटकी आहेत, मुलांच्या अंगावर चांगले कपडे आहेत अन् ती शाळेत जात आहेत आणि टेबलावर जेवण वाढलेलं आहे, तोवर तुला जे हवं ते कर’ असं सशर्त स्वातंत्र्य बॉब यांनी रुथ यांना दिलं होतं. त्याबद्दल त्यांची काही तक्रार नव्हती.

रुथ यांनी स्तनपानाकडे कायम बाळाच्या पोषणासाठी आवश्यक नैसर्गिक घटक म्हणून बघितलं. या नवजात बाळाला दूध पाजणं, हे आईचं कर्तव्यच आहे किंवा आधुनिक स्त्रिया स्तनपानाच्या त्रासातून सुटका मिळवण्यासाठी फॉर्म्युला फीडिंगचा पर्याय स्वीकारत आहेत, असे अतिरेकी विचार त्यांनी कधीच मांडले नाहीत. तरीही स्त्रियांना मिळणाऱ्या दुय्यम वर्तणुकीबाबत त्यांची काही तक्रार नसावी. व्हेटिकनचे पोप जॉन पॉल यांचं भाषण ऐकायला रुथ गेल्या असताना, भाषणानंतर पोप यांनी रुथ यांचे पती बॉब (ते भूलतज्ज्ञ होते) यांचे स्तनपानासंदर्भात केलेल्या कामाबद्दल आभार मानले आणि नंतर रुथ यांच्याशी केवळ हस्तांदोलन केलं. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरची रेषही हलली नाही अशी आठवण त्यांची मुलगी सांगते.

बंडखोर व्यक्तिमत्त्व

मुलीच्या मते, श्रेय कुणाला मिळतं हे तिच्यासाठी महत्त्वाचं नव्हतंच, स्तनपानाचं महत्त्व जागतिक स्तरावर पोहोचल्याचाच आनंद तिला जास्त होता. स्त्रीवादावरच्या वादात त्या कधीच पडल्या नाहीत, पण एक स्त्री काय करू शकते, हे त्यांनी दाखवून दिल्याचं त्यांच्या मुलाने एका मुलाखतीत आवर्जून नमूद केलं आहे. ब्रिजेट त्यांच्या सुरुवातीच्या काळात लैंगिक स्वातंत्र्याचं प्रतीक समजल्या जात होत्या. बंडखोरी त्यांच्या व्यक्तिमत्वात होती आणि व्यक्तिरेखांमध्येही होतीच. दोन्ही खांदे उघडे ठेवणाऱ्या नेकलाइनला आजही बोर्दो नेकलाइन म्हणून ओळखलं जातं. बिकिनी लोकप्रिय करणारी अभिनेत्री अशीही त्यांची ओळख सुरुवातीच्या काळात होती. तरीही विचारसरणीच्या बाबतीत त्यांनी पुराणमतवादी, उजव्या नेत्यांनाच समर्थन दिलं होतं. आंतरवांशिक विवाह होऊ नयेत, असं मत त्यांनी व्यक्त केलं होतं. स्थलांतर, स्त्रियांचा राजकारणातला सहभाग, इस्लाम या सगळ्या विषयांवरची त्यांची मतं प्रतिगामी म्हणावीत अशीच होती. तरीही पर्यावरण, प्राणीहक्क या विषयांप्रती त्यांची बांधिलकीही ठाम होती.

एकूणच डॉ. रुथ लॉरेन्स आणि ब्रिजेट बार्दो या दोन स्त्रियांनी नव्वद वर्षांहून अधिक कालखंड बघितला. त्यांच्या जगण्यात विसंगती विरोधाभास असतीलही पण त्या दोघीही रुढ धारणांना छेद देणाऱ्या, चौकटी मोडणाऱ्या आणि आपापल्या क्षेत्रांवर न पुसला जाणारा ठसा उमटवणाऱ्या स्त्रिया होत्या, हा सारांश त्यांच्या आयुष्यांमधून नक्कीच निघतो. त्या दोघींचं वेगळेपण आणि मोठेपण या सारांशातच सामावलेलं आहे, असंही सहजपणे म्हणता येतं.

( समतावादी मुक्त संवाद पत्रिकेवरून साभार. प्रस्तुत लेख दी इकॉनॉमिस्ट (२९ डिसेंबर २०२५) आणि दी लॅन्सेट (१० जानेवारी २०२६) या नियतकालिकांत प्रकाशित स्मरणलेखांवर आधारित आहे. लेखिका, अनुवादिका असलेल्या सायली परांजपे यांची ‘राया’ (अनुवादित), ‘शहीद भगतसिंग’, ‘क्रांतिज्योती सावित्राबाई फुले’, ‘सम्म्राट अशोक’, ही लघुचरित्रपर पुस्तके प्रकाशित आहेत.)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00