Home » Blog » Maratha protests victory: जरांगे म्हणाले, जिंकलो रे… राजा हो !’’

Maratha protests victory: जरांगे म्हणाले, जिंकलो रे… राजा हो !’’

by प्रतिनिधी
0 comments
Maratha protests victory

मुंबई : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे यांची मंत्रिमंडळ उपसमितीचे प्रमुख राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह काही मंत्र्यांनी उपोषणस्थळी भेट घेतली. (Maratha protests victory)

तत्पूर्वी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली आणि या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीला सरकारकडून मान्यता देण्यात आली. हाच निर्णय जरांगे यांच्या कानावर घालण्यात आला. त्यावेळी जरांगे यांनी सर्व आंदोलकांना उद्देशून, “जिंकलो रे…राजाहो! तुमच्या सर्वांच्या ताकदीवर जिंकलो,” असे उदगार काढले. उपोषण आणि आंदोलन मागे घेण्याची तयारी दर्शवली. जरांगे यांनी यावेळी सरबत घेऊन उपोषणही सोडले.

सरकारने या निर्णयाचा अध्यादेश घेऊन यावे, रात्रीपर्यंत मुंबई मोकळी करतो, असे आश्वासन त्यांनी उपस्थित मंत्र्यांना दिले. विखे पाटील यांच्यासह क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, उद्योगमंत्री उदय सामंत यावेळी उपस्थित होते. (Maratha protests victory)

विखे यांनी यावेळी जरांगे यांना त्यांच्या मागण्या मान्य करत असल्याचे सांगितले.

राज्य सरकारने घेतलेले निर्णय मनोज जरांगे यांनी सर्व आंदोलकांसमोर वाचून दाखवले.

जरांगे आंदोलकांसमोर काय म्हणाले?

हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीस राज्य सरकारने मान्यता दिल्याचे जरांगे यांनी जाहीर केलं. जरांगे आणि त्यांच्या समर्थकांची हीच प्रमुख मागणी होती. (Maratha protests victory)

जरांगे म्हणाले, ‘‘सरकारने हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीसंबंधीची अधिसूचना काढली की उपोषण मागे घेईन आणि सर्व आंदोलकांना गावी परत घेऊन जाऊ. सरकारने अधिसूचना काढताच रात्री ९ वाजेपर्यंत आम्ही मुंबई रिकामी करू.’’

जरांगेंनी मानले सरकारचे आभार

मनोज जरांगे म्हणाले, “मी तुम्हा सर्व मंत्र्यांचं मराठा समाजाच्या वतीने कौतुक करतो, आभार मानतो. आजवर कोणालाही या लढ्यात जितकं यश मिळालं नाही तितकं यश गरिबाच्या पोरांना मिळालं आहे. सरकारने अधिसूचना काढल्यानंतर आमचा आनंद गगनात मावणार नाही. अंमलबजावणीचा आदेश व संबंधित अधिसूचना काढल्यानंतर आम्ही नाचत नाचत मुंबईतून बाहेर पडू, गुलाल उधळू. तुम्हालाही गुलाल लावू. तुम्ही अधिसूचना घेऊन या, आम्ही तुमच्या स्वागतासाठी सज्ज आहोत.” मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील मुंबईत उपोषणाला बसले आहेत. मुंबईतील आझाद मैदानावरील त्यांच्या उपोषणाचा मंगळवारी (२ सप्टेंबर) पाचवा दिवस आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले लाखो मराठा आंदोलक आंदोलनात सहभागी झाले आहेत.

हैदराबाद गॅझेट नेमके काय आहे?

विदर्भातील मराठ्यांची कुणबी म्हणून नोंद करण्यात आली. त्यामुळे तिथल्या मराठ्यांना कुणबी म्हणून फायदे मिळत आहेत. तोच न्याय इतर मराठ्यांनाही मिळावा, अशी मागणी आहे.

निजामाच्या अमलाखाली सतरा जिल्हे होते. त्यात प्रामुख्याने सध्याच्या मराठवाड्याचा समावेश होता. त्यावेळी १८६२ साली ब्रिटीश अधिकारी रिचर्ड मिड यांनी जनगणना केली होती. त्याची सुरूवात १८५०च्या दरम्यान करण्यात आली होती. जनगणनेचे रेकॉर्ड १८८१ साली प्रकाशित करण्यात आले. त्याचे जे गॅझेट तयार झाले त्यालाच हैदराबाद गॅझेट म्हटले जाते. या जनगणनेमध्ये जातीव्यतिरिक्त विवाहीत, अविवाहित, विधुर याचाही उल्लेख होता.

निजामाच्या राज्यात त्यावेळी सतरा जिल्हे होते. त्याची लोकसंख्या सुमारे ९८ लाख ४५ हजार होती. त्यामध्ये कुणब्यांची संख्या सुमारे सोळा लाख होती. सुमारे चार लाखांचा उल्लेख मराठा म्हणून होता. या गॅझेटमध्ये मराठा आणि कुणबी यांचा उल्लेख मराठा कुणबी असा उल्लेख आहे. शेती करणारे म्हणजे कुणबी मराठा असाही स्पष्ट उल्लेख या गॅझेटमध्ये आहे.

ज्यावेळी हे जिल्हे महाराष्ट्रात आले त्यावेळी हे रेकॉर्ड तिथल्या स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले. त्यामुळे ते रेकॉर्ड आपल्याकडे उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त आणखी काही रेकॉर्ड हैदराबादला असू शकते. त्याचाही अभ्यास यासंदर्भातील समितीने केला असल्याचे सांगण्यात येते.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00