नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतात राहत असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना तत्काळ बाहेर काढण्याचे आदेश सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दिले आहेत. या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या शोधमोहिमेदरम्यान खुद्द गुजरातेतच हजारावर बांगलादेशी सापडले आहेत. तेही बेकायदा राहत असल्याचे उघड झाले आहेत. (Bangladeshi immigrants)
गुजरात पोलिसांनी शनिवारी पहाटे ३ वाजता सुरू केलेल्या कारवाईत अहमदाबाद आणि सुरत या दोन प्रमुख शहरांमध्ये बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या १,०२४ बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले. अहमदाबादमध्ये ८९० तर सुरतमध्ये १३४ लोकांना ताब्यात घेण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले. आतापर्यंत केलेली ही सर्वांत मोठी कारवाई असल्याचेही गुजरात पोलिसांनी म्हटले आहे.
अहमदाबाद आणि सुरतमध्ये कोम्बिंग ऑपरेशन्स राबवण्यात आले. केवळ या दोन शहरात अवैधरित्या राहणाऱ्या बांगला देशींचा हा आकडा आहे. त्यामध्ये महिला आणि मुलांचा समावेश आहे. या स्थलांतरितांना ताब्यात घेण्यात आले आणि त्यांच्या हद्दपारीचे प्रयत्न सुरू आहेत, असे गृह राज्यमंत्री हर्ष संघवी यांनी शनिवारी सांगितले. (Bangladeshi immigrants)
संघवी यांनी गुजरातमध्ये राहणाऱ्या बेकायदेशीर स्थलांतरितांना स्वतःहून पोलिसांसमोर शरण येण्याचा इशारा दिला, अन्यथा त्यांना अटक करून हद्दपार केले जाईल. तसेच त्यांनी बेकायदेशीर स्थलांतरितांना आश्रय देणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही दिला.
“बेकायदेशीररित्या राहणाऱ्या बांगलादेशींना पकडण्यात मोठे यश मिळाले आहे. अहमदाबाद पोलिसांनी ८९० आणि सुरत पोलिसांनी १३४ बेकायदेशीर स्थलांतरितांना पकडले. राज्यात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या लोकांविरुद्ध गुजरात पोलिसांची ही सर्वांत मोठी कारवाई आहे,” असे संघवी यांनी सुरत सांगितले. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांना माहिती दिली. (Bangladeshi immigrants)
अटक केलेले नागरिक पश्चिम बंगालमधून मिळवलेल्या बनावट कागदपत्रांचा वापर करून भारतातील वेगवेगळ्या भागात राहण्याचा प्रयत्न करत होते. त्यानंतर ते गुजरातेत आले.
गुजरातमधील बेकायदेशीर स्थलांतरितांवर कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात आले आहेत आणि सुरक्षा मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार पाकिस्तानी नागरिकांना गुजरात सोडण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.
हर्ष संघवी, गृह राज्यमंत्री
संघवी म्हणाले, “यापैकी बरेच लोक ड्रग्ज कार्टेल, मानवी तस्करीमध्ये सामील आहेत आणि अलीकडेच अटक केलेल्या चार बांगलादेशींपैकी दोघे अल कायदाच्या स्लीपर सेलमध्ये काम करत होते. या बांगलादेशींच्या पार्श्वभूमीची आणि गुजरातमधील त्यांच्या कारवायांची चौकशी केली जाईल.”
त्यांनी सांगितले की, “त्यांच्या हद्दपारीसाठी शक्य तितक्या लवकर सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी” व्यवस्था करण्यात आली आहे.
“देशाच्या आणि गुजरातच्या वेगवेगळ्या भागात पोहोचण्यासाठी त्यांनी वापरलेल्या बनावट कागदपत्रांचीही आम्ही चौकशी करू आणि बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल,” असे त्यांनी पुढे सांगितले.
इतर देशांचे नागरिक बेकायदेशीरपणे राहू नयेत याची खात्री करणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे, असे सांगून त्यांनी अहमदाबाद शहर आणि सुरत पोलिसांचे यशस्वीरित्या मोहीम पार पाडल्याबद्दल अभिनंदन केले. अहमदाबादमध्ये माध्यमांशी बोलताना पोलिस महासंचालक विकास सहाय म्हणाले की, ताब्यात घेतलेल्यांची चौकशी केली जात आहे. कागदपत्रे आणि इतर पुराव्यांवरून त्यांच्या राष्ट्रीयत्वाची पडताळणी करण्यात येत आहे.
हेही वाचा :
मोसादचा ‘तो’ अहवाल अन् रशियन प्रोपगंडा!
दहशतवादाविरुद्ध एकजूट असणे महत्त्वाचे