मुंबई : प्रतिनिधी : शिवसेना उद्धव ठाकरे गटाने दुबई येथे होणाऱ्या अशिया कप क्रिक्रेट स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान सामन्याला विरोध केला आहे. या सामन्यावर टीका करताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपचा चांगलाच समाचार घेतला आहे. राष्ट्रभक्त हा सामना पाहणार नाहीत असे म्हणत राऊत यांनी भारत पाकिस्तान सामन्याला बसलेले भारतीय चेहरे दिसले, तर लोक त्यांना इथे आल्यावर जोडे मारतील अशी टीका केली आहे. (Raut’s criticism of the Indo-Pak match)
खासदार राऊत म्हणाले, “माझ्या माहितीप्रमाणे लोक भारतातदेखील हा सामना पाहणार नाहीत. जे प्रखर राष्ट्रभक्त आहेत, ज्यांनी पहलगाम हल्ला पाहिला आहे, देश त्या धक्क्यातून अजूनही सावरलेला नाही. असे लाखो क्रिकेटप्रेमी असले, तरी ते हा सामना पाहणार नाहीत. भाजपचे लोक पाहतील, राष्ट्रभक्त तो सामना पाहणार नाहीत. त्या सामन्याला बसलेले भारतीय चेहरे लोकांना दिसले, तर लोक त्यांना इथे आल्यावर जोडे मारतील. जय शाह त्या सामन्याला जाऊन बसतात का? ते पाहू,” असे म्हणत त्यांनी टोला लगावला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मणिपूरमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर तब्बल दोन वर्षांनी म्हणजेच आज १३ सप्टेंबरला दौरा करत आहेत. यावरून, खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे. “जेव्हा गरज होती तेव्हा हे पंतप्रधान मोदी कुठे होते?” असा सवाल यावेळी त्यांनी केला आहे. तसेच, भारत विरुद्ध पाकिस्तानच्या सामन्यावरून भाजप सरकारचा विरोध केला आहे. तसेच, रविवारी (१३ सप्टेंबर) महाराष्ट्रासह देशात शिवसेना माझं कुंकू, माझा देश हे आंदोलन राबविणार आहेत. यावेळी भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करणार आहेत. (Raut’s criticism of the Indo-Pak match)
मोदींच्या दौऱ्याबाबत खासदार संजय राऊत म्हणाले की, “काही गोष्टींवर लक्ष जाऊ नये, म्हणून असे कार्यक्रम त्यांच्याकडून आखले जातात. भारत विरुद्ध पाकिस्तान सामना दुबईत खेळवला जाणार असून देशातून त्याला विरोध होत आहे. पण, अशा मुद्द्यांवरून लक्ष विचलित करायचे म्हणून त्यांची जी इव्हेंट मॅनेजमेंट टीम आहे ते असे कार्यक्रम करते. आम्ही या दौऱ्याकडे गांभीर्याने पाहत नाही.” असे म्हणत त्यांनी टीका केली. “महिलांची नग्न धिंड काढली जात होती, तरुणांना रस्त्यावर आणून मारले जात होते, तेव्हा हे देशाचे पंतप्रधान कुठे होते? तेव्हा त्यांनी तोंड उघडले नाही,” असा सवाल करत टीका केली आहे. “हे सर्व बकवास आणि ढोंग आहे,” (Raut’s criticism of the Indo-Pak match)