Rajarshi Shahu: माणसं घडवणारा राजा

Rajarshi Shahu

राजर्षी शाहू महाराजांनी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केले आहे. शिक्षण, सहकार, कला-क्रीडा या क्षेत्रासह संस्थानचा राज्यकारभार करत असताना घेतलेल्या अनेक निर्णयातून त्यांच्या मनुष्यबळ विकास व्यवस्थापनाची प्रचिती निश्चितच आपल्याला येते. (Rajarshi Shahu)

-विक्रम रेपे

राजर्षी शाहू महाराजांच्या सान्निध्यात भास्करराव जाधव, गंगाराम कांबळे, दाजीराव विचारे, पिराजीराव घाटगे यांच्यासारखी असंख्य व्यक्तिमत्वे तसेच शाहूपुत्र राजाराम, प्रिन्स शिवाजी, राधाबाई उर्फ आक्कासाहेब महाराज अशी छत्रपती घराण्याचा वारसा पुढे टिकवणारी व्यक्तिमत्वेही घडली यातच त्यांचे यश आहे.

आपल्या संस्थानातील अधिकारी आणि कर्मचारी यांना शिस्त लागावी यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी अनेक आदेश दिलेले आहेत. आजच्या भाषेत त्याला आपण परफेक्ट एच. आर .मॅनेजमेंट म्हणू शकतो. मनुष्यबळ विकास व्यवस्थापनाचे यातीलच काही निवडक धडे देणारे राजर्षी शाहू महाराजांचे आदेश एच.आर. शाखेचा विद्यार्थी म्हणून मला भावले. या आदेशातून ‘माणसं घडवणारा राजा’ अशी महाराजांची ओळख आपसूक नजरेसमोर येते.

संस्थानातील कार्यालयात दैनंदिन कामकाज सुरळीत व शिस्तबध्द होण्यासाठी काही विशेष आदेश राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी काढले होते. (Rajarshi Shahu)

वेतन सुधारणा अहवाल व अंदाजपत्रक रोजीचा भत्ता

११/११/१९१४ सालच्या आदेशानुसार सरकारी नोकरांच्या वेतन सुधारणेसाठी अहवाल व अंदाजपत्रक तयार करण्यासाठी गणेश श्रीखंडे, कृष्णाजी मराठे यांची नेमणूक करण्यात आली होती. या उभयतांनी स्वतः तालुकानिहाय फिरवून माहिती मिळवावी. दर आठवड्यात सदर काम किती झाले याची माहिती घेऊन जरूर ते हुकूम घ्यावेत सर्व माहिती पुढील बजेटची वेळी विचारासाठी आली पाहिजे यासाठी दोन महिन्याचे आत काम संपवले पाहिजे, असा आदेश देण्यात आला होता. तालुकानिहाय माहितीसाठी फिरत असताना तेथील रस्त्यांची सद्यस्थिती आणि दुरुस्तीसाठी लागणारा खर्च याचं सुद्धा अंदाजपत्र तयार करून घ्यावे अशी सूचना राजर्षी शाहू महाराजांनी दिली होती. (Rajarshi Shahu)

महत्त्वाचे म्हणजे सन १८६८आणि सन १८८९ या सालानंतर प्रथमच राजर्षी शाहू महाराजांच्या आदेशानुसार वेतन सुधारण्यासाठी अहवाल व अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते.

बढती, पगार वाढ, इनाम, पोटगी

करवीर संस्थानातील अधिकारी व कर्मचारी यांच्या कामाचे मूल्यमापन करून (Performance Appraisal )त्यांचा सन्मान करण्याचे धोरण राजर्षी शाहू महाराजांनी अवलंबलेले होते. (Rajarshi Shahu)

बढती

गुरुनाथ रामचंद्र गोकाककर यांनी रायबाग महालाचे काम समाधानकारक केल्यामुळे जागी मामलेदार नेमण्यात आले होते. रायबाग महालाचे काम सुरू असताना तेथील इनामदार देसाई देशपांडे वगैरे लोकांची भेट न धरता सरळपणाने महालाचे काम केले व चिंचली प्रदर्शनाच्या सरकार जनावराची हुजूर स्वारीची उत्तम रीतीने व्यवस्था ठेवली. यामुळे स्पेशल बढती देण्यात आली असा आदेश दिनांक ६/१०/१९१० रोजी देण्यात आला होता. (Rajarshi Shahu)

कारकुनांच्या वरचेवर बदल्या न करता तेथेच बढती देऊन कायम करावे म्हणजे जबाबदारी चांगले पडते अशा सरसुभे यांचा अभिप्राय होता. त्याप्रमाणे हुजूर रेकॉर्डपूर्ती तजवीज करावी असा आदेश दिनांक ७/०६/१९०४ रोजी देण्यात आला होता.

पगारवाढ

दिवाण ऑफिसातील चिटणीसी दप्तरकडील जबाबी कारकून केशव भालचंद्र देसाई यांची नोकरी बरीच वर्षे झाली आहे. हे कामात चांगली माहितीगार व हुशार आहेत. यांना विशेष बढती दरमहा पाच रुपये देऊन यांचा पगार ४० रुपये करावा म्हणजे नोकरीचे चीज होऊन यांना उत्तेजन दिल्यासारखे होणार आहे अशी शिफारस रा. ब. दिवाण साहेब यांनी केली होती. दिनांक ४/६/१९१७ साली ही शिफारस राजर्षी शाहू महाराजांनी मंजूर केली होती. (Rajarshi Shahu)

इनाम

दाजीराव अमृतराव विचारे ए. इंजिनीयर स्टेट कोल्हापूर यांनी सरकारी नोकरी इनामे इतबारे केली आहे. श्री महाराणी लक्ष्मीबाई तलावाची कल्पना काढल्यामुळे आम्ही कृपाळू त्यास शाहूपुरी येथील दिलेली जमीन वजा जाता आणखी एक जमीन इनाम वंशपरंपरा करून दिली आहे ती त्यांच्या ताब्यात देण्यात यावी, याची चिटणीस दप्तरातून सनद देण्यात यावी. असा सहीसह आदेश शाहू छत्रपती यांनी दिनांक १०/०५/१९११ रोजी दिलेला होता.

मयत कर्मचाऱ्यांच्या पत्नीस पोटगी

सीताबाई रामचंद्र गुप्ते यांनी आपल्या नवऱ्याने महाराजांची सेवा केली आहे त्याबद्दल पोटगी मिळावी म्हणून अर्ज केला होता. त्यांना त्यांच्या हयातीपर्यंत दरमहा वीस रुपये पोटगी देण्याचे मंजूर करून त्या रकमेचे स्पेशल सँक्शन देण्यात आले होते. पुढील सालाच्या बजेटमध्ये रक्कम दाखल करण्यात यावी असा आदेश शाहू महाराजांनी १६/०६/१९१६ रोजी दिलेला आहे.

वृद्ध व अशक्त नोकराच्या मुलास नोकरी

धोंडी वल्लभ हसन किल्लेदार मुल्की शिपाई गारगोटी यांनी आपल्या मुलाला वृद्ध व अशक्त झाल्यामुळे आपली जागा द्यावी असा अर्ज दिला होता. सरसुभे यांनी त्याची मुलास रोशन नाईकाची जागा देऊ केल्यास त्यांनी ती नाकारली होती. त्यांच्या मुलास शिपायाची नोकरी मिळणे रास्त आहे सबब तशी देण्याचे मंजूर केली आहे असा निकाल हुकूम शाहू महाराजांनी दिनांक १३/११/१९०२ रोजी दिला होता. या पद्धतीला सध्या सरकारी नोकरीतील अनुकंपा असे संबोधले जाते.

पदभरती ( रिक्रूटिंग)

महायुद्धाच्या काळात करवीर संस्थानात लष्कर भरती घेण्यात आली होती. त्यावेळी रिक्रूटिंग कमिटी स्थापन करून सभासद नेमले होते. त्यांच्यावर पदभरतीसह इतर जबाबदाऱ्या देण्यात आल्या होत्या. अशीच पदभरती संस्थानात वेळोवेळी होत असे. (Rajarshi Shahu)

कार्यालयीन कामकाज आदेश

कागदाचे भाव वाढल्यामुळे कागदाचा काटकसरीने वापर करावा

युरोपातील महायुद्धामुळे कागद महाग झाला होता. सर्व ऑफिसमध्ये कागद काटकसरीने वापर करावा व ऑफिस मुख्याने त्यावर लक्ष पुरवावे यासंबंधीतील निकाल हुकूम दिनांक १६/०४/१९१७ रोजी देण्यात आला होता.

राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या संस्थानातील कार्यालयांमध्ये शिस्त लागावी यासाठी अनेक आदेश दिले होते त्यापैकी काही आदेश शब्द मर्यादेमुळे फक्त शीर्षकरुपाने देत आहे.

ऑफिस सामानाचा खाजगी वापर करू नये, नोकर लोकांनी आपल्या सह्या स्वच्छ कराव्यात, अस्वच्छ लिहिणाऱ्या कारकुनास बडतर्फ करावे, वरिष्ठांशी उद्धट वर्तन केल्याबद्दल शिक्षा व पदावनती करावी, आगाऊ सूचना न देता नोकरी सोडणारेस शिक्षा देण्यात यावी, अधिकाराचा दुरुपयोग करणाऱ्या नोकरांना प्रतिबंध करतानाची नियमावली, रात्रपाळी गैरहजर राहणाऱ्या बदली कामगारांना एक रुपया दंड, विविध पदनिहाय विशेष गणवेश मंजुरी याप्रकारचे कार्यालयीन आदेश राजर्षी शाहू महाराजांनी दिले होते. प्लेग काळात क्वारंटाईन वेळी नोकरीच्या ठिकाणी हजेरी संदर्भात विशेष नियम लागू केले होते.

संस्थानात दैनंदिन हजेरी पत्राचे सादरीकरण त्यांनी बंधनकारक केले होते. संस्थान बाहेर दौरा परवानगीशिवाय करू नये, त्याची लिखित नोंद ठेवणे आवश्यक असल्याचे नियम संस्थानात लागू होते. वाहन भत्ता स्वीकारणाऱ्या अधिकाऱ्यांनी वाहन खात्री पत्रके द्यावीत असेही नियम करवीर संस्थानात लागू होते.

कामात कसूर केल्याबद्दल बिलाच्या रकमेची कॉन्ट्रॅक्टरवर जबाबदारी निश्चित करावी, नोकरी जमिनीवर तगाई देण्याबाबत विशिष्ट निर्णय देण्यात आले होते.

ज्याप्रमाणे शककर्ते छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ हे मनुष्यबळ विकास व्यवस्थापनाचे एक आदर्शवत उदाहरण आहे, त्याचा अंगीकार राजर्षी शाहू महाराजांनी तहहयात केल्याचे त्यांनी घेतलेल्या निर्णयावरून जाणवते. त्यामुळेच ‘माणसं घडवणारा राजा’ अशी बिरुदावली देताना शिवछत्रपतींचे वैचारिक वारस राजर्षी शाहू हे सुद्धा अधोरेखित होतात. आमच्यासाठी विशेष म्हणजे आमचे पणजोबा प्रथम सरपंच सरवडे, राधानगरी कै.भीमराव रेपे यांना शाहूकाळात वंश परंपरागत इनाम, सिनियर क्लर्कपदी बढती, राजाराम महाराज यांचे काळात निवृत्तीनंतर नाईक पदवी देऊन गावी नेमणूक अशा मनुष्यबळ व्यवस्थापन म्हणजे एच. आर. नियमाचा अंतर्भाव असलेले ठराव उपलब्ध आहेत.

Related posts

भारताची आरोग्य व्यवस्था गंभीर

पेपरफुटी आणि एकलव्याचा अंगठा

१५ लाख फॉलोअर्स असलेल्या कुत्र्याच्या मृत्यूची कहाणी