Rahul attacks ECI: निवडणूक आयोग-भाजपमध्ये साटेलोटे : राहुल गांधी

Rahul attacks ECI

नवादा (बिहार) : ‘मतदार अधिकार यात्रे’च्या तिसऱ्या दिवशी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारतीय निवडणूक आयोगावर (ECI) हल्ला सुरूच ठेवला. निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पक्षात (BJP) साटेलोटे असल्याचा आरोप त्यांनी केला. (Rahul attacks ECI)

नवादा येथील भगतसिंग चौकात एका जाहीर सभेला संबोधित करताना श्री. गांधी म्हणाले, ‘‘भाजप आणि निवडणूक आयोग यांच्यात साटेलोटे झाले आहे. ते एकत्र मते चोरत आहेत. संविधानाने दिलेला मतदानाचा अधिकार नरेंद्र मोदी, अमित शहा आणि निवडणूक आयुक्त हिसकावून घेत आहेत.’’

ते पुढे म्हणाले की, भाजपने निवडणूक आयोगासोबत महाराष्ट्र, हरियाणा आणि मध्य प्रदेशात मते चोरली आहेत. महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान, निवडणूक आयोगाने सुमारे १ कोटी नवीन मतदार निर्माण केले, या आरोपाचा त्यांनी पुनरूच्चार केला. (Rahul attacks ECI)

‘‘जेव्हा आम्ही विचारले की हे १ कोटी नवीन मतदार कोण आहेत, तेव्हा निवडणूक आयोगाकडे कोणतेही उत्तर नव्हते. जेव्हा आम्ही व्हिडिओग्राफीची मागणी केली तेव्हा त्यांनी कायदा बदलला. आता बिहारमध्ये विशेष सखोल तपासणी (SIR) च्या नावाखाली, भाजप आणि निवडणूक आयोग मते चोरत आहेत. आम्ही त्यांना मत चोरीतून कसल्याही परिस्थिती सुटू देणार नाही,’’ असा इशाराही गांधी यांनी दिला.

राजदचे नेते तेजस्वी यादव यांच्यासह यात्रेत इंडिया आघाडीचे इतर नेतेही सहभागी झाले आहेत.

कथित मतदान चोरीच्या परिणामांचे स्पष्टीकरण देताना, श्री. गांधी यांनी निदर्शनास आणून दिले की प्रथम मतदार कार्ड काढून घेतले जातील, नंतर अदानी आणि अंबानींना रेशन कार्ड आणि जमिनी दिल्या जातील. (Rahul attacks ECI)

‘‘हा देश काही उद्योगपतींचा नाही. हा देश तरुणांचा, शेतकऱ्यांचा आणि छोट्या व्यापाऱ्यांचा आहे, पण येथे सर्व काही मोठ्या उद्योगपतींसाठी केले जाते. म्हणून, ही परिस्थिती बदलण्यासाठी आपण एकत्र आले पाहिजे,’’ असे आवाहन गांधी यांनी केले.

लोकसभा यादीत नाव, पण आता गायब

सभेला संबोधित करण्यापूर्वी, श्री. गांधी यांनी स्थानिक शेतकरी सुबोध कुमार यांना त्यांची कहाणी सांगण्यास सांगितले. त्यांनी श्री. गांधींना सांगितले की त्यांचे नाव २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मतदान केले, पण आता मसुदा यादीतून नाव काढून टाकण्यात आले आहे. विशेष म्हणजे सुबोध कुमार हे लोकसभा निवडणुकीत मतदान एजंट होते.

त्यांच्या कहाणीवर प्रतिक्रीया व्यक्त करताना राहुल गांधी म्हणाले, सुबोध कुमार यांच्यासारखे अनेक मतदार आहेत ज्यांचे नाव मतदार यादीत होते आणि आता ते काढून टाकण्यात आले आहे.

तेजस्वी यादव यांनी राहुल गांधींच्या दाव्याचे समर्थन केले.

राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) नेते आणि माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनीही आरोप केला की निवडणूक आयोग भाजपसोबत मतदानाचा अधिकार हिसकावून घेण्यात गुंतले आहे. (Rahul attacks ECI)

‘‘ते मतदानाचा अधिकार हिरावून घेत आहेत, अनेक नावे काढून टाकण्यात आली आहेत आणि जे जिवंत आहेत त्यांना मृत घोषित करण्यात आले आहे. बिहारचे लोक २० वर्षांपासून राज्यात राज्य करणाऱ्या या खतरा सरकारला धडा शिकवतील. नितीश कुमारजी बेशुद्ध अवस्थेत आहेत आणि ते बिहारवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत,’’ असे श्री. यादव म्हणाले.

बिहारच्या विकासाला गती देण्याची आणि महाआघाडीला पाठिंबा देऊन सध्याचे सरकार उलथवून टाकण्याची वेळ आली आहे, असे यादव म्हणाले.

राहुल गांधींना पंतप्रधान करा :  तेजस्वी

पुढील लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांना पंतप्रधान करण्याचे आवाहनही तेजस्वी यादव यांनी यावेळी उपस्थितांना केले.

विकासशील इंसान पक्षाचे (व्हीआयपी) प्रमुख मुकेश सहानी आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (मार्क्सवादी-लेनिनवादी) सरचिटणीस दीपांकर भट्टाचार्य यांनी, बिहारमध्ये मतदान होणाऱ्या मतदार यादीतून खऱ्या मतदारांची नावे वगळण्याचे षड्यंत्र सुरू असल्याचा आरोप केला.

आदल्या दिवशी, गांधी यांनी पुनामा येथून यात्रा पुन्हा सुरू केली आणि वाटेत वजीरगंज येथे ते गाडीतून उतरले. शाळेतील मुलांचीही त्यांनी भेट घेतली.

यात्रेदरम्यान समर्थकांनी एसआयआरला विरोध, भारतीय निवडणूक आयोग, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष (भाजपा) यांच्या विरोधात घोषणा देत परिसर दणाणून सोडला. त्यांनी ‘व्होट चोर, गद्दी छोड,’ अशा घोषणाही दिल्या.

Related posts

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर

डी वाय पाटील अभिमत विद्यापीठ देशात नवव्या स्थानी

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर