R. Ashwin : आर. अश्विनला पद्मश्री प्रदान

R. Ashwin

नवी दिल्ली : भारताचा माजी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनला सोमवारी (दि. २८) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री प्रदान करण्यात आला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे (बीसीसीआय) अश्विनने पद्मश्री स्वीकारतानाचा व्हिडिओ एक्सवरून (ट्विटर) प्रसिद्ध करण्यात आला आहे. (R. Ashwin)

राष्ट्रपती भवन येथे आयोजित सोहळ्यामध्ये सोमवारी पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. अश्विनने भारतीय क्रिकेटसाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्याला पद्मश्री जाहीर झाला होता. मागील वर्षी ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. २०११ मध्ये कसोटी पदार्पण करणाऱ्या अश्विनने भारतातर्फे १०६ कसोटी सामन्यांत २४ च्या सरासरीने ५३७ विकेट घेतल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तो अनिल कुंबळे (६१९) यांच्याखालोखाल दुसऱ्या स्थानावर आहे. याशिवाय त्याने कसोटी कारकिर्दीत ६ शतके व १४ अर्धशतकांसह ३,५०३ धावाही केल्या आहेत. अश्विनने ११६ वन-डे सामन्यांत १५६, तर ६५ टी-२० सामन्यांत ७२ विकेट घेतल्या आहेत. अश्विन हा २०११चा वर्ल्ड कपविजेत्या व २०१३च्या चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या भारतीय संघाचा सदस्य होता. (R. Ashwin)
सध्या अश्विन आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्ज या संघाकडून खेळत आहे. आयपीएलमध्ये अश्विनच्या नावावर १८५ विकेट जमा असून यंदाच्या मोसमात त्याने आतापर्यंत ५ विकेट घेतल्या आहेत. दरम्यान, अश्विनबरोबरच हॉकीपटू पी. आर. श्रीजेशलाही सोमवारी सोहळ्यात पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. (R. Ashwin)

हेही वाचा :
कर्णधारपदासाठी श्रेयसलाच पसंती
बुमराह म्हणतो, मलिंगाच सरस!

Related posts

महिला आरक्षणात मागास महिलांसाठी तरतूद हवी

मृत्युदंडाच्या शिक्षा अपिलात का टिकत नाहीत?

नरेंद्र मोदींना हरवता येऊ शकतं… !