R. Ashwin : बुमराहच हवा कसोटी कर्णधार

R. Ashwin

चेन्नई : रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर भारतीय कसोटी संघाचे कर्णधारपद जसप्रीत बुमराहकडे दिले जावे, असे मत रविचंद्रन अश्विनने व्यक्त केले आहे. वेगवान गोलंदाज बुमराहचा फिटनेस समाधानकारक असल्यास कर्णधारपदासाठी तोच योग्य उमेदवार असल्याचे भारताचा माजी फिरकीपटू अश्विन म्हणाला. (R. Ashwin)

‘ॲश की बात’ या आपल्या यू-ट्यूब कार्यक्रमात अश्विनने भारतीय संघाचा आगामी इंग्लंड दौरा आणि नेतृत्व यांविषयी मते मांडली. “रोहित आणि विराट कोहली हे दोघेही एकाचवेळी निवृत्ती घेतील, याची मला कल्पना नव्हती. भारतीय कसोटी संघासाठी हा खऱ्या अर्थाने कसोटीचा काळ आहे. हा गौतम गंभीर युगाचा प्रारंभ आहे, असे मी म्हणेन. पुढील महिन्यात इंग्लंडचा दौरा करणारा भारतीय संघ हा पूर्णपणे नवा संघ असेल. बुमराह हा बहुधा या संघातील सर्वांत वरिष्ठ खेळाडू आहे. तो कर्णधारपदासाठी पात्र आहे. त्याच्या शारीरिक तंदुरुस्तीचा विचार करून निवडकर्ते याबाबत अंतिम निर्णय घेतील,” असे अश्विन म्हणाला. रोहित व विराटच्या निवृत्तीमुळे संघात निश्चितच नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली आहे. इंग्लंडसारख्या महत्त्वाच्या दौऱ्यांसाठी अनुभव खरेदी करता येत नाही. विराटची उर्जा आणि रोहितची स्थितप्रज्ञता यांची उणीव भारतीय संघाला नक्की जाणवेल, असेही अशिवनने सांगितले. (R. Ashwin)

रोहित व विराटच्या निवृत्तीबाबत बोलताना, या दोघांकडेही अद्याप भारतीय कसोटी संघात योगदान देण्यासारखे खूप काही होते, असे अश्विनने नमूद केले. कोहली आणखी एक-दोन वर्षे तरी कसोटी क्रिकेट खेळू शकतो, असे मला प्रामाणिकपणे वाटते. रोहितने किमान इंग्लंड दौऱ्यावर तरी जायला हवे होते, असे अश्विन म्हणाला. भारतीय संघाच्या २०२१ मधील इंग्लंड दौऱ्यात रोहितने केलेली फलंदाजी मला खूप आवडते. त्याने लोकेश राहुलसोबत दिलेल्या दमदार सलामीमुळे आम्हाला मालिकेत २-१ ने आघाडी घेता आली होती. २०१८-१९ ते २०२२-२३ हा रोहितचा कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम काळ होता. केवळ नेतृत्वासाठी तरी त्याने इंग्लंडच्या दौऱ्यात खेळायला हवे होते, असेही अश्विनने सांगितले. (R. Ashwin)

Related posts

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर

बागेश्वर बाबांचें शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य

आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवारांचा पोलिस ठाण्यात ठिय्या