Panchganga near danger level : पंचगंगा धोका पातळीवर, नागरिकांचे स्थलांतर

Panchganga near danger level

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर शहरात पावसाने उघडीप घेतली असली धरणक्षेत्रात पाऊस सुरू असल्याने पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढू लागली आहे. आज सकाळी अकरा वाजता पंचगंगा नदीने धोका पातळी गाठली असून राजाराम बंधाऱ्यावर पाण्याची पातळी ४३ फूट झाली आहे. त्यामुळे महापुराचा धोका वाढला आहे. प्रशासनाने पंचगंगा काठावरील नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर सुरू केले आहे. तर दुसरीकडे काही ठिकाणी पाणी ओसरण्यास सुरूवात झाल्याने आज सकाळी कोल्हापूर गगनबावडा रस्ता वाहतुकीसाठी खुला झाल्याने कोकणाकडे जाणारा एक मार्ग खुला झाला आहे. तर दुसरीकडे कोल्हापूर रत्नागिरी रस्त्यांवर महापुराचे पाणी आल्याने बंद झाला आहे. कसबा बावडा शिये मार्गावरही पाणी आल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. ( Panchganga near danger level)

काल बुधवारी कोल्हापूर पन्हाळा रस्त्यांवरील केर्ली येथे पाणी आल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. महापुराचा पहिला वेढा करवीर तालुक्यातील चिखली गावाला पडतो. बुधवारी रात्री जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आंबेवाडी, प्रयाग चिखली पूरग्रस्त भागांना भेटी देऊन नागरिकांना स्थलांतर करण्याचे आवाहन केले. यावेळी कोल्हापूर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, तहसीलदार करवीर स्वप्नील रावडे, पोलिस निरीक्षक किशोर शिंदे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ आदी उपस्थित होते.

त्यानुसार गुरुवारी सकाळ पासून नागरिकांचे स्थलांतर सुरू झाले.  करवीर तालुक्यातील चिखली येथील पूरग्रस्त नागरिकांचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात येत आहे, अशी माहिती करवीर तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी दिली.

कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर केर्ली-केर्ले तसेच हॉटेल ग्रीन फील्ड जवळ रजपूतवाडी या ठिकाणी अंदाजे दीड फूट पुराचे पाणी आल्याने सदरचा मार्ग  वाहतुकीसाठी वडणगे फाटा येथे बॅरिकेटिंग करून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यानंतर पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात आली.  कोल्हापूर- वाठार-वारणानगर-मार्गे-बोरपाडळे अशी वाहतूक सुरू आहे. ( Panchganga near danger level)

 दूधगंगा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला..

दूधगंगा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर ओसरला असून धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाली आहे. दूधगंगा धरणामधून एकूण १५,  ५००  प्रतिसेकंद इतका विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीपात्रातील पाणी पातळीत थोडी घट होऊ शकते.

ट्रकचालक, क्लिनरची सुटका

आणूर बस्तवडे रस्त्यांवर ट्रक चालक व क्लीनर या दोघांनी पुराच्या पाण्यामुळे  रस्ता बंद असतानाही रस्त्यात लावलेली बॅरिकेड्स बाजूला करून नदीच्या पाण्याच्या दिशेने निघाले. त्यांचा ट्रक पाण्यात बंद पडला. पुराच्या पाण्याने वेढलेल्या ट्रकवर हे दोघेही चढून उभे होते. त्यांच्याशी मोबाईल कॉन्टॅक्ट होत होता, पण ते दोघेही पुरात अडकल्यामुळे बाहेर पडू शकत नव्हते. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे एक पथक घटनास्थळी पोहोचले. या पथकाच्या स्वयंसेवकांनी ट्रक चालक व क्लिनर या दोघांची सुखरूप सुटका केली आहे.

धरणक्षेत्रात अतिवृष्टी कायम

गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार काल बुधवारी धरणक्षेत्रात जोरदार अतिवृष्टी झाली आहे. राधानगरी धरणक्षेत्रात ११८ मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. तुळशी धरणक्षेत्रात ४३, वारणेत ६२, दूधगंगेत ६२, कासारीत ६९ मिली मीटरची नोंद झाली आहे. कुंभी धरणक्षेत्रात ८९ तर भुदरगड तालुक्यातील पाटगांव धरणक्षेत्रात १२५ मिलीमीटरची नोंद झाली आहे. चंदगडमध्येही जोरदार पाऊस होत असून घटप्रभा धरणक्षेत्रात १२५, जांबरे धरणक्षेत्रात ८४, आजरा तालुक्यातील सर्फनाला धरणक्षेत्रात १२० मिलीमीटर नोंद झाली आहे. कोदे लघु पाटबंधारे क्षेत्रात ८० मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. सध्या जिल्ह्यातील ८० बंधारे पाण्याखाली आहेत. ( Panchganga near danger level)

Related posts

शरद पवार दिल्लीत कशासाठी हवेत?

संकटाच्या गर्तेतून राष्ट्रवादी काँग्रेस कशी मार्ग काढणार?

Jaysingrao Pawar मराठ्यांचा इतिहास लखलखीत करणारे संशोधक