दिनमान साहित्य उत्सवाला रसिकांचा उदंड प्रतिसाद

Overwhelming response to the Dinman Literature Festival

कोल्हापूर : प्रतिनिधी : नामवंत साहित्यिकांनी रसिकांशी साधलेले हितगुज, प्रख्यात हिंदी कवी उदय प्रकाश यांनी हिंदू आणि मराठी भाषिक साहित्यिकांशी बांधलेला संवादाचा पूल, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची तडाखेबाज मुलाखत, अभिनेत्री चिन्मयी सुमितने मारलेल्या दिलखुलास गप्पा, नामवंत लेखकांशी चर्चा, अभिव्यक्तीचा संवाद सवाल जवाब नाटकातील जुगलबंदी, व्यंगचित्रकारांची मैफल आणि नामवंत कवीची मैफलीने उत्सवाची गाठलेली उंची अशा दोन दिवसाच्या दिनमान साहित्य उत्सवाला कोल्हापूरसह, सांगली, सातारा आणि कोकणातील दर्दी रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. राज्य मराठी विकास संस्था, राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्ट हे उत्सवाचे मुख्य प्रायोजक असून प्रयोदी सोशल अन्ड कल्चर फाऊंडेशन, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप- सोसायटी आणि महालक्ष्मी अन्नछत्र हे सह प्रयोजक होते. (Overwhelming response to the Dinman Literature Festival)

कोल्हापूर साहित्य जगतात नवीन पायंडा

महाराष्ट्र दिनमान आयोजित दिनमान साहित्य उत्सवाला शुक्रवारी श्रीकृष्णा जन्माष्टमीच्या दिवशी राजर्षी शाहू स्मारक भवन येथे प्रारंभ झाला. सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, प्रख्यात हिंदी साहित्यीक उदय प्रकाश यांच्या हस्ते उत्सवाचे उद्घाटन झाले. कोल्हापूरच्या साहित्य जगतात दिनमान लिटफेस्ट ने एक नवा पायंडा पाडला आहे, असे मत पालकमंत्री आबिटकर यांनी व्यक्त केले. कोल्हापूरातील रसिकांना देशभरातील नामवंत लेखक, कवी, कलाकारांची मैफल उपलब्ध करुन दिल्याबद्दल खासदार महाडिक यांनी आनंद व्यक्त केला. कोल्हापूरातील रसिकांनी दाखवलेल्या उदंड प्रतिसादामुळे मी भारावलो आहे, असे मत ज्येष्ठ कवी उदय प्रकाश यांनी व्यक्त केले. स्वागत प्रास्ताविक, महाराष्ट्र दिनमानचे संपादक विजय चोरमारे यांनी केले तर महाराष्ट्र दिनमानचे संचालक अजिंक्य चोरमारे यांनी आभार मानले. (Overwhelming response to the Dinman Literature Festival)

…म्हणून मोदी-शाहांची दहशत संपली

प्रख्यात साहित्यिक व कवयित्री प्रज्ञा दया पवार यांच्या मुलाखतीत त्यांनी त्यांच्यावर लहानपणापासून झालेले साहित्य संस्कार, बंडखोर स्वभाव आणि कवितेत समाजातील उमटलेले प्रतिबिंब यावर उत्तरे दिली. डॉ. नंदकुमार मोरे, एकनाथ पाटील यांनी त्यांची मुलाखत घेतली. खासदार संजय राऊत यांची मुलाखत विजय चोरमारे आणि पत्रकार अमेय तिरोडकर यांनी घेतली. राऊत यांच्या ‘नरकातील स्वर्ग’ या पुस्तकांवर चर्चा झाली. शिवसेनेचे सुरवातीला असलेले भाजपशी संबध, २०१४ मध्ये पंतप्रधान मोदींना दिलेला पाठिंबा आणि अमित शाह यांच्या दिल्लीतील राजकारणातील आगमनांतर शिवसेना भाजप युतीतील बिघडलेले संबध, २०१९ नंतर युतीमधील कटुता यावर भाष्य केले. दिल्लीत शरद पवार आमचे पालक असल्याचे सांगून राऊत यांनी राहूल गांधी सत्ताधाऱ्यांशी निधड्या छातीने लढत असल्याबद्दल कौतुक केले. तुरुंगातील कैद्यांना मिळणाऱ्या सोयी सुधारणासाठी केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या समितीत आपण सदस्य असताना आर्थर रोड जेलमध्ये गार्ड ऑफ ऑनर दिला होता. त्याच तुरुंगात एक कैदी म्हणून जावे लागले याकडे त्यांनी लक्ष वेधले. ईडी कोठडीला आम्ही घाबरलो नाही म्हणून मोदी शाहांची दहशत संपली असे मतही त्यांनी व्यक्त केले.

चिन्मयी सुमीत यांना कोयनामाई पुरस्कार

हिमांशु स्मार्त यांनी अभिनेत्री चिन्मयी सुमीत यांची मुलाखत घेतली. औरंगाबाद शहराने केलेले संस्कार, लहानपणापासून असलेला बंडखोर स्वभाव, अभिनय, दिग्दर्शकांनी केलेले मार्गदर्शन, भूमिकांचा अभ्यास यावर त्यांनी दिलखुलास उत्तरे दिली. दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचा कोयनामाई पुरस्कार चिन्मयी सुमीत यांना साहित्यिक प्रज्ञा पवार यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी विजय चोरमारे, भीमराव धुळुबुळू, डॉ. विनोद कांबळे यांनी दमसाचे पदाधिकारी उपस्थित होते.

सवाल-जवाब नाटकाने रसिक भारावले

दुपारच्या सत्रात आसाराम लोमटे, कृष्णात खोत, नामदेव माळी या तीन समकालीन लेखकांची चर्चा झाली. तिनही लेखकांनी आपल्या लेखनातील अनुभव कथन केले. तसेच लिखानातील भौगोलिक स्थान, मनुष्य स्वभावावर चर्चा करताना सद्याच्या काळात घटनेवर भाष्य केले. पहिल्या दिवशाच्या उत्सवाची सांगता सवाल जवाब अभिव्यक्तीचा तमाशा या नाटकाने झाली.  स्वातंत्र, लोककला आणि राजकारण याची सांगड घालणाऱ्या प्रभागी संगीत नाटकाची मेजवाणी रसिकांना लाभली. कलावतीच्या भूमिकेतील सुकन्या गुरव गायन, नृत्यासह अभिनयाने कमाल दाखवत रसिकांना मंत्रमुग्ध केले. संकेत जोशी आपल्या अभिनयाने नाटकात चांगलेच रंग भरले. सुकन्या आणि संकेत यांच्यातील टायमिंगवर पब्लिक जाम खूष झाले. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर होणाऱ्या अतिक्रमणांवर नाटकात नर्मविनोदी, गंभीर शैलीत फटकारे मारण्यात आलेत. गिरीश दातार आणि अपुर्वा कुलकर्णी यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

लेखकांनी मुलाखतीत रंग भरले

रविवारी दुसऱ्या दिवशी उत्सवाची सुरुवात पुस्तकांच्या लेखकांच्या मुलाखतीने झाली. ‘विठोबा मिसिंग इन पंढरपूर’ पुस्तकाचे लेखक विनायक होगाडे, ‘द लास्ट डायरी ऑफ कस्तुर, माय बा’ पुस्तकाच्या लेखिका सोनाली नवांगुळ, ‘पागीर’चे लेखक भरत दौंडकर यांनी पुस्तक लिहिताना आलेल्या अनुभव सांगताना मुलाखतीत रंग भरले. डॉ. आलोक जत्राटकर आणि डॉ. विनोद कांबळे यांनी मुलाखत घेतली.

स्थानिक भाषेला उत्तेजन देण्याची गरज

उत्सवाची मुख्य आकर्षण असलेली मुलाखत गणेश विसपुते यांनी प्रखात कवी उदय प्रकाश यांची मुलाखत  घेतली. उदय प्रकाश यांनी सुनो कारीगर, अबूतर-कबूतर, रात मे हारमोनियन या कवितेवर चर्चा केली. कवितेवर पडलेले समाजाचे प्रतिबिंब, निसर्ग, पर्यावरणावर उदय प्रकाश यांनी मत केले. पीली छतरीवाली लडकी, तिरिछ, मोहनदास, वारेन हेस्टिंग्ज का सांड, दरिया घोडा या कथा संग्रहावर चर्चा झाली. स्थानिक भाषेला उत्तेजन देण्याची गरज व्यक्त करताना उदय प्रकाश यांनी स्थानिक शब्द लुप्त होत असल्याची खंत व्यक्त केली

मोदी शाहांवरील व्यंगचित्रे कमी झाली

पत्रकार मुकेश माचकर यांनी व्यंगचित्रकार मंजुल, आलोक आणि गौरव सर्जेराव यांची मुलाखत घेतली. तिघांनी व्यंगचित्रातील अनुभव सांगितले. आम्ही खरंच व्यंगचित्रकार आहोत का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित करत फिरकी घेतली. चित्र हे व्यक्तीचे दर्शन घडवते तर व्यंगचित्र हे चित्रातून विचार करायला प्रवृत्त करते असे मत आलोक, मंजुल यांनी व्यक्त केले. आलोक आणि मंजुल यांनी आर.के.लक्ष्मण यांच्या आठवणी सांगितल्या. २०१४ पासून मिडियाच्या मुख्य प्रवाहात मोदी शहांवरील व्यंगचित्रे जवळजवळ कमी झाली आहेत याकडेही त्यांनी लक्ष वेधले. जागतिक रणांगणात महाराणी ताराबाई या विषयावरील चर्चेत मेधा देशमुख भास्करन यांची मुलाखत डॉ. मंजुश्री पवार आणि डॉ. प्रमिला जरग यांनी घेतली. मेधा भास्करन यांनी ताराराणींचे चरित्र आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवल्याबद्दल मंजुश्री पवार यांनी त्यांचे कौतुक केले.

कवितांना रसिकांची भरभरुन दाद

दिनमान साहित्य उत्सवाचा समारोप कवी संमेलनाने झाला. यावेळी प्रयोदी सोशल अन्ड कल्चर फाऊंडेशन डॉ. प्रविण कोडोलीकर, मुस्लीम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर यांचा सत्कार करण्यात आला.  कवी अविनाश काठवटे, नितीन चंदनशिवे, आबा पाटील यांच्या कवितांना रसिकांनी भरभरुन दाद दिली. स्वाती शिंदे पवार, रफिक सूरज, भीमराव धुळुबुळू, इंद्रजीत घुले, विलास माळी यांनी कविता सादर केल्या. रसिकांनी त्यांच्या कवितांना भरभरुन दाद दिली. चंद्रकांत पोतदार यांनी सुत्रसंचालन केले.  (Overwhelming response to the Dinman Literature Festival)

Related posts

सदाचार हाच न्यायमूर्ती रानडे यांच्या धर्मविचारांचा मूलाधार: डॉ. अशोक चौसाळकर

अमिताभनी मीडियावाल्यांना ठोकून काढण्याची भाषा का केली?

शासनाच्यावतीने १४ नोव्हेंबरला शंकर खंडू पाटील जन्मशताब्दी कार्यक्रम