नितिशकुमार अलर्ट मोडवर !

पाटणा : महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर भाजप सर्वांत मोठा पक्ष म्हणून उदयाला आला. साहजिकच या पक्षाचे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांची जागा घेतली. एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रिपदावर समाधान मानावे लागले. महाराष्ट्रातील मुख्यमंत्री बदलानंतर बिहारमधील जनदा दल (युनायटेड) च्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांसह नितिशकुमारही अलर्ट मोडवर आले आहेत. (Nitish Kumar)

बिहार विधानसभेच्या निवडणुका २०२५ मध्ये होत आहेत. या निवडणुका नितीशकुमार यांच्याच नेतृत्वात लढणार असल्याचे भाजप सांगत आहे. तथापि, महाराष्ट्रासारखाच प्रयोग तेथे झाला आणि भाजपने १२२ हा बहुमताचा आकडा गाठला तर ‘जदयु’चे काय होणार, अशी चिंता या पक्षातील धुरिणांना सतावू लागली आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने याबाबतचे वृत्त दिले आहे.

२०२०च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये ‘जदयु’ला ४३ जागा मिळाल्या होत्या, तर भाजपला ७४ जागा मिळाल्या होत्या. तरीही भाजपने सत्तेसाठी नितीशकुमार यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ घातली. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकाही भाजपने एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली लढल्या. शिंदे यांना आपल्यालाच मुख्यमंत्रिपद मिळेल, असे वाटत होते. तथापि, भाजपने फासे पलटले. जास्त जागा मिळाल्याचे सांगत मुख्यमंत्रिपदावर दावा सांगितला आणि ते पद पदरात पाडूनही घेतले. अशीच स्थिती बिहारमध्ये झाली तर काय होणार, असा प्रश्न आता ‘जदयू’ नेत्यांपुढे निर्माण झाला आहे.

याबाबत कुणी उघड बोलत नसले तरी ‘जदयु’च्या वरिष्ठ कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्रात महायुतीच्या प्रचाराचे नेतृत्व शिंदे यांनी केले. त्यांना पुन्हा मुख्यमंत्रिपदाची अपेक्षा होती. ‘बिहार मॉडेल’ स्वीकारण्याचा प्रस्ताव शिंदे यांनी दिला होता. मात्र तो भाजपने नाकारला. शिंदे यांचा अपेक्षाभंग झाला. या पार्श्वभूमीवर ‘जदयु’ला नितीशकुमार यांच्या भवितव्याची चिंता लागली आहे.

‘नितीशकुमार सत्तेसाठी हपापलेले नाहीत. पक्षाला कमी जागा मिळाल्यामुळे २०२० मध्ये त्यांनी मुख्यमंत्रिपद नाकारले होते. परंतु राजनाथ सिंह, जे. पी. नड्डा आणि भूपेंद्र यादव यांच्या आग्रहाखातर त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली होती,’ असे जदयुच्या एका वरिष्ठ नेत्याने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले.

जदयुचा आणखी एक नेत्याने सांगितले की, महाराष्ट्रातील घडामोडीच्या पार्श्वभूमीवर स्थिती डळमळीत असली तरी बिहारची परिस्थिती वेगळी आहे. शिंदे यांच्याकडे पर्यायांचा अभाव आहे. शिवसेनेचे दोन्ही गट हिंदुत्वाचा पुरस्कार करतात. विशेष म्हणजे ‘जदयु’च्या तुलनेत शिंदे यांच्या पक्षाचा सामाजिक पाया कमकुवत आहे. ‘जदयु’ला लोकसभा निवडणुकीत १६.५ टक्के मतदारांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे येथे रालोआने ४० पैकी ३० जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही.

हेही वाचा : 

Related posts

Sambhal : संभलमध्ये आढळली १५० वर्षांपूर्वीची बारव

मंत्र्यांच्या खातेवाटपानंतर आता पालकमंत्री पदासाठी चढाओढ

कोल्हापूरात अमित शहांच्या निषेधार्थ इंडिया आघाडी एकवटली