नेहरू, पटेल, पंतप्रधानपद आणि आपले विश्वगुरूजी!

  • विसोबा खेचर, मुक्काम मुंबई

भारताचे पहिले पंतप्रधान कोण, हा प्रश्न आपण सध्या बाजूला ठेऊया. त्याचे काय आहे, आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी, जे की एंटायर पॉलिटिकल सायन्सचे पदवीधारक आहेत, त्यांनी मागे एकदा म्हणून ठेवले होते कुठे तरी, की भारताचे पहिले पंतप्रधान नेताजी सुभाषचंद्र बोस होते. असेलही तसे. म्हणजे अजून भारत स्वतंत्र झाला नव्हता. तिकडे जर्मनी आणि जपानमध्ये जाऊन नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्त्व स्वीकारले होते. त्याकाळात त्यांनी आझाद हिंद सरकार स्थापन केले होते आणि त्याचे ते पंतप्रधान होते. तर हा इतिहास राहू दे बाजूला. नंतर त्याचे रीतसर सरकारी पुनर्लेखन होईलच. सध्या मोदीजी म्हणतात ना, तर तेच ब्रह्मसत्य. (Nehru, Patel and Modi)

तर सध्याचा आपल्यापुढचा जीवन-मरणाचा प्रश्न आहे तो हा, की देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू नावाचे एक गृहस्थ होते, तर ते त्या पदावर कसे आले? देशातील सर्व प्रश्नांची उत्तरे अर्थातच आपले महामहीम पंतप्रधान नरेंद्रजी मोदीजी यांच्याकडे आहेत. कां की, ते एंटायर पॉलिटिकल सायन्सचे पदवीधारक आहेत व एवढेच नव्हे, तर ते साक्षात् ‘ज्ञान गुन सागर’, ‘विश्वगुरू’ वगैरे आहेत. तर या विश्वगुरूजींनी परवाच (पुन्हा… पुन्हा एकदा) हा गौप्यस्फोट केला आहे, की नेहरू हे पंतप्रधानपदी वशिल्याने आले. सरदार वल्लभभाई पटेलच खरे पंतप्रधान होणार होते. पण म. गांधींनी नेहरूंचे नाव पुढे सारले.

अंधेरे में एक प्रकाश..

म्हणजे त्याचे झाले असे, की त्या काँग्रेस नावाच्या पक्षात (रौरवनरकात जाऊन पडो तो. वाट्टोळे होवो त्याचे. देशद्रोही कुठला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढला म्हणून काय लगेच देशप्रेमी झाला? अरे, देशप्रेम करायचे तर त्यासाठी आधी डीपीवर तिरंगा ठेवावा लागतो आणि राष्ट्रहित सर्वोपरि असे लिहावे लागते. आहात कुठे?) तर ते असो. विषय हा चालला आहे, की स्वातंत्र्य मिळण्याआधी त्या काँग्रेसमध्ये निवडणूक झाली पक्षाध्यक्षपदाची. आपले अंधेरे मे एक प्रकाश जगतप्रकाश जगतप्रकाश नड्डा हे कसे भाजपचे पक्षाध्यक्ष आहेत ना सर्वसामान्य प्रदेश कमिट्यांतून निवडून आलेले… तसेच ते. तर काँग्रेसच्या प्रदेश कमिट्यांनी निवडले सरदार पटेलांना. (हो. ते काँग्रेसमध्येच होते तेव्हा. आता आता २०१०च्या सुमारास भाजपमध्ये आले.) तर आता काँग्रेसचे अध्यक्ष झाले वल्लभभाई पटेल. मोठा दबदबा होता त्यांचा काँग्रेस कमिट्यांवर. नेहरूंचे काय, ते साधे लोकप्रिय होते देशात. म्हणजे आता तुलना नको करायला. पण हल्ली बघा विश्वगुरू कसे ब्रह्मांडात लोकप्रिय आहेत. पण संघटनेत भाईगिरी चालते कोणाची, तर अमितभाईंची. (पटत नाही ना हे? मा. ना. देवेंद्रजी फडणवीसजी यांस विचारा, की बॉ, मुख्यमंत्रीपद निवडीला एवढा उशीर का झाला भौ?) तर त्याच प्रमाणे सरदार काँग्रेस संघटनेत लोकप्रिय. ते निवडून आले. १५ पैकी १२ मते मिळाली. बाकीचे तीन ‘वरील पैकी एकही नाही’ ही ऑप्शन टिक करून बसले. आता असे झाल्यावर पंतप्रधानपदावर पक्षाध्यक्षच यायला हवा की नाही? तो कसा काय म्हणजे? शाखेवर तर घटना लिहिली आहे तशी. त्यानुसार काँग्रेसचा पक्षाध्यक्ष हा पंतप्रधानच व्हायला हवा. समजा तेथे आचार्य कृपलानी निवडून आले असते, तर तेही झाले असते पंतप्रधान. नाही समजले? आजच्या परिप्रेक्ष्यात सांगतो. समजा की बॉ, २०१४ मध्ये दुसऱ्या स्वातंत्र्याची लढाई जिंकल्यानंतर आपले महायात्रेकरू लालकृष्ण अडवाणी भाजपच्या पक्षाध्यक्षपदी असते, तर विश्वगुरूजींऐवजी तेच प्रधानसेवक झाले असते की नाही? तेथे कुठे लोकप्रियतेचा वगैरे प्रश्न येतो. तर आहे ते असे आहे.

पण महात्मा गांधींनी मध्ये दांडी मारली. आणि त्यांच्या त्या लाडक्या नेहरूंना पंतप्रधान करून टाकले.

नशीब या गांधीबाबाचे, की विश्वगुरूंनी अद्याप त्यांच्यावर या वरून टीका केलेली नाही. ते टीकेचे सर्वाधिकार त्यांनी भगतगणादी गणंगांकडे सुपूर्द केलेले आहेत.

सरदारांचे पत्र

तर केवळ लोकप्रियतेमुळे व अर्थातच अन्य काही गोष्टी असतील, या मुळे पंतप्रधानपदी नेहरू आले. त्यावरून मग तेव्हाच्या कुजबूज आघाड्या अर्थातच कार्यान्वित करण्यात आल्या. त्यांचे मठ्ठसे बौद्धिक घेण्यात आले असावे तेव्हा. लोक कुजबूज करू लागले. ते पाहून सरदारांनी एक भलेमोठे पत्रच लिहिले १४ नोव्हेंबर १९४९ला. सरदार पण काय ना? त्यांनी भविष्यातील भारताचा काही विचारच केला नाही. त्यांना हे समजायला हवे होते, की हे असे पत्र लिहून ते कुजबूज आघाडीचाच नव्हे, तर विश्वगुरूजींचाही केवढा मोठा मुखभंग करणार आहेत. पण त्यांनी लिहिले, की ‘काही लोक जाणीवपूर्वक आमच्यामध्ये दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असतात. एक गोष्ट त्यांना मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, आम्ही दोघे महात्मा गांधी या एकाच महान गुरूचे शिष्य आहोत. जवाहर आणि माझ्यामध्ये नैसर्गिक स्नेहबंधाने जोडलेले एक ममत्व आहे.’ बरे एवढे सांगून सरदारांनी थांबावे ना. पण नाही. त्यांनी पुढे लिहिले, की ‘त्याचे चारित्र्य स्वच्छ आहे…. जवाहरची लोकप्रियता अफाट आहे. स्वातंत्र्याच्या पहाटे भारताच्या जनतेने एक सुंदर स्वप्न पाहिले, त्याच्या केंद्रस्थानी जवाहरच होता आणि आहे.’ हे हे शेवटचे वाक्य तरी सरदारांनी लिहायला नको होते. जवाहरलाल नेहरू हे पंतप्रधानपदी आले ते कसे योग्य होते हे सांगायचे काही कारण होते का? हे पत्र, ते वाक्य, तेव्हाची ती ऐतिहासिक स्थिती, तेव्हाचे राजकारण हे सारे सारे नीटच दुर्लक्षित करण्याचे कष्ट करावे लागतात ना त्यामुळे.

वशिल्याने पंतप्रधान

पण देशासाठी हे कष्ट आम्ही उचलणारच. अखेर घेतले जे व्रत हाती ते निभावणारच. ओरडून ओरडून लोकांना सांगणार, की ते नेहरू वशिल्याने पंतप्रधान झाले. अन्यथा त्यांच्या अंगी काय योग्यता होती? असतील ते बॅलिस्टर मोठे, शिकले असतील, पुस्तके लिहिली असतील, देशासाठी लढले असतील, तुरूंगात जाऊन माफीही मागितली नसेल… त्या तिकडे जगात त्यांना एक स्टेट्समन म्हणून ओळखत असतील, भारतात कमालीचे लोकप्रिय असतील, पण म्हणून काय झाले? ते पंतप्रधान म्हणून योग्य नव्हतेच.

त्यांना जर खरोखरच लोकशाहीची चाड असती, तर त्यांनी पटेलांना पंतप्रधान होऊ दिले असते.

आमचे विश्वगुरूजी जर त्यांच्या जागी असते, तर त्यांनी खुशाल मा. पक्षाध्यक्ष जगतप्रकाशजी नड्डांना पंतप्रधानपद दिले असते. आहात कुठे?

हेही वाचा:
modi’s retort : राज्यघटना दुरुस्तीचे बीज काँग्रेसनेच रोवले

राधेश्याम जाधव यांना यंदाचा ‘दीनमित्र’कार मुकुंदराव पाटील पुरस्कार

हिंदुदुर्ग!

Related posts

Sambhal : संभलमध्ये आढळली १५० वर्षांपूर्वीची बारव

मंत्र्यांच्या खातेवाटपानंतर आता पालकमंत्री पदासाठी चढाओढ

कोल्हापूरात अमित शहांच्या निषेधार्थ इंडिया आघाडी एकवटली