Navi Mumbai Airport : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे पंतप्रधानांच्या हस्ते गुरुवारी उद्घाटन

Navi Mumbai Airport

मुंबई :  प्रतिनिधी : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जोडीला बांधण्यात आलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी (दि ८) होणार आहे. तसेच मुंबई मेट्रो लाईन-३ च्या अंतिम टप्प्याचे आणि ‘मुंबई वन’ या देशातील पहिल्या एकात्मिक कॉमन मोबिलिटी अॅपचे लोकार्पण होणार आहे. त्याशिवाय, राज्यातील ४१९ आयटीआय आणि १४१ तांत्रिक संस्थांमध्ये २,५०६ बॅचेसच्या माध्यमातून नवीन अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम या उपक्रमाची सुरुवात प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या विमानतळावरुन डिसेंबर २०२५ मध्ये देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू होणार आहेत. प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे लोकार्पण व उद्घाटनानंतर ते मुख्य समारंभस्थळी मेट्रो लाईन ३, वन मोबाईल ॲपचे लोकार्पण व कौशल्य विकास कार्यक्रमांचा शुभारंभ करणार आहेत. तसेच जाहीर सभा होणार असून ५० हजार लोकांसाठी बैठक व्यवस्था असणारा मंडप उभारण्यात आला आहे. (Navi Mumbai Airport)

नवी मुंबई विमानतळाजवळील प्रांगणात होणाऱ्या या कार्यक्रमास राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री किंजरापु राममोहन नायडू, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, लोकसभा सदस्य श्रीरंग बारणे यांच्यासह लोकप्रतिनिधी व विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. (Navi Mumbai Airport)

सर्वात मोठा ग्रीनफील्ड विमानतळ प्रकल्प

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा देशातील सर्वात मोठा ग्रीनफील्ड विमानतळ प्रकल्प ठरणार आहे. सिडको  प्राधिकरण आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडच्या माध्यमातून हा विमानतळ सार्वजनिक-खासगी भागीदारी अंतर्गत उभारण्यात आला आहे. उद्धाटनानंतर प्रधानमंत्री मोदी हे विमानतळावरील सोयी सुविधांची पाहणी करणार आहेत. (Navi Mumbai Airport)

दरवर्षी वीस लाख प्रवासी प्रवास करणार

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्यात १९ हजार ६४७ कोटींची गुंतवणूक करण्यात आली असून, १,१६० हेक्टर क्षेत्रावर उभारलेला हा विमानतळ दरवर्षी २० दशलक्ष प्रवासी व ०.५ दशलक्ष टन मालवाहतूक हाताळू शकतो. अंतिम टप्प्यात हे विमानतळ ९० दशलक्ष प्रवासी आणि ३.२५ दशलक्ष टन मालवाहतूक क्षमतेचे जागतिक दर्जाचे केंद्र बनेल. दोन समांतर कोड-एफ रनवे, जलद बाहेर पडण्यासाठी टॅक्सीवे, अत्याधुनिक मालवाहतूक  टर्मिनल, सौरऊर्जेवर आधारित ४७ मेगावॅटचा ऊर्जेचा पुरवठा आणि इलेक्ट्रिक बस सेवा ही या विमानतळाची वैशिष्ट्ये आहेत. तसेच, हा देशातील पहिला वॉटर टॅक्सीने जोडलेला विमानतळ असणार आहे.

मेट्रोतून रोज १३ लाख प्रवाशांना सेवा

मुंबईतील भूमिगत मेट्रो लाईन -३ च्या ३३.५ कि.मी. लांबीच्या अंतिम टप्प्याचे आचार्य अत्रे चौक–कफ परेड मार्गाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यावेळी लोकार्पण केले जाणार आहे. २७ स्थानके असलेली ही लाईन दररोज १३ लाख प्रवाशांना सेवा देईल. दर पाच मिनिटांनी धावणाऱ्या आठ डब्यांच्या गाड्या प्रति तास ७२ हजार  प्रवासी प्रवास करतील. सायन्स सेंटर ते कफ परेड असा १०.९९ कि.मी.चा टप्पा १२ लाख १९५ कोटी खर्चून बांधण्यात आला असून, हा मार्ग मंत्रालय, उच्च न्यायालय, आरबीआय, शेअर मार्केट, मरीन ड्राइव्हला जोडला जाणार आहे. मुंबई मेट्रो लाईन ३ हा एकूण  ३७ हजार २७६ कोटी खर्चाचा प्रकल्प केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार, जेआयसीए आणि एमएमआरसीएल यांच्या संयुक्त भागीदारीत राबविला गेला आहे.

कॉमन मोबिलिटी अॅपचे अनावरण

मुंबई महानगरातील प्रवाशांना अखंड आणि सुलभ प्रवास अनुभव देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘मुंबई वन’ या भारतातील पहिल्या एकात्मिक कॉमन मोबिलिटी अॅपचे अनावरण होणार आहे. हे अॅप उपनगरीय रेल्वे, मेट्रो लाईन्स, मोनोरेल, बेस्ट, टीएमटी, एनएमएमटी, केडीएमटी, एमबीएमटी, नवी मुंबई मेट्रो इत्यादी ११ सार्वजनिक वाहतूक ऑपरेटरशी जोडला जाणार आहे. दादर येथील आयटीआय मध्ये सेमीकंडक्टर टेक्निशियन कोर्स, ग्रीन हायड्रोजन उत्पादन, आयटीआय गडचिरोलीतील ट्रॅक्टर मेकॅनिक ट्रेडसाठी १०० टक्के नोकरीची हमी, तसेच नाशिक येथे होणारा कुंभमेळा लक्षात घेऊन त्या काळात रोजगार निर्माण करणारे विशेष अभ्यासक्रम हे या उपक्रमाची वैशिष्ट्ये आहेत.

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर