मुंबई : विशेष प्रतिनिधी : दिडशे वर्षांपासून या पुलाला कर्नाक पूल म्हणून ओळख जात होते. भारतीयांना फसविणारा आणि अत्याचार करणारा कर्नाक हा ब्रिटीश गव्हर्नर होता. त्याच्या काळ्या इतिहासाच्या खुणा पुसण्यासाठी कर्नाक पुलाचे सिंदूर नामकरण केल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (१० जुलै) सांगितले. (Named after the Karnak Bridge)
मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेला व पी. डी. मेलो मार्गाला जोडणाऱ्या या सिंदूर (पूर्वीचे कर्नाक) रेल्वे उड्डाणपुलाच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, कौशल, रोजगार मंत्री मंगल प्रभात लोढा, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, आ. ॲड मनीषा कायंदे, राज पुरोहित, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, अपर आयुक्त अभिजीत बांगर आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात इतिहासातील काळी प्रकरणे संपली पाहिजेत, त्याच्या खुणा मिटल्या पाहिजेत असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितल्याने कर्नाक पुलाचे नाव बदलले. पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सेनेने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानात जाऊन दहशतवादी अड्डे नष्ट केले. भारत पाकिस्तानात घुसून दहशदवादी अड्डे उद्धवस्त करू शकतो, हे दाखवून दिले. (Named after the Karnak Bridge)
रेल्वेवरचा पूल असल्याने आणि दाटीवाटीच्या अडचणीवर मात करून मुंबई मनपाने कमी वेळात ऐतिहासिक जुन्या कर्नाक पुलाचे उत्कृष्ट बांधकाम केल्याने मुख्यमंत्र्यांनी मनपाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले.
सिंदूर पुलाविषयी
दक्षिण मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मशीद बंदर आणि मोहम्मद अली मार्ग परिसरातील वाहतुकीसाठी सिंदूर पूल महत्त्वाचा आहे. मशीद बंदर परिसरात पूर्व आणि पश्चिम परिसर जोडणारा विद्यमान मार्ग कायम ठेवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने या पुलाची पुनर्बांधणी केली आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने मंजूर केलेल्या आराखड्यानुसार सिंदूर पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे. पी. डी. मेलो मार्गाकडील बंदर भाग आणि क्रॉफर्ड मार्केट, काळबादेवी, धोबी तलाव या वाणिज्यक भागांना लोहमार्गावरून पूर्व-पश्चिमेला जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरलाअसून पुनर्बांधणीमुळे सुमारे दहा वर्षापासून बाधित झालेली पूर्व-पश्चिम वाहतुकीसाठी सुविधा उपलब्ध होणार आहे. विशेषतः वालचंद हिराचंद मार्ग व शहीद भगतसिंग मार्ग यांच्या छेदनबिंदूवरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.
हेही वाचा :
‘भागवतां’चा ‘पंच्याहत्तरी’चा रोख कोणाकडे ?
फाशीची शिक्षा झालेल्या भारतीय नर्सला वाचवण्यासाठी याचिका