नवी दिल्ली : सर्बियन सुपरलिग फुटबॉल सामना सुरू असताना रॅडनिकी १९२३ संघाचे मुख्य प्रशिक्षक म्लाडेन झिझोविक यांचे निधन झाले. ते ४४ वर्षाचे होते. त्यांच्या निधनानंतर मैदानावर शोककळा पसरली आणि सामना रद्द करण्यात आला. (Mladen Zizovic)
सोमवारी सर्बियन सुपरलिगमध्ये म्लाडोस्ट लुकानी आणि रॅडनिकी १९२३ यांच्यात सामना सुरु होता. सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये रॅननिकी संघाचे मुख्य प्रशिक्षक म्लाडेन झिझोविक मैदानावर कोसळले. त्यांना ताबडतोब मैदानाजवळील हॉस्पिटलमध्ये हलवून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. त्यानंतर पुन्हा सामना सुरू झाला. पण २० मिनिटांनी झिझोविक यांच्या मृत्यूही बातमी खेळाडूंना कळताच सामना रद्द करण्यात आला. झिझोविकच्या यांच्या मृत्यूचे वृत्त कळताच मैदानावरच खेळाडू दु:खाने कोसळून गेले. अनेक खेळाडूंनी मैदानावर झोपून आपल्या आश्रूंना वाट मोकळी करुन दिली. अनेक खेळाडू गुडघे टेकून विमनस्क अवस्थेत बसल्याचे चित्र पहायला मिळाले. त्यानंतर मुख्य पंच आणि संयोजकांनी सामना रद्द केला. (Mladen Zizovic)
रॅडनिकी १९२३ ने नंतर एका अधिकृत निवेदन प्रसिद्ध केले. त्यामध्ये असे म्हटले आहे की , “आम्हाला सर्वांना अतिशय दु:ख झाले असून आम्ही जनतेला, चाहत्यांना आणि क्रीडा मित्रांना कळवत आहोत की आमचे मुख्य प्रशिक्षक, म्लाडेन झिझोविक यांचे काल रात्री लुकानी येथे झालेल्या म्लाडोस्ट आणि रॅडनिकी १९२३ यांच्यातील सामन्यादरम्यान निधन झाले. आमच्या क्लबने केवळ एक महान तज्ञच नाही तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे एक चांगला व्यक्ती, एक मित्र आणि एक क्रीडा कार्यकर्ता गमावला आहे, ज्याने त्याच्या ज्ञानाने, उर्जेने आणि कुलीनतेने त्याला ओळखणाऱ्या सर्वांच्या हृदयात खोलवर छाप सोडली. (Mladen Zizovic)