नाशिक पोलिसांनी बलात्कार प्रकरणात अशोक खरात उर्फ कॅप्टन या कथित ज्योतिषी आणि न्यूमरॉलॉजिस्टला अटक केल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राधाकृष्ण विखे-पाटील, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर अशी बडी मंडळी या भोंदूच्या संपर्कात असल्याचे उघड झाले आहे. अशोक खरात याच्या अटकेमुळे महाराष्ट्राची एपस्टिन फाइल उघडकीस आल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गूढ आणि उत्कंठा वाढली आहे.
विजय चोरमारे
संजय राऊत यांनी अशोक खऱात प्रकरणाला महाराष्ट्राची एप्स्टिन फाईल असे संबोधून राजकारण तापवले आहे. फाईलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील बड्या नेत्यांचा पर्दाफाश होणार असल्याचा दावा केला आहे. या फाईलद्वारे लैंगिक शोषण प्रकरणात काही लोकप्रतिनिधींचे नाव समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, या मुद्द्यावरुन लक्ष विचलित करण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचा आरोपही राऊत यांनी केला आहे. राऊत यांच्या आरोपांमुळे हे प्रकरण चांगलेच तापल्याचे दिसत आहे. (Maharashtra’s Epstein File)
एकनाथ शिंदे खरातच्या भेटीला
आपल्याला आठवत असेल की, नोव्हेंबर २०२२ मध्ये नेमकी तारीख सांगायची तर २३ नोव्हेंबर २०२२ ची घटना आहे. एकनाथ शिंदे तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. मुंबईतील सर्व बैठका रद्द करून शिंदे सपत्नीक शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी गेले. त्याबद्दल कुणी आक्षेप घेतला नव्हता. पण त्याच्या दुस-या दिवशी आलेल्या एका बातमीनं सर्वांना बुचकळ्यात टाकलं होतं. शिर्डीतील दर्शनानंतर शिंदे नियोजित कार्यक्रम बदलून अचानक सिन्नरला निघाले. त्यांच्यासोबत राधाकृष्ण विखे-पाटील आणि दीपक केसरकर हे तत्कालीन मंत्रिमंडळातील सहकाही होते. सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथे ईशान्येश्वर मंदिरात ते दर्शनासाठी गेले. त्यावेळी त्यांनी अशोक खऱात याच्याकडून भविष्य जाणून घेतल्याच्या बातम्या आल्या होत्या. थेट मुख्यमंत्रीच त्यांच्यापर्यंत गेल्यामुळं अशोक खरातचा भाव वधारला होता. अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं त्यावेळी शिंदे यांच्या या कृतीवर कठोर टीका केली होती.
तर हा अशोक खरात, स्वतःला कॅप्टन अशोक खरात म्हणवून घेतो. का तर म्हणे तो कुठल्यातरी विमान कंपनीत कॅप्टन पदावर होता. हा अशोक खरात लोकांना भविष्य सांगत होता. एकनाथ शिंदे, राधाकृष्ण विखे-पाटील, दीपक केसरकर ही काही प्रमुख उदाहरणं आहेत. त्यापलीकडं अनेक राजकीय नेते, वरिष्ठ सरकारी अधिकारी त्याच्याकडं भविष्य जाणून घेण्यासाठी जात होते. हा भोंदू बाबा आता पोलिसांच्या कचाट्यात सापडलाय. एका महिलेने त्याच्याविरोधात बलात्काराची फिर्याद दिली आहे. स्वतः कडं दैवी शक्ती असल्याचा खोटा दावा करून मंत्र तंत्र आणि धार्मिक विधीच्या नावाखाली फिर्यादीच्या मनात विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यानं ऑफिसमध्ये बोलावून गुंगी आणणारा पदार्थ खायला देऊन अत्याचार केल्याचं फिर्यादित म्हटलंय. २०२२ पासून डिसेंबर २०२५ पर्यंत हा प्रकार सुरू असल्याची तक्रार आहे. (Maharashtra’s Epstein File)
पेनड्राइव्हमध्ये ५८ व्हिडिओ
यातली धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांनी अशोक खरातकडून तब्बल ५८ व्हिडिओ जप्त केले आहेत. नामांकित महिला, सेलिब्रिटींसंदर्भातील हे व्हिडीओ असल्याची माहिती समोर येते. त्याची अधिकृत पुष्टी अद्याप पोलिसांनी केलेली नाही. परंतु हे व्हिडिओ धक्कादायक असण्याच्या शक्यतेमुळेच संजय राऊत यांनी महाराष्ट्राची एप्स्टिन फाइल खुली झाल्याचं म्हटलं आहे.
सिन्नर तालुक्यात अशोक खरातनं श्री शिवनिका संस्थान या मंदिराची स्थापना केली आहे. या मंदिराच्या विश्वस्त पदावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यापाठोपाठ रुपाली चाकणकरही वादात सापडल्या आहेत. राजकीय विरोधकांनी चहुबाजूनी चाकणकर यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.
नाशिकमध्ये सरकारवाडा पोलिसांनी अशोक खरात याच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा नोंदवला आहे. ३५ वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अशोक खरात उर्फ ‘कॅप्टन’ याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. बुधवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी अशोक खरातला ताब्यात घेतलं. त्याच्याकडून जप्त केलेल्या पेन ड्राइव्हमध्ये ५८ आक्षेपार्ह व्हिडीओ असून, त्यांची सत्यासत्यता पडताळण्यात येत आहे. (Maharashtra’s Epstein File)
कोण आहे अशोक खरात?
अशोक खरात हा नाशिकमधील सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष आहे. तो अंकशास्त्रज्ञ म्हणजे न्यूमरॉलॉजिस्ट म्हणूनही ओळखला जातो. अशोक खरात हा मर्चंट नेव्हीमधील निवृत्त अधिकारी आहे. ‘शिवनिका ट्रस्ट’च्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, मर्चंट नेव्हीमध्ये २२ वर्षांच्या कारकिर्दीत खरातने १५४ देशांचे दौरे केले आहेत. खरातनं ‘कॉस्मॉलॉजी’ (विश्वशास्त्र) चा अभ्यास केला असल्याचंही सांगितलं जातं.
अशोक खरातच्या अटकेनंतर एकनाथ शिंदे, राधाकृष्ण विखे-पाटील, दीपक केसरकर यांच्यासोबतचे त्याचे फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल झाले. रुपाली चाकणकर यांच्यासोबतचे त्याचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर असून त्यावरून टीकेची झोड उठत आहे.
सुषमा अंधारेंचे गंभीर आरोप
शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे की, कॅप्टन अशोक खरात नावाच्या स्वयंघोषित ज्योतिषावर बलात्कार, यौन शोषण यासारखे आरोप आहेत. पोलिसांनी हस्तगत केलेल्या पेन ड्राईव्ह मधून ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ पोलिसांनी हस्तगत केले आहेत. या स्वयंघोषित ज्योतिषाकडे अनेक राजकीय नेत्यांचा राबता होता. केसरकर, तटकरे चाकणकर अशी काही राजकीय भक्तांची नावे. यापूर्वीसुद्धा अशोक खरात याच्यावर जेव्हा लैंगिक शोषणाचे आरोप एका संस्थेने केले तेव्हा चाकणकर यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करत संबंधित संस्थेकडून दबाव आणून माफीनामा घेतला होता. खरात यांनी स्थापन केलेल्या संस्थेवर रूपाली चाकणकर संचालक म्हणून काम करतात. खरात याच्या घरच्या लग्न कार्यामध्ये चाकणकर जातीने स्वागत करताना बघून अनेकांना आश्चर्य वाटले होते.
आता आम्हाला शंका नव्हे भीती आहे, पुन्हा एकदा महिला आयोगासारख्या अत्यंत जबाबदार पदाचा दुरुपयोग करत रूपाली चाकणकर यांनी अशा लिंगपिसाट माणसाला मदत केली तर याची जबाबदारी कोण घेणार ? असा प्रश्नही सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे. योगायोगाने राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदावर याच पक्षाच्या नेत्या सुनेत्रा वहिनी आहेत. महिला म्हणून सुनेत्रा वहिनींच्या मनाला तरी ही गोष्ट पटते का की अशा लिंगपिसाट माणसाला पाठिशी घालणाऱ्या चाकणकरांना या पदावर ठेवावे…?
चाकणकर यांचा खुलासा
गदारोळ उठल्यानंतर रुपाली चाकणकर यांनी स्पष्टीकरण दिले असून त्यात म्हटले आहे की, कॅप्टन खरात यांच्या वैयक्तिक आय़ुष्य किंवा त्यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत मला माहिती नाही. आता जे आरोप होत आहेत, त्याबद्दल पोलीस निष्पक्षपणे चौकशी करतील. पोलीस तपासावर माझा विश्वास आहे, असे चाकणकर यांनी म्हटले आहे.
अंधारे यांची पुन्हा टीका
त्यांच्या या खुलाशावर सुषमा अंधारे यांनी पुन्हा तोफ डागली आहे. त्यांनी म्हटलंय की, रूपाली चाकणकर क्रमांक एकच्या खोटारड्या आहेत. कॅप्टन अशोक खरात काय लायकीचा माणूस आहे हे रूपाली चाकणकर यांना चांगलेच माहिती होते. खरात याची दुष्यकृत्य बाहेर आणण्याचा प्रयत्न “खबरदार पुढारी” या स्थानिक वृत्तपत्राने केला तेव्हा त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची धमकी देत त्याच्याकडून चाकणकर बाईंनी माफीनामा घेतला होता. ज्या चाकणकर बाई मला या प्रकरणाची माहिती नव्हती असं सांगत आहेत त्या बाई या माफीनाम्याच्या संबंधाने काय बोलणार आहेत? असा सवाल अंधार यांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली ठोंबरे यांनीही ,अभी बात निकली है तो… दूर तक जाएगी, असं म्हटलं आहे. समाजमाध्यमावर प्रतिक्रिया दिली आहे. संविधानिक पदावर बसलेल्या अध्यक्षाच जर अत्याचाराच्या मुखिया असतील, तर चाकणकर प्रेमींनी आता टाळ्या वाजवाव्यात, अशा शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी, अशोक खरातची अटक हा फक्त एक गुन्हा नाही—तर एक मोठ्या शोषणाच्या रॅकेटचा पर्दाफाश असल्याचं म्हटलं आहे.
याप्रश्नी सर्व थरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. एवढ्या हायप्रोफाइल प्रकरणात पोलीस विनादबाव काम करतील का, अशी शंकाही व्यक्त केली जात आहे. पुरोगामी महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांनी भोंदूंच्या नादाला लागून महाराष्ट्राच्या लौकिकाला काळिमा फासला असल्याची टीकाही होत आहे. अशोक खरातच्या ताब्यातून हस्तगत केलेल्या पेनड्राइव्हमधील ५८ व्हिडिओंच्या त्यासंदर्भातील वस्तुस्थिती समोर येणार का, त्यातल्या नेते तसेच अधिका-यांचे चेहरे जगासमोर येणार का, याबाबतही महाराष्ट्राच्या जनतेला कुतूहल आहे. (Maharashtra’s Epstein File)