Mahadev Munde: महादेव मुंडेचं काय झालं?

Mahadev Munde

पन्नास वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या सामना चित्रपटामध्ये मारुती कांबळेचं काय झालं? असा प्रश्न विचारला जात होता. महाराष्ट्राच्या राजकारणात, समाजकारणात तसा प्रश्न वारंवार विचारला गेला. परंतु अलीकडच्या काळात बीडच्या परळीतील महादेव मुंडे यांच्या हत्येनंतर तो अधिक तीव्रतेनं पुढं येतोय. महादेव मुंडेचं काय झालं? अठरा महिने झाले महादेव मुंडेचा खून होऊन. संशयितांची नावंही जाहीर झाली. परंतु पोलिस कारवाईच्या नावानं बोंब. वैतागून महादेव मुंडेच्या पत्नीनं विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. बीडचे पोलिस आणि महाराष्ट्राचे गृहखात्याच्या गेंड्याच्या कातडीला काहीही फरक पडत नाही. (Mahadev Munde)

  • डॉ. विजय चोरमारे

महादेव मुंडे प्रकरण नेमकं काय होतं, आणि त्याचे धागेदोरे कुठवर जातात?

घटना आहे ऑक्टोबर २०२३ मधली.

२० ऑक्टोबरला सायंकाळी सहा वाजता महादेव मुंडे यांनी मुलांना शिकवणीवरून घरी सोडले. त्यानंतर पिग्मीचे कलेक्शन केले. परळीतील शिवाजी चौकात सायंकाळी सात वाजून दहा मिनिटांनी ते सीसीटीव्ही मध्ये दिसले. ते त्यांचे अखेरचे दर्शन. त्यानंतर आझाद चौकात मित्राला भेटले.

-आझाद चौकापासून ३०० मीटर अंतरावर असलेल्या वनविभागाच्या कार्यालयासमोर रात्री नऊ वाजता त्यांची मोटरसायकल आढळली. (Mahadev Munde)

ती गाडी पोलिसांनी पोलीस स्टेशनला आणून लावली. गाडीवर रक्त सांडलेले होते, अशी कुटुंबीयांनी माहिती दिली.

याच गाडीमध्ये महादेव मुंडे यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड बँकेचे पासबुक यासह इतर कागदपत्रे होती.

मोटरसायकल सापडली मात्र महादेव मुंडे कुठे यांचा शोध लागला नाही. मोटारसायकल जवळ दोन चपला सापडल्या, त्यापैकी एक चप्पल महादेव मुंडे यांची होती. दुसरी चप्पल कोणाची होती त्याचा तपास लागला नाही. (Mahadev Munde)

– दुसऱ्या दिवशी सकाळी जिथे मोटरसायकल सापडली, त्यापासून 50 मीटर अंतरावरच महादेव मुंडे यांचा मृतदेह सापडला. हा मृतदेह रात्री पोलिसांना का दिसला नाही असा प्रश्न उपस्थित होतोय.

– महादेव मुंडे यांच्या मृतदेहावर मारल्याच्या जखमा होत्या आणि गळा कापलेला होता. त्याचबरोबर हातावर गालावर पाठीवर वार होते. त्यांचा मोबाईल, अंगठी, लॉकेट त्याचबरोबर पिग्मीचे कलेक्शनचे सुमारे दीड लाख रुपये गायब होते. (Mahadev Munde)

मृतदेह मुंडे कुटुंबीय पोलीस ठाण्यात ठेवणार होते. मात्र, पोलिसांनी आठ दिवसात आरोपींना अटक करण्याचे आश्वासन दिल्यामुळे अंत्यविधी करण्यात आला. १६ डिसेंबरला मुंडे यांना न्याय मिळावा यासाठी परळी बंदचे आवाहन करण्यात आले होते.

परळी पोलिसांनी महादेव मुंडेचा विषय अशा प्रकारे सोडून दिला, की जणू आरोपी त्यांच्या माहितीचे आहेत आणि त्यांना पकडायचेच नाही. राजकीय वरदहस्ताशिवाय एवढी निष्काळजी आणि निर्लज्जपणा होऊ शकत नाही. स्वाभाविकपणे संशयाची सुई वाल्मिक कराड आणि त्याच्या आकाकडेच होती.

महादेव मुंडेची फाईल जवळपास बंदच होती.

दरम्यान मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली. वाल्मिक कराडचे कारनामे चर्चेत आले. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी विषय धसास लावायचे ठरवले. त्यातून पुन्हा महादेव मुंडेचा विषय ऐरणीवर आला. (Mahadev Munde)

काही दिवसांपूर्वी वाल्मिक कराडचा एकेकाळचा सहकारी बाळा बांगर समोर आला आणि त्याने महादेव मुंडे प्रकरणावर गौप्यस्फोट केला. त्याच्या म्हणण्यानुसार फक्त १२ गुंठ्यासाठी महादेव मुंडे यांची हत्या करण्यात आली. गोट्या गित्ते, राजू फड आणि वाल्मिक कराडचा धाकटा मुलगा यांनी महादेव मुंडेची हत्या केल्याची माहिती बाळा बांगर याने माध्यमांना दिली. बाळा बांगरने सांगितलं की, मी वाल्मिक कराडला भेटायला गेलो तेव्हा तिथे त्याच्या टेबलवर माणसाचे चमडे, हाड काढून आणलं होतं. त्यांचे रक्त सुद्धा तेथील टेबलवर ठेवले होते.

बीडमध्ये क्रौर्याची किती परिसीमा गाठली होती, हे यावरून दिसून येते. धनंजय मुंडे सत्तेत असताना त्यांच्यावतीने वाल्मिक कराड सगळा कारभार करीत होता. वाल्मिक कराडने गुन्हे करायचे आणि पोलिसांनी ते दडपून टाकायचे, असेच अनेक वर्षे चालले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, महादेव मुंडेचा प्लॉटिंगचा व्यवसाय होता. एका प्लॉटवरून महादेव मुंडे आणि वाल्मिक कराडचा वाद होता. त्यातून त्याची हत्या झाली, हे उघड आहे.

भाजपचे आमदार सुरेश धस यांनी विधिमंडळ परिसरातच पत्रकारांना सांगितले की, फक्त १२ गुंठ्यासाठी महादेव मुंडे यांची हत्या करण्यात आली. हत्येनंतर महादेव मुंडे यांचे चमडे, हाड आणि रक्त काढून वाल्मिक कराडच्या समोर आणलं होते, असं बाळा बांगर नावाच्या व्यक्तीनं सांगितलं आहे. महादेव मुंडे यांच्या हत्येत गोट्या गित्ते, राजू फड आणि वाल्मिक कराडचा धाकटा मुलगा आहे, असेही बाळा बांगरने सांगितलं आहे.

बाळा बांगरनं आरोपींची नावे सांगून तीन आठवडे उलटून गेले.. एवढ्या दिवसांत आरोपींना अटक करण्यात आली नाही. ज्याची नियुक्ती वाल्मिक कराडने केली आहे. त्याच्याकडेच महादेव मुंडे यांचा तपास दिल्याचा आरोप आहे. बाळा बांगरनं नावं उघड केल्यावर आरोपी फरार झाले. जे गुंडांना मदत करतात, अशा पोलीस अधिकाऱ्यांना बदललं पाहिजे. पोलीस कर्मचारी हे सरकारी काम करण्यापेक्षा आकाचे काम करतात हे फोन रेकॉर्ड तपासल्यावर उघड होईल,” असा दावाही धस यांनी केला आहे. (Mahadev Munde)

दरम्यान बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर बुधवारी १६ जुलैला सकाळी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आपल्या पतीच्या हत्येतील आरोपींना अटक करावं या मागणीसाठी विष प्राशान केलं. त्यांच्यावर सध्या बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महादेव मुंडे हत्या प्रकरणात गौप्यस्फोट करणारे वाल्मीक कराडचा जुना सहकारी बाळा बांगर यांने जिल्हा रुग्णालयामध्ये जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी माध्यमांसमोर बोलताना त्याने पुन्हा एकदा धक्कादायक आरोप केला. महादेव मुंडे हत्या प्रकरणात वाल्मिक कराडसह त्याच्या मुलाचा आणि गोट्या गितेचा हात असून गोट्या गिते हा सायको किलर आहे.

आता बीड जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांत ज्या घटना घडत आहेत, त्या बघता जिल्ह्यात किती सायको किलर आहेत, असा प्रश्न पडतो. आणि पोलिस खातेही या सायको किलर्सच्या दहशतीखाली आहे, असाच निष्कर्ष काढावा लागतो.

जिल्हा पोलिस अधीक्षक बदलल्यानंतरही बीड पोलिसांच्या कार्यपद्धतीत का बदल होत नाही?

वाल्मिक कराड तुरुंगातूनही पोलिसांच्यावर नियंत्रण ठेवून आहे काय? इतकं सगळं महाभारत घडूनही महादेव मुंडेचं काय झालं, या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही.

हेही वाचा :
भास्कर जाधवांचा संताप अनावर, अध्यक्षांबद्दल म्हणाले…
राज्यात १०० टक्के त्रिभाषा सूत्र लागू करणारच : फडणवीस

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर