कोल्हापूर : प्रतिनिधी : शिरोळ तालुक्यातील नांदणी जैन मठातील माधुरी हत्ती वनविभागाने घेऊन जावे, या आशयाचे २०१८ मधील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांचे पत्र सोशल मिडीयात व्हायरल झाल्यानंतर त्यांनी खुलासा केला आहे. (Madhuri Hatti)
कोर्टाच्या माधुरी हत्तीणीला वनतारामध्ये पाठवण्याचा निर्णय कायम ठेवल्यानंतर राजू शेट्टी सडकून टीका केली होती. त्यांनी मुकेश अंबानींवर हल्लाबोल केला होता. त्यानंतर त्यांच्या विरोधकांनी त्यांचे सात वर्षांपूर्वीचे पत्र सोशल मीडियात व्हायरल केल्यानंतर खळबळ उडाली. पत्र व्हायरल झाल्यावर राजू शेट्टी यांनी खुलासा केला आहे. हत्तीची देखभाल करण्यासाठी माहुत नसल्याने मठाच्या विश्वस्तांनी शेट्टी यांची भेट घेतली. हत्तीची देखभाल करण्यासाठी गडचिरोलीतील वनविभागाकडे माधुरी हत्ती रवानगी करण्यात यावी, अशी विनंती विश्वस्तांनी केली होती, असे शेट्टी यांनी सांगितले. मात्र, इस्माईल या माहुतास अथक प्रयत्नातून नांदणी मठाच्या विश्वस्तांनी शोधून आणले आणि त्याने आतापर्यंत हत्तीची काळजी घेतली असल्याचे शेट्टी म्हणाले. (Madhuri Hatti)
राजू शेट्टी यांनी म्हणाले, २०१८ मध्ये नांदणी मठातील हत्तीची देखभाल करणारा नागाप्पा हा माहुत हदयविकाराच्या तीव्र झटक्याने आजारी पडल्यानंतर डॅाक्टरांनी त्याला नोकरी सोडण्यास सांगितले. त्यामुळे माधुरीची सेवा करण्यासाठी प्रशिक्षित माहुत नसल्याने नांदणी मठाचे विश्वस्त माझ्याकडे येवून माहुत मिळेपर्यंत काही दिवसासाठी सदरचा हत्ती वनविभागाच्या गडचिरोली हत्तीकेंद्रात सोडण्याबाबत विनंती केली. त्यानुसार मी २०१८ मध्ये वनविभागास पत्रव्यवहार केला. मात्र, वनविभागाने या गोष्टीस असमर्थता दर्शवली. त्यानंतर थोड्या दिवसांनी इस्माईल या माहुतास अथक प्रयत्नातून नांदणी मठाच्या विश्वस्तांनी शोधून आणले. त्यादिवसापासून ते आजअखेर माधुरीची चांगल्या पध्दतीने देखभाल व काळजी घेतली गेली आहे. काही मंडळी खोडसाळपणाने राजकीय आकसापोटी माझे २०१८ साली वनविभागास देण्यात आलेले पत्र आता सोशलमिडीयावर व्हायरल केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, माधुरीची रवानगी वनताराकडे झाल्यानंतर राजू शेट्टी यांनी तोफ डागली आहे. शेट्टी यांनी ट्विट करून म्हटलं आहे की, ज्यावेळी धीरूभाई अंबानी पेट्रोल पंपावरती पेट्रोल-डिझेल सोडण्याचे काम करत होते तेव्हापासून नांदणी मठाकडून हत्तीचे संगोपन करण्यात आले आहे. आज अंबानींकडे पैसा व संपत्ती आहे म्हणून स्वत:च्या मुलाच्या स्वप्नासाठी वनतारा हे प्राणीकेंद्र उभारले. याठिकाणी पाळीव प्राणी इतर प्राण्यांना शिकाऊ करण्यास मदत होते, म्हणून न्यायालयात जाऊन वर्षानुवर्षे सुरू असलेली जैन समाजाची परंपरा व प्रतिष्ठा खंड पाडण्याचा डाव या मंडळीनी रचला. संस्कृती, इतिहास, परंपरा, वारसा या सगळ्या गोष्टी समाज म्हणून गेल्या १२०० वर्षापासून नांदणी मठाकडून जपल्या जात असताना पैसा, सत्ता व संपत्ती समोर अण्णा भाऊ साठे यांच्या मताप्रमाणे न्यायव्यवस्थाही काहींची रखेल झाली हे खरं आहे. आता माधुरीसाठी न्याय मागायचे कुणाकडे? असा सवालही शेट्टी यांनी केला आहे. (Madhuri Hatti)