मुंबई : ब्रिटानिया बिस्किटांच्या पॅकेटमध्ये जिवंत किडा आढळल्याप्रकरणी मुंबईतील संबंधित ग्राहक महिलेला ग्राहक न्यायालयाने १.५ लाख रुपये भरपाई देण्याचा आदेश दिला आहे. ब्रिटानिया इंडस्ट्रीज लि. आणि ज्या केमिस्ट दुकानातून बिस्कीट पॅकेट खरेदी केले होते अशा दोघांनी ही नुकसान भरपाई द्यावी, असे या आदेशात म्हटले आहे. (Live worm in biscuit)
दक्षिण मुंबई जिल्हा ग्राहक वाद निवारण आयोगाने २७ जून रोजी हा आदेश दिला. चर्चगेट येथील एका केमिस्ट दुकानातून या महिलेने २०१९ मध्ये बिस्किटाचे पॅकेट खरेदी केले होते. ही घटना घडली होती. या महिलेला झालेला मानसिक त्रास, छळ आणि शारीरिक त्रासापोटी संयुक्तपणे नुकसानभरपाई आणि २५,००० रुपये खटल्याचा खर्चही देण्याचे आदेश कोर्टाने दिला.
‘‘खराब बिस्किटाची विक्री ही ग्राहकांच्या विश्वासाचे आणि अन्न सुरक्षा कायद्यांनुसार आणि ग्राहक संरक्षण कायद्यांनुसार वैधानिक कर्तव्यांचे गंभीर उल्लंघन आहे,’’ असे मत ग्राहक आयोगाने म्हटले आहे. (Live worm in biscuit)
मीरा रोड येथील रहिवासी असलेल्या या महिलेने ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत आयोगाकडे तक्रार केली होती. तिने चर्चगेट स्टेशनवरील केमिस्ट दुकानातून गुड डे बिस्किटांचे पॅकेट खरेदी केले होते, असे तिने या तक्रारीत नमूद केले होते.
काही बिस्किटे खाल्ल्यानंतर तिला एका बिस्किटात जिवंत किडा आढळला. त्यामुळे मळमळ, उलट्या आणि मानसिक त्रास होऊ लागला. तिने बिस्किट जपून ठेवले आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) महानगरपालिका अन्न प्रयोगशाळेशी संपर्क साधला. ऑगस्ट २०१९ मध्ये अहवाल दिला. या अहवालात महिलेच्या तक्रारीला दुजोरा दिला होता.
महिलेने उत्पादक कंपनीला कायदेशीर नोटीस बजावली, परंतु कोणतीही भरपाई मिळाली नाही. त्यानंतर तिने आयोगाकडे धाव घेतली.
तक्रारदाराने त्यांच्या उत्पादन युनिटशी संबंध असणारा रॅपर किंवा बॅच नंबर दिलेला नव्हता. आमच्याकडून उच्च दर्जाची मानके पाळली जातात, असा दावा करत ब्रिटानिया इंडस्ट्रीजने जबाबदारी नाकारली होती. केमिस्ट दुकानदार अशोक एम शाह यांनीही कोणतीही तक्रार मिळाल्याचे सांगितले आणि आम्ही उत्पादकांची सीलबंद उत्पादनेच विकतो, असे सांगत हात झटकले होते. (Live worm in biscuit) तक्रारीची दखल घेत आयोगाने म्हटले की, बिस्किटाच्या पॅकेटात एक जिवंत किडा आढळला. त्यावरून या खराब बिस्किटे होती, हे स्पष्ट होते. बीएमसीच्या अन्न विश्लेषक अहवालातही याची पुष्टी झाली. कंपनीने त्याला आव्हान दिलेले नाही, असे स्पष्ट करत संबंधित महिलेला नुकसानभरपाई देण्याचे आदेश आयोगाने दिले.