कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापुरी चप्पल अधिक आकर्षक, आरामदायी आणि आधुनिक होण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अत्याधुनिक मशिनरी व तंत्रज्ञानासाठी अतिरिक्त ८६ लाख रुपयांचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी महिला आर्थिक विकास महामंडळाला दिल्या. शासकीय विश्रामगृह कोल्हापूर येथे माविम, महिला उद्योजिका व बचत गटांसमवेत त्यांनी चर्चा केली, यावेळी त्या बोलत होत्या. (Kolhapuri Chappal unit)
प्रशासनामार्फत कोल्हापूर जिल्ह्यातील सांगरूळ येथे कोल्हापुरी चप्पल युनिट सुरू करण्याबाबत कामे सुरू असून १० गावातील १५० महिला सहभागी आहेत. १ कोटी २९ लाख रुपयांच्या या प्रकल्पाचासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून पहिल्या टप्प्यात ४० लक्ष रुपये देण्यात आले आहेत. प्रकल्पासाठी अस्मिता लोकसंचालित साधन केंद्र यांच्याकडून कोल्हापुरी चप्पल अजून आरामदायी आणि आधुनिक होण्यासाठी आवश्यक मशिनरी व तंत्रज्ञानासाठी अतिरिक्त ८६ लाख रुपयांची आवश्यकता असल्याची माहिती देण्यात आली. (Kolhapuri Chappal unit)
युनिटसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून ८० लाख रुपये माविमकडून ३० लाख रुपये व सीएमआरसी स्वतः १९ लाख रुपये गुंतवून प्रकल्प सुरू करणार आहे. यातील ३८ लाख रुपयांच्या विविध मशिनरी खरेदी करण्यात आले असून इतर कामे प्रगतीपथावर आहेत. या कोल्हापुरी चप्पल युनिट साठी आंतरराष्ट्रीय स्तरावरती मागणी असणारा कंफर्ट अर्थात आरामदायीपणा तसेच चप्पलच्या ब्रँड आणि डिझाईन मधील आधुनिकता यासाठी अजून ८६ लाख रुपयांची आवश्यकता असल्याचे सादरीकरणाद्वारे सीएमआरसी कडून मांडण्यात आले. (Kolhapuri Chappal unit)
या अतिरिक्त व्यवस्थेतून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर आवश्यक गुणवत्ता कोल्हापुरी चप्पलला मिळणार असून यामधून मागणी मोठ्या प्रमाणात वाढेल असा विश्वास सीएमआरसी कडून यावेळी व्यक्त करण्यात आला. अतिरिक्त आवश्यक निधीतून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वेगवेगळ्या मशीन खरेदी करण्याचे यामध्ये प्रस्तावित आहे. यावेळी महिला व बालविकास मंत्री यांनी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याशी बोलून या प्रस्तावावर लवकरच चर्चा करून मान्यता देण्याच्या आश्वासनही दिले. मंत्री अदिती तटकरे यांनी उपस्थित महिलांबरोबर संवाद साधत चप्पल तयार करण्यासाठीचा कालावधी, महिन्याचे उत्पन्न, युनिटचा वापर सुरू केल्यावर होणारे भविष्यातील बदल याबाबत चर्चा केली.
या बैठकीदरम्यान कोल्हापुरी चप्पल प्रकल्पाचा विशेष आढावा घेण्यात आला. यावेळी बोलताना कोल्हापुरी चप्पल ही आपली पारंपरिक ओळख असून नवतेजस्विनी प्रकल्पाच्या माध्यमातून या उद्योगास आधुनिक रूप देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असे मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले. प्रकल्पासाठी आवश्यक निधी देण्याबाबत पालकमंत्री महोदयांशी चर्चा करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माविमचे वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी कुंदन शिनगारे यांनी केले. माविम पुणे विभागाचे व्यवसाय विकास सल्लागार सिद्धराम माशाळे तसेच माविम कोल्हापूर कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी या बैठकीस उपस्थित होते. (Kolhapuri Chappal unit)